Letters

पत्र.क्र. ११

*© श्रीधर संदेश*

*॥ श्रीराम ||*

*गिरनार, १९४७*

*सौ. चि. राधेस आशीर्वाद.*

माझ्याकडून पत्र आले नाही म्हणून रोज वाट पाहून थकली असशील. तुझे पत्र हरवले होते त्यामुळे तुझा पत्ता माझ्या ध्यानात नसल्यामुळे पत्र पाठविता आले नाही. परवाच चि. अय्याने शोधून दिलें. कालच लिहावयास सुरुवात केली पण तें पूर्ण करितां आले नाही. तरी आज पूर्ण करावे म्हणून बसलो.

बस्स! *होणारे न चुकेल*
*होईल जरी ब्रह्मा तया आडवा ।*
या सदराखाली जसे व्हावयाचे तसेच झालें. *लिखितमपि ललाटे प्रोज्ज्ञि तु का समर्थः।* कोण समर्थ आहे असे या वाक्यांत विचार आहे. (ब्रह्मदेवाचे लिखित पुसून टाकण्यास) अर्थात् कोणीहि नाही हे यातूनच दाखवित आहे. परमात्मा सर्वज्ञ आहे. कुठे तरी संसाराची वासना तुझ्या अंतःकरणांत दडून असेल, संसाराचे आघात सोसल्याशिवाय ती वासना नष्ट होणे शक्य नसेल, तेव्हा त्याने संसारात पुन्हा वासना ठेऊ नये म्हणून संसारात टाकले होते. हे देव चांगल्याकरताच करतो.

सुखाकरितां संसार नाही; सुखाकरता संसार करावयाचाहि नसतो. सुखदुःखानी संसाराची वासना जावी, संसारविषयीचे वैराग्य अंगी बाणावे, पाहून मन विटल्यासारखे संसारसुखाला मन विटावे, एवढ्याचकरता संसार करावयाचा असतो.

*जो संसार दुःखें दुखावला । जो त्रिविधतापे पोळला । तोचि अधिकारी झाला। परमार्थासी।।* *
*संसारसंगें सुख झालें ।*
*ऐसें देखिलें ना ऐकिलें ॥*

उणीव, अडचण, दुःख, शोक, काळजी यांनींच संसार भरलेला
असतो. कुठेसें खूपशा उन्हाळी पावसाळ्यातल्या उन्हाप्रमाणे विषयी पामराला प्रथम प्रथम कुठे थोडावेळ विषयसुखाचे दिवस भ्रांत दशेमुळे गोड वाटतात न वाटतात तोच पुढे वाढून ठेवलेल्या उणीव चिंतादि आपल्या भीषण स्वरूपाने द्दग्गोचर होऊ लागतात. संसारात पडण्यापूर्वीच्या संसारसुखाच्या चित्ताकर्षक हवेतल्या कल्पना संसारात पडल्यावर फार दिवस राहत नाहीत.”दुरून डोंगर साजरे” म्हणतात तसलीच येथे परिस्थिती आहे.
बाळ! तुझ्या मनातल्या संसार वासना धुवून टाकण्याकरिता संसारातले दुःख साबण समजून त्यामुळे दुःखी न होता विवेकरुपी शुद्ध जलाने मन शुद्ध करण्याकरिता वासानाशून्य होण्याचे काम रोज नवीन उत्साहाने करीत जा. दुःखरूप संसाराच्या बीजांचे रोज निर्दहन चालले आहे म्हणून नित्य नव्या आनंदाने भरून ऐस.

पाडसा!! स्वस्वरुपाच्या दृष्टीने तुझ्यांत दुःख म्हणून प्रवेश करू शकत नाही. मुंगीच्या श्र्वासाने जसा मेरू डळमळत नाही तशीच निष्पाप निजानंद स्थिती संसार दुःखाने कधीही विचलित होत नाही. *राजा राजपदी असता। उगीच चाले सर्व सत्ता।।* त्याप्रमाणे स्वरूपाच्या आनंदाने सदोदित प्रसन्न असशील तर श्रुतीत सांगितल्याप्रमाणे सर्व देव तुझ्या अनुकुलतेप्रमाणे वागतील. *श्री गुरुबोध जया घडे । संसाराचे त्या न कोडे ।स्वरूपानंदी पहुडे। समरसोनि ।।* हवेलीतल्या माणसाला जसा पाऊस लागत नाही त्याप्रमाणे श्री गुरुबोधाच्या सुरक्षित जागेंत आत्मस्वरूप निष्ठेंत असताना संसारतल्या दुःखाची कल्पनाच येत नाही.

मी हा तुझा अनुभव आनंदपूर्ण अशा तुझ्या मंगल स्वरूपातूनच उद्भूत होऊन तुझ्या स्वरूपभानाने नित्य निरंकुश सुखरूप आहे हे कधीच विसरू नकोस. ही गुरूंची खूण, मोक्षसुखाचा हा माहेरवास कधीही सोडता कामा नये. असो.
श्रीगुरु परमात्म्याची पूर्ण कृपा तुझ्यावर होवो, दोन्हीही कुळे तुझ्यामुळे उद्धरली जावोत. सर्व ही दुःख शोक मावळून जावो. तुझ्या महद्भाग्याचा उदय होवो.

*।।इति शम्।।*
*।।सर्वे जना सुखिनो भवंतु।।*

*श्रीधर*

home-last-sec-img