Letters

पत्र.क्र. १

*।। श्रीराम समर्थ ।।*

चि. गोडसे यास आशीर्वाद

बाळ ! तुझी प्रकृती कशी आहे आता ? मला वाटते तू नौती करावीस. नौतीने पोटाचे सर्व विकार नाहीसे होतात. मयुरासन करीत जा. यामुळेही तुझी पोटाची तक्रार नाहीशी होईल. आसने करावीत. आसनाने रोग जातात. ‘भस्रिका’ सारखा सोपा प्राणायाम करावा. उत्साह याढतो. आरोग्यही लाभते. काल रात्री डोळ्याला डोळा न लावता सबंध रात्रभर बसून सारखा लिहीत होतो. तुझे पत्र कालपर्यंत आले असते तर तुलाही पत्र पाठविलें असतें. तूं येतोस किंवा नाही म्हणून संशयास्पदच मला समजले. या सर्व कारणांनी तुला पत्र लिहीले गेले नाही. तुला लिहूं नये असा काही उद्देश नव्हता. आता साडेबारा झाले आहेत. तुझ्या प्रश्नांना उत्तर द्यावयाचे म्हणजे एक स्वतंत्र ग्रंथच लिहावयाला पाहिजे. थोडक्यांत थोडे उत्तर देतो.

*१)* वैराग्य परमार्थाकडे ओढते. तें वैराग्य विषयांच्या अनुभवाने होणाऱ्या त्रासापासून, त्रिविध-तापापासून, नाना आघातापासून बद्धाला निर्माण होत होत यांत सुख नाही, संसार हा दुःखमूळ आहे ही भावना निर्माण होते व भक्ति, योग, ज्ञान इत्यादि साधनांनी वृत्ति अंतर्मुख होऊन निर्विषय सुखाच्या अनुभवाला अल्प प्रमाणाने सुरुवात होते व तिला पूर्णत्व आत्मसाक्षात्काराने लाभते.

*२)* विषयांच्या दोष दृष्टीने व निर्विषय आत्मरूपाच्या अनंत सुखाच्या निश्चयाने मन आवरावें.

*३)* ध्यानाचे प्रकार बरेच आहेत. ध्यानाने दृष्टिसाधन घडून तेजाचा साक्षात्कार होतो व आत्मा सर्व प्रकाशक आणि स्वतः स्वयंप्रकाशक आहे ही जाणीव उत्पन्न होऊन क्रमाने आत्मसाक्षात्कार होतो. उपासनेचे सगुण ध्यान सावयव, साकार असते. निर्गुण ध्यान आनंद रूपाच्या केवळ जाणिवेचे असते. चरणांगुष्टापासुन ध्यान करत करीत संपूर्ण मूर्ती, ध्यान दृढ करावे व नंतर उपासनेच्या कृपापूर्ण हास्यांत प्रगट झालेल्या स्वरूपानंदाच्या जाणीवेचे ध्यानच एक उरवावे. असा हा सगुणांतून निर्गुणांत जाण्याचा क्रम आहे.

*४)* एक लाट उत्पन्न होऊन नाहीशी झाल्यानंतर दुसरी लाट उत्पन्न होण्यापूर्वी समुद्राचा पृष्ठभाग समपातळीत असल्या प्रमाणे एक वृत्ति लीन होऊन दुसरी वृत्ति उठण्याच्या अगोदर केवळ एक निर्विकल्प जाणीव शिल्लक राहते. दोन वृत्तींच्या मधल्या संधिकालांतल्या निर्विकल्प जाणीवेचा अभ्यास करणे म्हणजे वृत्त-अभ्यास होय कसलीहि कल्पना न करितां कल्पनेला प्रकाशविणारी निर्विकल्प जाणीव एक उरवीत वृत्तिलयाचा अथवा वृत्तीचा अभ्यास करावयाचा असतो.

*५)* वृत्ति अथवा स्फुरण त्याच्या पूर्वीच्या ज्ञानमात्र स्वरूपांतून न उठू देतां अंतर्मुख व्हावें.

*६)* मी या स्फुरणाचे लक्ष्य आपणच एक आनंदघन परब्रह्म आहो असा नित्यानुसंधानाचा अभ्यास करावा.

*७)* आनंदरूपाची आपली वृत्त्यात्मक जाणीव नष्ट होऊन निर्विकल्प आनंदच एक स्वरूपाने उरला की त्याला समाधि म्हणतात. ध्यानाची विस्मृति ही समाधि आनंदरूपच, आपण आहो म्हणून कल्पना करून, कल्पना नाहीशी करून निर्विकल्प आनंदस्वरूप उरविण्याचा अभ्यास म्हणजे समाधीचा अभ्यास.

*८)* आत्मस्वरूपाच्या दृढनिश्चयाने शीघ्रातिशीघ्र आत्मसाक्षात्कार करून घ्यावा.

तुझ्यासगट सर्वांवर कृपा आहे.

सर्वहि आनंदाने साधन करून कृतार्थ व्हा.

*श्रीगुरुपौर्णिमा शके १८८३*
*श्रीधरस्वामी.*
*© श्रीधर संदेश*

home-last-sec-img