Letters

पत्र.क्र. २२

*© श्रीधर संदेश*

*॥ श्रीराम समर्थ ॥*

*चि. दिनकर यांस आशीर्वाद*

क्षेम आहे ना ? काय झाले कुणाला माहीत तुमच्याकडून एकहि पत्र नाही इकडून मात्र ३-४ पत्रे पाठविली गेली. जरूरीच्या दृष्टीने काही तुम्हाला कळविले तर ते समयींच होईल अशी आतां खात्री वाटेनाशी झाली आहे. पुढेहि काही आज्ञा केली तर तिचे महत्व जाणून वेळीच अम्मलबजावणी होईल किंवा नाही म्हणून मला संशय वाटतो. सर्वांनीच हे कसले असे बेजाबदारपणाचे आचरण पत्करले आहे. *आळस नसावा, वेळेचे महत्व फार आहे. ज्या वेळचे त्यावेळी काम झाले नाही की फार नुकसान होते.* पाच मिनिटांच्या दिरंगाईने नेपोलियनास हार खावी लागली. एका सरदाराच्या मूर्खपणामुळे नेपोलियनाला किती भोगावे लागले !! काम दक्षतने वेळेवर होण्याविषयी हे एक ऐतिहासिक उदाहरण धडा देणारे आहे असो.

आतांतरी याबाबतींत पुन्हा इशारा देण्याची वेळ आणू नका ! हातपाय घट्ट असले तरच काही होते *।हस्तपदातिवच्छिष्यः।।’* गुरुला शिष्य स्वत:च्या हातापायाप्रमाणे असतात. हे मी तुलाच लिहितो असे नाही, *शिष्य म्हणून असणांऱ्या सर्वांनाहि हे समान आहे. मवाळपणा थोडा सुद्धा असू नये ‘सावध साक्षेपी आणि दक्ष’ असा शिष्य श्रीसमर्थांना मान्य आहे.* असो.

श्रीसमर्थ कृपेने तुम्ही सर्वहि संप्रदायाला भूषणावह व्हा ! श्रीसमर्थ तुम्हा सर्वांना आपल्या कीर्तीला अनुरूप असे बनवोत.

दोनशे रुपये एकाला सांगितले होते. त्याचे ते पैसे येऊन पोहोचले असतील तेहि पण कळविले नाही अगदी ‘निजेले घोरती घोरे’ असे झाले शब्दाची किंमत आणि वेळे चे महत्त्व लक्षात येत नाही. सर्वहि तुम्ही श्री समर्थ कृपेने पूर्ण कार्यक्षम व्हा !!

माझ्याकरिता म्हणून रोज श्रीसमर्थांना एकादशणी करीत जा! एकादशणी करण्यास वेळ मिळाला नाही तर एक आवर्तन रोज करून गुरुवारी, शनिवारी मात्र एकादशण कर, वर दोन मारुती आहेत. एक मोठा श्रीरामाजवळचा व एक श्रीरामपंचायतनातला बारका मारुती समाधीवर ठेवून अभिषेक माझ्या नावाचा संकल्प करून करीत जा! पुरे म्हणून कळवीपर्यंत अभिषेक चालावा, तू अभिषेक केलास म्हणजे माझी सेवा रोज श्रीसमर्थ चरणी नमूद होईल. पूर्वीचा मारुति तुमच्याकडेहि एक आहे असे वाटते. तो ठेवला तरी चालेल. अगदी दुर्लक्ष्य होता कामाचे नाही.अभिषेक तूंच म्हणजे xxxx नेच करावा. श्रीसमर्थकृपेने कसलेहि विघ्न मध्ये न येवो. चि. xx ला गांवच्या म्हणजे तुम्ही राहाता त्याच्या पुढच्या मारूतीला कैवल्योपनिषदांची एकाशणी सांग.

आम्हा सर्वांच्या प्रकृति बऱ्या आहेत. तुमच्या कर्तबगारीवर तेथील भवितव्य आहे. या पत्राबरोबर एक रुपया आणि व्यासपूजेच्या मंत्राक्षता पाठवून दिल्या आहेत. त्या माझ्या फोटोजवळ ठेवून नित्य फोटोबरोबरच एक वर्षभर या दोन्हींची पूजा झाला पाहिजे. वर्षापर्यंत ठेवून नंतर वेगळे आलेले त्या ठिकाणी ठेवून पहिले काढावे. वर्षावर्षी एक रुपया, मंत्राक्षता, शक्य झाल्यास नारळ पाठवत जाईन, यामुळे तुम्हाला तिथे काही कमी पडणार नाही.

आजच्या लिखाणात थोडी तीव्रता तुम्हाला अाढळेल, पण *शिस्तीशिवाय कोणचे कार्य यशस्वी होत नाही.* तुम्ही तर जबाबदारी घेतली आहे. श्रीसमर्थ साभिमानी आहेत. तुमच्याकरवी गडावर मोठमोठी कार्ये होणार आहेत. मात्र त्याकरता आपली लायकी दिवसेंदिवस वाढत्या प्रमाणाची तुम्ही दाखवित चला. *’कळावया कारणे । न्याय निष्ठूर लागे बोलणे।”*

श्रीमारुतीस्तोत्र तपासून त्यातल्या सुधारणा करून या पत्राबरोबर पाठविले आहे. पुन्हा पुण्याला कोणाला तरी दाखवून सूचना आल्यास दुरुस्त करून पाठवितो.

सौ. xxx ने केलेले इकडे पाठविले नाही. तिने लिहिलेली प्रस्तावना तपासली आहे. तेहि लिखाण तपासून पाठवलें असतें. एकदां का समाजात प्रवेश केला कि मग मला वेळ कसला तो मिळत नाही. श्रीराम व श्रीसमर्थ पाठाच्या प्रस्तावने संबंधातहि काही कळविले नाही.

तुम्ही सर्वहि खुशाल आहात ना? तसे काही असल्यास कळवावे. श्रीरामपाठाच्या मुखपृष्ठावरील भागावर आंतबाहेर अशा चार ठिकाणी श्रीसमर्थवचने देण्याविषयी लिहिले होते. काही कोठे मला सुचवावयाचे झाल्यास कोणत्याहि बाबतीत भिऊ नये. इथे काही शेळी वाघाचा व्यवहार नाही. संकोचहि नसावा. *गुरुशिष्या एकचि पद।* दूरदृष्टि ठेवून वागावे. स्वपरहिताच्याच गोष्टी व्हाव्यात. ‘दुःख दारिद्र उद्वेगे । लोक सर्वत्र पीडिले । ते तुमच्या सारख्या कडूनच सुखी होणार.

श्रीरामाला वाहिलेले गंध माझ्याकरिता पाठवा. अभिषेक झाल्यानंतर तुमच्यापैकीच कोणातरी उगाळलेले गंध वाहून हेच मला महिन्या पंधरा दिवसाला बरेच पाठवून देत जा. अन्नदान व्यवस्थित चालू द्या. पैसे पाठवीन. श्रीसमर्थ कृपेने सर्वहि ठीक चालेल. *तुम्ही सर्वजणहि एकमताने वागा. आपलाच हेका न चालवतां सर्वांच्या मते युक्त जे असेल तसे दुराभिमान सोडून वागण्याची धीरोदात्त सवय तुमच्या आंगवळणी पडू द्या. खेळीमेळीने सर्वहि कामें करावीत. निस्पृहाचे जीवन जगत्कल्याणाकरिता असते. तो विश्वसुखमूर्ति असतो. निस्पृहाने आपले ब्रह्मानंदात्मक जीवन जगत्हिताचे आहे असे मानावे.*

*एका मानव देहांत इंद्रिये जशी आपापली कामे करतात त्याप्रमाणे एका सद्गुरुच्या संप्रदायात असलेल्या मंडळीनी आपापली कामे करावीत. कामें वाटली गेली म्हणजे कोणावरहि ओझें पडत नाही. काही एकांतात व काही लोकांतात सर्वांचा काळ ‘सुखासमाधानाने’ जाऊन स्वपरहित सर्वानाच साधता येतें. उपासनेची कार्येहि व्यवस्थितपणे पार पडतात. अनंत आनंदमात्र असणारे अापले दिव्य स्वरूप कधीहि दुःखी होत नाही. शोकमोहाची अडचण कसली ती त्याला कधीच होऊ शकत नाही. या नित्य सचिदानंदात्मक स्वरूप दृष्टीने आपापली कामे व्यवस्थितपणे करावीत शांतता, गांभीर्य, औदार्य, सर्वसामंजस्य, आत्मीयतृप्ति प्रत्येक कार्यातून दिसत असावी.*

सर्वहि एकोप्याने आहात नां? तुमच्या अनुकूलतेप्रमाणे केलेल्या कार्यविभागानुसार बिनबोभाट सर्वहि वागतात नां? चालत्या बैलालाच काम सारखे पडल्यासारखें तर होत नाही ना? सर्वांनाच माझे सांगणे आहे. मागचे किटाळ अजून काही असेल तर सबंध झाडून टाकून स्वच्छ व्हा. नवजीवनाने श्रीसमर्थाचें कार्य करा !! क्षणोक्षण नवा हुरूप बाळगा !! रोजचे तुमचे वर्तन उत्तरोत्तर प्रगतिपर आहे असें तुम्हाला आढळून येऊन आनंद वाढत गेला पाहिजे.

श्रीसमर्थ कृपेने सर्वाना शांति आहे ना ? सेवेने मन शांत होते. सेवार्थ घडणाऱ्या कर्मात स्वार्थ नसल्यामुळे ती कर्मे बाधक होत नाहीत. सेवेने विनय अंगी बाणतो. ममत्कार उरत नाही. आपल्या आवडी-निवडीकडे लक्ष पुरवायला होत नसल्यामुळे मनोजय साधतो. देहाभिमान नष्ट होतो. परमात्म्याचे ध्यान अखंड घडते.

*’सर्वे जनाः सुखिनो भवन्तु।’*

*श्रीधर*

home-last-sec-img