Letters

पत्र.क्र. २४

*© श्रीधर संदेश*

*॥ श्रीराम समर्थ ।।*

*श्रीमत् प. प. भगवान सद्गुरु श्रीधरस्वामीमहाराजांचा आशीर्वाद*

*आरोग्य भाग्य लाभो, लाभो गुरुभक्ति मोक्ष ऐश्वर्य ।।*
*विद्या परा तशी ती, अपरा संपत्ति थोर औदार्य ।।*

बाळानों ! आनंद हे जगाचे सत्य रूप आहे. स्वतःसिद्ध स्वप्रकाश अद्वितीय स्वरूप समजून निष्काम असणे व जगाची उत्पत्ती त्या आनंदाकरितां निष्प्रयोजक अशी मायेने भ्रांति निर्माण करणारी आहे, म्हणून तिला महत्त्व न देतां आत्मतृप्त असणे हा निवृत्तिमार्ग आहे. तुम्ही सर्व या परमोच्च निवृत्तिमार्गाचे अधिकारी आहा.
*मनोनिग्रह, इंद्रियजय, सर्वसमत्व, विश्वबांधव्य, विश्वात्मप्रेम, शांतस्वभाव, परोपकार, मृदु मधुर सत्याचे हितावह असे सर्व माणसाशी उदात्त आचरण असणे, प्रत्युपकारार्थ उपासनेची कार्ये, श्रीगुरुसेवा मनोभावाने आणि निरलसपणे चालविणे ही निवृत्तिमार्गियांची लक्षणे होत.* अशा आदर्शजीवनाचे तुम्ही सर्व सद्भक्त, सत्शिष्य व जीवनमुक्त ज्ञानी व्हा !!

भाग्यवंतानों ! तुम्हा सर्वांवर परब्रह्म परमेश्वराची पूर्ण कृपा होऊन भक्ति-ज्ञान-वैराग्याने तुम्ही आदर्शाचे सर्व सद्गुणमंडित असे दिव्यजीवन चालवून पूर्ण कृतार्थ व्हा असा तुम्हा सर्वांना माझा हार्दिक आशीर्वाद आहे.

*आत्मसौख्ये सर्व सुखी असो जग।अज्ञान, उद्वेग नष्ट होवो ।।*
*पाप, ताप, भ्रांति, रागद्वेषादिक । नासोनिया लोक सुखी होवो।*
*नीतिन्यायें वर्तो जीवमात्र जगीं ।कोणी न अभागी भूमी वसो।।*
*सर्व हि सुखी असा । नातळोनि माया फांसा ।*
*नित्यानंद स्वरूपाची दशा । उजळो अखंड ।।*

*श्रीधरस्वामी*

home-last-sec-img