Letters

पत्र.क्र. २५

*© श्रीधर संदेश*

*।। श्रीराम समर्थ ।।*

*सज्जनगड ३-९-१९६२*

*निवृत्तिमार्ग रहस्य*

*लाडक्या बाळांनो !*

माझे साधकांवर जेवढे प्रेम आहे तेवढे माझ्या देहावर नाही. तुम्ही सर्व बंधु-भगिनींनी आनंदात असावे. तुम्हापैकी कोणासहि दुःख या वेदना झाल्यास त्या मला अतिशय अस्वस्थ करतात. माझ्यावर विश्वास ठेवणारे सर्व तुम्हापैकीच होत. एकमेकांवर प्रेम करून व सहाय्य करून तुम्ही सर्वानी आनंदी असावे. कोणी कोणालाहि शब्दांनी दुखवू नका

हा दृश्य प्रपंच शून्य आहे व शाश्वत, नित्य असें एकमेवरूप असणारे हे आनंदघन ब्रह्मतत्त्वच स्वस्वरूप आहे असे समजणेच निवृत्तिमार्ग होय. निवृत्तिमार्गात कोप-ताप, राग-द्वेष आदींचा संपर्कच असत नाही. आपणासह सर्वांना एकमेव आनंदघन ब्रह्माशिवाय अस्तित्व नसून, त्या अखंड स्थितीत राहणे हेच निवृत्तिमार्गाचे लक्षण होय. हा एक सुंदर, पवित्र व नितांतशांतीचा मार्ग आहे. सर्वोत्कृष्ट असणाराच हा निवृत्तिमार्ग होय. सत् श्रृतीय तसेंच सर्वोत्तम जनांना हा मार्ग सहज सापडतो नाही का?

कोणालाही उपद्रव न देता सर्वावर उपकार करणारे दिव्य अध्यात्म जीवन साध्य करण्यासाठी रात्र-दिन प्रयत्नशील असणारे तुम्ही धन्य आहांत!

बाकी सर्व क्षेम. तुमचे क्षेम लक्ष्मीनारायणाच्या द्वारा कळवित जावे गुरूसेवा करून सुखी व्हा ! तुम्ही सर्वानी त्या परमतत्त्वाच्या ध्यानांत मग्न असावे.
गुरुकृपा कोणाला प्राप्त होते ? तुम्ही सर्वानी प्रपंच, सगे-सोयरे ऐहिक सुख यांचा त्याग करणे म्हणजेच गुरुकृपा नव्हे का ?

*’सर्वे जनाः सुखिनो भवन्तु ।’*

*इति शिवम्*

*श्री श्रीधरस्वामी*
*( मूळ कन्नडवरून अनुवादित )*

home-last-sec-img