Letters

पत्र.क्र. २७

*© श्रीधर संदेश*

*॥ श्रीराम समर्थ ।।*

*प्रचाराची अनावश्यकता*

*व्यंकटराव केणीस पत्र*

कोणताही प्रचार करावयाचा असला म्हणजे एकाचे दोन करुन सांगावे लागते. पण *गोष्ट फुगवून सांगितल्याने आपल्यात असलेली निष्ठा नाहीशी होते. ‘खोटे सांगून लोकात त्याचा प्रचार मीच केला नाहीतर त्यांना कोण विचारतो?’ असा विचार मनात येऊन अहंकार वाटू लागतो.* गुरुंनी आपण सांगितल्याप्रमाणे वागावे असे वाटू लागते. गुरुंनी चार हिताचे शब्द सांगितले असता ते जर आपल्या गोष्टीच्या विरुध्द असले तर राग येतो. हया रागाच्या भरात ‘तुमचा प्रचार करणारा मीच आहे’ असेही तो बोलून जातो. शेवटी शेवटी ‘हे आपल्या म्हणण्याप्रमाणे न वागता त्या विरुध्दच वागतात’. असे वाटून राग वाढत जाऊन द्वेषही वाढू लागतो आणि मग त्यांच्या तोंडून थोड्या अधिक प्रमाणात निंदेला सुरुवात होते. दुसऱ्या एखाद्या महात्म्याकडे जाऊन मिळावे असे वाटते. दुसऱ्या महात्म्याचे शिष्यत्व पत्करून त्यांना पुढे आणण्यासाठी, पहिल्याची स्तुती करीत होता त्याची कमीजास्त निंदा नालस्ती करूं लागतो. अशी उदाहरणे पुष्कळ आहेत व त्यामुळे प्रचार करण्याची पध्दतच नको असे मी माझ्या भक्तांना सांगत असतो. *तुम्हाला भक्ती असेल तर अंतरंगातील निष्ठा वाढवा, मोक्ष मिळण्याची इच्छा वाढवा, बहिरंग सोडून द्या असे माझे सांगणे आहे. सूर्यप्रकाशाचा प्रचार करावा लागत नाही, त्याप्रमाणे तेजस्वी महात्म्यांना प्रचाराची आवश्यकता नसते. अनुभवास येऊन वाढलेली भक्ती सुध्दा काही काही प्रसंगी ढासळण्याची शक्यता असते* तेव्हा सांगून सवरून निर्माण झालेली भक्ती किती दिवस टिकेल? पहिली गोष्ट म्हणजे मी एकांतासाठी तिकडे येत आहे असा प्रचार नको असे सांगणे आहे. सांगावयाचे असेल तर आपल्याला आलेले, आपण पाहिलेले अनुभव मात्र सत्य, सत्य अशा रितीने वाटले तर चांगल्या चांगल्या मनुष्यांना सांगितल्यास त्यांची निष्ठा दृढ होऊन ते त्यांच्या मुक्तीस कारणीभूत होईल.

*श्रीधरस्वामी*

home-last-sec-img