Letters

पत्र.क्र. २८

*© श्रीधर संदेश*

*॥ श्रीराम समर्थ ।।*

*सज्जनगड*

*दिनांक २८-३-६०*

*सर्व भक्तसमुदायांस माझा आशीर्वाद.*

तुम्हा सर्वांचे जीवन सर्वप्रकारें सुखपूर्ण होवून तुम्ही सर्वानी शांतिसमाधानयुक्त दिव्य जीवन आनंदाने पूर्ण करून धन्य होवून, कृतकृत्य होवून उपभोगावे असे माझें अंतःकरणपूर्वक सांगणे आहे.

*तुम्ही सर्वांनी आपापले व्यवसायकार्य उत्तमप्रकारे दक्षतेने करून उरलेल्या वेळांत भक्तिभावाने जनसार्थकासाठी मनाच्या एकाग्रतेने निष्ठने उपासना करावी. नित्यनैमित्तिक कर्म सोडू नयेत. देव-पितृकार्य, कुळधर्मकुळाचार भक्तिभावाने नियमित करीत असावे. लोकव्यवहार उत्तम प्रकारे करीत जावा. मन ताब्यात ठेवून गंभीरतेने वागावे. स्वरूपाचे ध्यान धरून त्याप्रमाणे वागावे व आनंदस्वरूपाच्या अनुभवाने जीवन घालवावे. अंधश्रध्दा व अंधभक्तीने काही केल्यास लोक तुम्हाला ढोंगीच समजतील व त्यामुळे तुम्ही लोकांच्या हास्यास कारणीभूत व्हाल !!*

*उपासना सामुदायिक करावी. सर्वांनी एकत्र मिळून केलेल्या उपासनेस ‘सामुदायिक उपासना’ असे म्हटले जातें. भजन, पूजन, प्रार्थना, नामजप, ध्यान, आत्मविचार, श्रवण इत्यादी ह्या सामुदायिक उपासनेत येतात. आपले वागणे, बोलणे व बघणे याद्वारे सर्वांना संतोषित करणे हे मनुष्याचे खरें जीवन होय, परोपकार करणे हे मानवी जीवनातील सर्वश्रेष्ठ ध्येय होय. नय-विनय, हित-मित, मधुर मृदु, सत्य भाषण, शील व सद्धर्माचे आचरण ही सर्व मानवास मुक्त करणारी लक्षणे होत.*

*ध्यानामध्ये किंवा स्वप्नामध्ये श्रीसद्गुरुचे दर्शन होवून तुमच्या प्रश्नांचे श्रींच्या मुखाद्वारे समाधान होणे, उत्तर येणे अत्यंत महत्त्वाचे आहे. श्रीसद्गरूच महान मंगल, परमपवित्र आनंदघन असणारे परमात्म्याचे प्रथम स्वरूप होत, तुम्हास सदगुरु रूपांत अनुभवास आलेले त्यांचे विविध दर्शन घडणेच तत्त्वसाक्षात्कार होय.*
*माझ्या दर्शनाचे स्वरूप मी वर निर्दिष्ट केले आहे साध्य ते झाल्यास या लोलाविग्रहापासूनहि दर्शन घडू शकते. जगाचा हा संसार दोन दिवसांचा आहे. स्वप्नांतील अनुभवानुसार निष्कामतेने भक्ति करावी. त्यामुळे मनाची भूमिका जास्त व्यापक होवून अचल भक्ति, शांति व समाधान या गोष्टी स्थिर होतात. आत्मानंद उफाळून येतो.*

*सत्कीर्तीयुक्त सद्भक्त बनून सन्मार्गाने वागून शुद्ध आत्मानंदयुक्त दिव्य जीवन कंठून तुम्ही धन्य व कृतकृत्य व्हावें !!*

*- सर्वांचा आनंदघन आत्मा*

*श्रीधरस्वामी*
(मूळ कन्नडवरून संकलित)

home-last-sec-img