Letters

पत्र.क्र. ३३

*© श्रीधर संदेश*

*श्रावण १८९३*

*श्रीक्षेत्र काशी येथे श्रीमत् प. प. सद्गुरु भगवान श्रीश्रीधरस्वामी महाराजानी सौ.सावित्री भागवत यांना केलेला दिव्य-उपदेश*

*बाळे !* स्तुति केली असता उल्हसित होणे व निंदा केली असता खिन्न होणे हे दोन्ही हि देहाचे अभिमान होत. *स्वरूपस्थितीच्या अखंड धारणेने अभिमान नष्ट केला पाहिजे. स्वरूपस्थिति ही सहज पूर्ण निर्विकल्प आत्मस्वरूप आहे. तिच्या धारणेचा निरंतर अभ्यास केला पाहिजे. तीत इतर कोणत्याहि द्वैत कल्पनेला स्थानच असत नाही. इतक्या खोलवर जाऊन आपल्या अहम् स्मृतिरहित निविकल्प, निविकार, निरंतर असे रूप स्वप्रकाशक, अहम् भावाचे मूलतत्व असणारा एकमेव आत्माच सर्वत्र व्यापक आहे व तेच माझे स्वरूप आहे अशा दृढनिश्चयपूर्वक नित्य निर्विकल्प स्थितीतच सदासर्वदा राहिले पाहिजे.*

अहम् -स्फूर्तिनंतर माया-अविद्येचे क्षेत्र आहे. महानटी असलेल्या मायेकडे जीवाकडून दृष्टिपात होताच पूर्वस्थितीची विस्मृति होऊन बहिर्मुखतेस प्रारंभ होतो व हळू हळू घसरत तो जीव संसार समुद्रातील खोल भागात जाऊन पडतो. मग स्वरूपाची विस्मृति होते व हृदयात मनाच्या निरनिराळया विक्षेप शक्ति पसरून त्या चांचल्य, आशा, तृष्णा आदींच्या रूपाने परिणामित होतात. हयाच मनाच्या वृत्ती विषरूपी विषयांचे सेवन करून जीव भानाशी बद्धमान होऊन जन्ममृत्युरूपी भवचक्रांत फिरवावयास लावतात. *गुरुची पूर्ण कृपा होताच जीवास तत्त्वाचा साक्षात्कार होऊन मोक्षाची प्राप्ति होते आपल्या हृदयांतील विक्षेपवृत्तीच्या अधिकतेसाठी आत्मस्वरूप हा एक प्रसाद समजला पाहिजे. बन्धन व मुक्ति ही दोन्ही अज्ञान व ज्ञान यांचाच विलास होय.*

*उद्भवणा-या प्रत्येक कल्पनेचे वजन- माप करून तीत आत्मस्मृति व विस्मृति किती आहे हे पहा. तींतील स्मृतीचा भाग वाढवीत जा अाणि विस्मृतिचा भाग कमी करण्याचा प्रयत्न कर. प्रत्येक वृत्तीचा स्वरूपांतच लय करण्याचा प्रयत्न कर.*

*दोरीच्या ठिकाणी सर्पाचा भ्रम वाटतो पण बारकाईने पाहिल्यावर त्या दोरीच्या ठिकाणी सर्प असत नाही व सर्पाची भीतिहि रहात नाही. असाच विचार करून आपली वृत्ती आत्म्याकडे नेऊन ज्ञानदृष्टीने पाहिल्यास तेथे इतर काही नाही हे आढळेल. हेच सद्गुरुंचे यथार्थ स्वरूप आहे. हेच ब्रम्हैक्य होय व हीच गुरुची सेवा होय. हाच आपला आत्मा आहे अशा अद्वितीय तत्त्वाच्या धारणेने इतर काहीहि नाही असे निश्चयपूर्वक, अहंब्रह्मास्मि या स्फूर्तीच्या अगोदर असणाऱ्या अखंड ज्ञानगम्य, सत्यस्वरूप, आनंदघन अद्वितीय स्वरूपात इतर कोणतीहि कल्पना न उठणे हीच स्वरूपस्थिति होय. इति।*

*तुझाच आत्मा*
*श्रीधर*

home-last-sec-img