Letters

पत्र.क्र. ४१

*© श्रीधर संदेश*

*।। श्रीराम समर्थ ।।*
*मिती आषाढ शु. १ शके १८८३*
*दिनांक १३ जुलै १९६१*

*चि. गंगाधर गंगाराम अंबेकर यास आशीर्वाद*

बाळ, तुझे पत्र महत्त्वाचे वाटल्यावरून श्री समर्थ सेवा मंडळातील श्रीगुरुभक्त चि. दिनकराने ते माझ्याकडे पाठवून दिले. सबंध पत्र वाचून बघितले. वर्णाश्रमधर्मपालनाची तुझी आवड, श्रद्धा, भक्ती, विनय, पाहून मनास समाधान झालें, चित्तास आल्हाद झाला. आतां तूं विचारलेल्या प्रश्नांची क्रमाने उत्तरे देतो.

१) सर्व पंचांगातून श्रीदत्तजयंती मार्गशीर्ष पौणिमेस दिलेली असते. श्रीधर जन्म त्याच दिवशी झाल्यामुळे भक्त त्याच दिवशी दोन्हीं जयंत्यांचा उत्सव साजरा करतात.

२) व्यंकटेशस्तोत्र मराठीत ओवीबध्द असलेले मिळते. फारच गोड आणि श्रद्धाभक्तीने ओथंबलेले आहे. संस्कृत भाषेचे उच्चार कठीण असतात. अर्थहि समजत नाही. संतांनी यासाठीच मुद्दाम प्राकृत रचना केली आहे. उच्चारांत थोडा फरक झाला म्हणजे संस्कृत भाषेच्या शब्दांच्या अर्थाचा अनर्थ होतो. तेव्हा होईल तो प्राकृत ग्रंथ शुध्द वाचावे. त्याने अर्थबोध होऊन श्रध्दाभक्ति वाढते व मनास आनंद होतो. संस्कृत स्तोत्रच वाचावयाचे झाल्यास योग्य ब्राह्मणाकडून सांगवून घेऊन वाचल्यास हरकत नाही. संस्कृतज्ञ ब्राह्मणाकडून योग्य उच्चार शिकावेत. त्यांनी उच्चार योग्य होतात असे म्हटल्यानंतर स्वतंत्रपणे वाचण्यास हरकत नाही. तीर्थ घेतल्यानंतर पूजा, जप न करतां, पूजा, स्तोत्र, जप, वंदन करून मग तीर्थप्रसाद घ्यावा. जपाचा उच्चार करीत पूजा करावी. मानसपूजा करून म्हणजे आरतीनंतर पायांवर फुले वाहून स्तोत्र म्हणावे. स्तोत्रपठणानंतर प्रदक्षिणा नमस्कार घालून, आधीं ध्यानाचे श्लोक म्हणून, देवाच्या, गुरुच्या प्रसन्न वदनाकडे बघत त्यांची कृपापूर्ण दृष्टी मनात आणून, त्यांच्या स्मितहास्यात प्रगटलेल्या स्वरुपानंदाचे चिंतन करीत त्या आनंदात रोजचा ठराविक जप करावा. जप करुन झाल्यानंतर पुन्हा एकदा मानसपूजा करुन, पुन्हा एकदा सर्व ध्येय मूर्तीना नमस्कार घालून, आपल्या हृदयातच त्यांना साठवावे व आसनावरुन उठावे. हृदयांत श्रीगुरु, परमात्म्याचे नित्य अस्तित्व आहे म्हणून दृढविश्वासाने असावे. त्यांच्या आनंदरुपाचे ध्यान करावे. आसनावर बसल्यावेळी ठराविक जप करावा, तसा फावल्यावेळी सदासर्वदा जप मनातल्या मनात करीतच असावे. ध्यान करण्याचा तुझा क्रम बरोबर आहे. साखरेचा पाक आणि साखर, पाणी आणि गार यामध्ये जसा भेद नाही त्याप्रमाणेच निराकार साकार यांत भेद न मानता ध्यान करावे निर्गुण आनंदरूपच आपल्या उध्दाराकरता व अर्पण केलेली सेवा स्विकारण्याकरितां सगुण साकार होऊन, देव व गुरू या रूपानी दर्शन देत आहे असे मानावे. ब्रह्मरूप श्रीरामच श्रीशंकरांच्या श्रीगुरुंच्या रूपाने दर्शन देतात, अद्वितीय आनंदरूप श्रीभगवान रामचंद्रच श्रीशंकर श्रीगुरु झाले आहेत असें मनांत आणावे.

३) एकादशी निर्जली करणे शक्य न झाल्यास पाणी पिऊन करावी. तसेहि शक्य न झाल्यास दूध, फळे खाऊन एकादशी करावी. तेंहि शक्य न झाल्यास साबुदाण्याची खिचडी, थालपीठ खाऊन एकादशी करावी. हेहि न बनल्यास वऱ्याचे तांदूळ, वऱ्याच्या तांदुळांचा भात, शेंगदाण्याची चटणी बटाटयाची भाजी पोटभर घ्यावी. जेवावेच लागल्यास तांदूळ भाजून त्याचा भाजी भात करून खावा. होईल तो उपवासाचे घ्यावे. एकादशी दिवशी एकवेळ तीर्थ घेण्याची पध्दतहि आहे त्याप्रमाणे करावें. वैष्णव संप्रदायांत नुसते एकवेळ संध्येच्या लहान पळीने तीर्थ घेऊन निर्जली करण्याची प्रथा आहे.

श्रीधरस्वामी

home-last-sec-img