Letters

पत्र.क्र. ४८

*© श्रीधर संदेश*

*श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराजांनी केलेले साधकांचे उपदेशयुक्त समाधान*

( ध्वनीपट्टीवरुन संकलीत )

*’आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणञ्च वसिष्ठकम् । श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं जगद्गुरुम् ।।*

*’शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे। वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे ॥ कवी वाल्मिकासारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा ।।’*

*’आम्हा तुम्हासि भववारिधिमाजि तारू । जो वाचितां परिसितां मग होय तारू । से दासबोधरचना घडली जयाला । वन्दू निरंतर तया गुरुराजयाला॥’*

*’देवा, ॐ ॐ ss” -*

तुमचं हे पत्र पाहिलं…. एवढं वाईट वाटून घेण्यासारखं काय आहे सांगा त्यांत. छे! छ! छे! मला मुळी कधी तसं वाटणारच नाही. तसं मनांत अगदी-अगदी-अगदी आणू नका, हे पहा ! अमृतसमुद्राच्या ठिकाणी कधी रोगाची भिती असते का ? कां मरणाची भिती असते ? दोन्हीहि नाही’ सूर्यप्रकाशांत अन्धार असतो का ? नाही, तेव्हा अशादृष्टीने *सद्गुरु म्हणजे सर्व चिन्तावधि: गुरुः । सर्व चिन्ता जातात सद्गुरुंच्या सान्निध्याने कृपेने, सदगुरुच्या सेवेने तेथे चिंतेला अवकाश आहेच कुठे?*
मी म्हणतो, ‘न हि कल्याण कृत्कश्चिद दुर्गति तात गच्छति…!’
*सदगुरु म्हणजे ‘ब्रह्मानंदं* *परमसुखदम् ।’ तो ब्रह्मानंदरूपी असतो. परमसुखदं म्हणजे ब्रह्मानंदच देतो. तो केवळ ज्ञानानीच ओतीव मूर्ती असतो. अनिष्ट, अरिष्ट, अभद्र, दुःख, अनहित, कोप, शाप त्याच्या ठिकाणी अजिबात यांचा प्रवेशही नाही, यांचं नावही नाही. तो संबंध मंगलरूप जगाच्या त्या शुद्ध स्वरूपाची आनन्दघनमूर्तीच. त्या ठिकाणी वाईट असे काहीच नाही.*

सदगुरु करायचा कशाला, सांगा ?- ‘मोक्षाकरितां.’
सदगुरु काय देतो? – ‘मोक्ष देतो.’ सर्व अरिष्ट, अनिष्टांपासून तो सोडवितो. वाईट प्रारब्ध घालवितो, ज्ञानाने तो जीवनमुक्त करतो, लोकांना वाईट करीत नाही, वाईट असं काहीच त्याच्यात नसते. तुमची काहीतरी कल्पना झालेली आहे. तशी करूं नका बरं–! केव्हाही तुमच्या बाबतीत तशी कल्पना करूच नका. आणि तुम्ही काय वाईट केलंत? कोणते दुर्गुण आहेत ? काही नाही. काही नाही. तशी काय कल्पनाच करूं नका. सर्वांवर सारखा सदगुरु असतो बरं ! तो आनन्दरुप आहे, त्याच्याकडून मोक्षसुखच मिळते. एरवी वाईट असे काहीच होत नाही. काळजी करू नका, तसे काही नाही. मला कधीच वाईट वाटत नाही कोणावरही राग येत नाही. कोणाचेही अनिष्ट मी चिंतीत नाही, हे सर्वही परब्रह्मरूप आहे. शिष्यसुद्धां परब्रह्मरुप आहे; अशी धारणा!

‘एकमेवाद्वितीयं ब्रह्मं!’ अरे , हे आहे ते अवघे ब्रह्मची । अशी धारणा साधकांची असते. मग मी तर काही पुष्कळ वर्ष केलीच आहे की नाही ? मग माझ्या ठिकाणी एक परब्रह्माशिवाय दुसरी कल्पना कशी बरे उमटेल ? सांगा! आज साधनेत साधारण चाळीस, पन्नास वर्ष तर जवळ जवळ घालविली मी, त्या माझ्यात कधी अनिष्ट कोणाविषयी उत्पन्न होईल का? इतकी वर्षे ब्रह्मस्वरूपाचा अभ्यास करीत असताना माझ्या ठिकाणी हे सर्वही परब्रह्मस्वरूपच आहे अशा धारणेशिवाय कसली तरी कुटिल कल्पना कुणाचं तरी अहित करावे किंवा कोणावर तरी रागवावं … असे काही नाही. आम्ही अनुग्रह करतो ते स्वरूपाच्या दृष्टीने, आमचं हे सर्व अखंड परब्रह्मस्वरूप आहे, आनंदघनस्वरूप आहे, मंगलस्वरूप आहे, पवित्रस्वरूप आहे, अशा दृष्टीने अनुग्रह करतो बरं ! आम्हाला शिष्य म्हणजे स्वरूपच आनंदघन, मंगल परमपवित्र असे ते ब्रह्मस्वरूपच, वेगळया दृष्टीने आम्ही पहात नाही. आम्हाला कोणाकोणावरही कन्टाळा येत नाही, राग येत नाही.

*’सद्गुरु पालटे अवगुणासी । नाना यत्ने ।’* असं समर्थांनी सांगितलंय, एखाद्यावेळी तो. , . असा जरी असला तरीही पुन्हा त्याच्या हातून चुका होवू नयेत म्हणून प्रेमळ आई-बापानी जसं नेणत्या लाडक्या मुलाला वाढवावं त्याप्रमाणे सद्गुरु वाढवतो. त्याच्या ठिकाणी शिक्षा नाही, क्षमा आहे आणि तेही त्याच्या हिताच्या दृष्टीनं, तसं काही झालं तर ‘बाबा असं करूं नको’ म्हणून प्रेमळ शब्दांनी तो सांगतो ‘हे सर्वही गुरुचेपाशी.’ त्याच्याकडून वाईट होत नाही. व्यावहारिक दृष्टीने भूमिका जर वाढली नसेल एखाद्याची, तर तो पूर्ण भूमिका वाढवतो, रागवत नाही.

तुमच्या ठिकाणी तर काहीच तशी चूक मला आढळत नाही, तुमचे अन्तःकरण म्हणजे फार मोठं. आणि माझ्याच विषयी बोलताना तुम्ही असं म्हटलंय म्हणे की, ‘मला आई-वडिलांची सुद्धा चिंता लागली नव्हती. पण स्वामींची चिंता मला लागली आहे.’ मग अशा तुमच्या गुरुभक्तीकडे बघून कोण बरे रागावेल ! तेव्हा तशी काही-काही अजिबात कसलीही कल्पना करू नका पाहूं अगदी, हां, हे पहा ! मी ज्यावेळेला तपाला निघालो की नाही, त्या वेळेला प्रथम प्रार्थना मी जी परमेश्वराची केली, जी रामरायाची केली ती ही की, माझ्याकडून कुणाचंहीं अकल्याण होवू नये, मला कुणावर राग येवू नये, कोणाचही अनिष्ट चिंतन माझ्याकडून होवू नये, सर्वांचा उद्धार व्हावा ही पहिली प्रार्थना माझी आहे. आलं का ध्यानांत ! तेव्हा मला राग येईल, गुरुकोप होईल, काहीतरी अनिष्ट होईल, अशी तुम्हीच काय पण कोणीच कल्पना करू नये, आलं का ध्यानात ! समजलं का? बिंबलं का! हां, तसं तुम्ही तसे मानू लागलात म्हणजे, हे पहा. मी जगाचा उद्धार व्हावा म्हणून प्रयत्न करतो आहे. माझं तप त्याकरिता आहे आणि माझ्याकडून अनिष्ट होईल अशी कल्पना कोणाला सुद्धा होवू नये अशी माझी प्रार्थना देवापाशी, देवानं मला असाच वर द्यावा म्हणून माझा हट्ट आहे.

अनिष्टाची कल्पनाच करूं नका बाबा. पहा.. *सोऽहं आत्मा तत्त्वमसी । ते ब्रह्मची तू आहेस।* गुरू काय म्हणतो सांगा. सोऽहं तेच माझे स्वरूप आहे, असं तो सांगतो. *’सोऽहं आत्मा ज्ञानधन । अजन्मा तो तूंचि जाण । हेची साधूचे वचन । सदृढ धरावे ।’* आलं का लक्षांत ! तुम्ही आनन्दघनरुपी आहांत, जन्म-मरण आत्मरुपाला नाहीच, छे-छे कधीच नाही. *’आत्मा-आनन्दात्मा-प्रियोह्मात्मा।’* आनन्दस्वरुप आत्मस्वरुप, त्याच्या ठिकाणी कोणती दुष्ट कल्पना, हो, राग, अमूक-तमूक छी-छी-छी ! ती कल्पनाच काढून टाका, नाही, नष्ट करा !

*’जो ब्रह्मज्ञान उपदेसी । अज्ञान अंधारे निरसी । जीवात्मया परमात्मयासी । ऐक्यता करी ॥ तो सद्गुरू.* तिथं अनिष्ट नाही बाबा, *न्यूनता नाही हे तत्त्व, विघडले देव आणि भक्त । जीवशिवपणे द्वैत । तया देव भक्ता येकांत । करी तो सद्गुरु ।। भरव्याघ्र घालूनि उडी । गोवत्सास तडातोडी। केलीं देखोनि सिघ्र सोडी। तो सद्गुरु जाणावा ।। प्राणी मायाजाळी पडिले। संसारदुःखे दुखवले । ऐसे जेणे मुक्त केले । तो सद्गरु जाणावा ।। वासना नदी माहापुरी । प्राणी बुडता ग्लांती करी । तेथें उडी घालुनी तारी | तो सदगुरु जाणावा ।। गर्भवास अतिसाकडी । इच्छाबंधनाची बड़ी । ज्ञान देऊनी सीघ्र सोडी । तो सद्गुरुस्वामी ॥ फोडून शब्दांचे अंतर । वस्तु दाखवि निजसार । तोचि गुरु माहेर । अनाथांचे ।। जीव येकदेसी बापुडे । तयासि ब्रह्मचि करी रोकडे । फेडी संसारसांकडे वचनमात्रे ।। जें वेदाचे अभ्यातरी। तें काढून अपत्यापरी । शिष्यश्रवणी कवळ भरी । उद्गारवचने ।*

तेंव्हा अशा या सद्गुरुलक्षणांत तुम्ही पत्रांत ते काही लिहिलंत तसं कांही कुठे आहे का पहा । .. राग येतो का? अनिष्टचिंतन त्यांच्यांत होते का ? हां, अवकृपा होते कां सांगा ! नाही, नाही, नाही बरं ! तुम्ही आनंदस्वरूपी आहांत, मीही आनंदस्वरूप आहे. आनंद हेच सत्यस्वरूप आहे. तेंच परमात्म्याचे स्वरूप आहे.

परमात्म्याहून अन्य असे कोणतें सत्य ठरेल बरं! आनंदस्वरूप ते आहे आणि त्याची प्राप्ती करून द्यावी हाच वेदशास्त्रांचा उपदेश आहे. त्याच्याकरितांच ‘सद्गुरू एक निवडून ठेवलेली व्यक्ती आहे.
*’करी लाभाविण प्रीती। ऐसी कळवळ याची जाती ।।* करी लाभाविण प्रीती, असं ते आहे.
तेंव्हा ती भावनाच संबध काढून टाका, धुवून पुसून अगदी स्वच्छ करून आनंदस्वरूपाच्या त्या दिव्यमय अति पवित्र अशा धारणेत रहा !! तुम्ही आनंदरूपच आहांत ! ”

*जय जय रघुवीर समर्थ ॥*

*श्रीधरस्वामी*

home-last-sec-img