Letters

पत्र.क्र. ४

*© श्रीधर संदेश*

*॥ ॐ ॥*
*बाळा !!*
चणे खावे लोखंडाचे । तेंव्हां ब्रह्मपदी नाचे ।। (श्री तुकाराम) __ भावी परमोत्कर्षाचा मार्ग बिकट संकटाच्या खाईतुनच गेलेला असतो. गाढांधःकाराच्या दुसऱ्या क्षणींच श्रीसूर्यनारायणाच्या मंगलमय दर्शनाची पहाट फुटते. काळजी करूं नकोस. परमात्मा अतिशय दयाळू माहे. परमात्मभक्तीचे कोवळे रोप चांगले वाढीस लागावयाला संसारातील जाच हे एक उत्तम प्रतीचे खत आहे. संसारांतील कष्ट हे टाकीचे घाव आहेत. यांतूनच परमेश्वराची सुन्दर मूर्ति बाहेर पडते. संकटें ही परमेश्वराच्या त्या अत्युन्नत पदाला पोहोचविणाऱ्या सुखमय पायऱ्या आहेत. त्या सर्व पायऱ्यावरून थोर थोर महाम्याच्या पवित्र चरणांचे सुन्दर ठसे मनमुराद पहावयास मिळतात. यातील प्रत्येक पायरी आपल्या मृदु मंजुळ ध्वनीने साधकांच्या अन्तःकरणांत असलेली खिन्नता घालवून जिकडे तिकडे भावी परमोत्कर्षाच्या आशेचे गोड किरण पसरवीत असते. साधकाला भासणारी संकटे अपकारक नसून उपकारकच असतात. ‘उपरि सकंटक साचे जयात सुरसाचे’ अशा या फणसाच्या वर्णनाप्रमाणे वरवर दिसायला जरी ही कष्टप्रद भासली तरी या साऱ्या संकटातून निर्विषय असे आत्मीय सुखाचे गरे साचे भरलेले असतात. प्रसूतवेदनेनंतरच पुत्रलाभ ! ! ! काही काळ थोडीशी कळ सहन करावी लागते. आढ्यातलाच आंबा चांगला पिकतो हे लक्षात ठेव.

साभिमानाने पोटाशी धरून लौकरच वात्सल्याने तुझे अत्यंतिक हित इच्छिणारा–

*श्रीधर*

परमेश्वर तुला या सर्व विषम परिस्थितीतून पार पाडो !!

*चिकमंगळूर*
*काँफीचा मळा*

home-last-sec-img