Letters

पत्र.क्र. ९

*© श्रीधर संदेश*

*चि. गोविंद नरहरि वैजापूरकर यांस आशीर्वाद*

बाळ ! पुष्कळ दिवस झाले तुला पत्र लिहावयास फावलेंच नाही. आज सकाळी दुसरे कसले काम नसल्यामुळे पण लिहावयास वेळ मिळाला. किती तरी दिवस झाले संदेश पाठवलेल्याला, अजून भाषांतर झाले नाही म्हणून ऐकिवात आहे. कुटुंबात कोणी तरी वारल्यामुळे चित्तस्वास्थ्य नाही व चित्तस्वास्थ्य नसल्यामुळे लेखनकार्य झाले नाही म्हणून कळविण्यात आले. तुझ्या कुटुंबातील व्यक्ति निवर्तल्यामुळे तुझ्याप्रमाणेच मलाहि दुःख होणे स्वाभाविक आहे.

हा मृत्युलोक. इथें ज्याचे आयुष्य संपते तो देह सोडून जातो. असे असतां निवर्तलेल्याचा विचार पुनः पुनः मनांत आणून हृद्रोग लावून घेण्यांत काय अर्थ आहे ! *गतं न शोच्यम् ।* असे एक शिष्टांचे वचन आहे. गेलेल्यांचा शोक काय करावा ! शोक केल्याने मेलेला परत येतो का? *अव्यक्तोऽयमचिन्त्योऽ मविकार्योऽयमुच्यते । तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि ।। अविनाशि तु तद्विद्धि येन सर्वमिद ततम् । विनाशमव्यवस्यास्य न कश्चित्कर्तुमर्हति ।।* या श्लोकाबरोबरच एक दुसरा श्लोक इथे या प्रसंगी लिहावासा वाटतो *मत्कर्मकृन्मत्परमो मद्भक्तः सङ्गर्जितः । निर्वैः सर्वभूतेषु यः स मामेति पाण्डव ।।* या श्लोकांचा विचार कर आणि कर्तव्यतत्परतेचा धडा गिरव. माझे भक्त इतके कोवळ्या मनाचे असावेत असे मला वाटत नाही. *सद्गुरुपदीं अनन्यता । तरी तुसी कायसी रे चिंता । वेगळेपणेंचि अभक्त उरोचि नको ।* मन एकाग्र करून कर्तव्यदक्ष हो ! सेवेकरितां प्राण गहाण ठेवलेल्यांची चिंता देवच करतो. त्याला त्याची चिंता करावी लागत नाही.

*अनन्याश्चिन्तयन्तीमा ये जनाःपर्युपासते । तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ।।*

*इतिशम्*

*श्रीधर*

home-last-sec-img