Literature

अज्ञातवाद

वेदामध्यें अज्ञातवादाचें समर्थन केलेले नाही.

सोऽन्वेऽष्टव्यः स विजिज्ञातिसव्यः । ( छां. उ. ८-७-१) 

तमेवं विद्वानमृत इह भवति । ( पुरुषसूक्त)

य एताद्वदुरमृतास्ते भवन्ति अथेतरे दुःखमेवापियन्ति । (श्वे.३-१०) 

त्या परमात्म्याचा शोध केला पाहिजे, त्याला जाणले पाहिजे. त्याला अशा रीतीने जाणणारा अमृतत्व प्राप्त करून घेतो. जे कोणी हे परमात्म तत्त्व जाणतात ते अमर होतात व बाकीचे मात्र दुःखच अनुभवितात.

देवं ज्ञात्वा हर्षशोकौ जहाति ।

-त्या परमात्म्याला जाणूनच हर्षशोकांचा त्याग करतो. 

पुरुष एवेदं विश्वं कर्म तपो ब्रह्म परामृतम् । एतद्यो वेद निहितं गुहायां सोऽविद्याग्रंथि विकिरतीह सोम्य ॥ (मुं. उ. २-१-१०)

तो पुरुष, तो परमात्माच हे सर्व विश्व आहे. कर्म, तप आदि साधनेंहि तें सर्वश्रेष्ठ अमृतस्वरूप ब्रह्मच आहे. तें ब्रह्मतत्त्व अथवा पररूप इथेच आपल्या ‘मी’ या आत्मीय भावांतच संपूर्णपणें वास करून आहे असें जो जाणतो तो पक्क्या गांठीप्रमाणे बळकट झालेल्या देहात्मरूप अविद्येला चुटकीसरसें नष्ट करून टाकतो. सर्पाभासांत एक दोरीच असल्याप्रमाणें या सर्व विश्वांत एक परमात्माच भरून उरला आहे. मातीचा घट मातीहून भिन्न नसल्याप्रमाणे परमात्म्यापासून झालेले हे विश्व परमात्म्याहून भिन्न नाही. दागिन्यांत असलेल्या सोन्याच्या दृष्टीनें दागिना हा सोनेंच असतो हे अनुभवास आल्याप्रमाणे विश्वांत असणाऱ्या त्रिकालाबाधित परमात्म्याच्या दृष्टीनें जग हें परमात्मस्वरूप म्हणून अनुभवास येतें. लौकिक व तशी सर्व श्रौतस्मार्त पुराणोक्त कर्मे, सर्व तऱ्हेचे तप, जगांत असणारे सर्व जीव, यच्चयावद्विश्व खरो खर एक परमात्मस्वरूपच असल्यामुळे ते अमृतरूपी ब्रह्मचमी, ‘तेच हे सर्व असें जो जाणतो तो या आत्मज्ञानाच्या योगानें अविद्याग्रंथीचा म्हणजे अज्ञाना पासून उत्पन्न झालेल्या सर्व वासनांचा व देहात्मबुद्धीचा ठावच संपूर्ण पुसून टाकतो.

home-last-sec-img