जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तिन्ही अवस्थांना उजळविणारे असे जे एकमेव शाश्वत आहे. ते केवळ आनंदरूपच होय. तेथे अज्ञान नाही, वासना नाही, नामरूपाची कल्पनाही नाही. अशा या आनंदरूपाचे साम्राज्य आपल्याला संपादन करावयाचे आहे; प्राप्त करावयाचे आहे व त्यासाठीच आपला हा जन्म आहे. *’ विषयः खलू लोकस्य ‘* विषय हे तर कोणत्याही योनीत आहेतच. नरकांत लोळणाऱ्या किड्यापासून यांचा प्रारंभ असून शेवटपर्यंत या मायाकार्यात कितीतरी देह, जीव समाधिष्ठित असतात. त्या सर्वानाही विषयसुख असतेच असते. विषयसुखच महत्त्वाचे समजून आपण त्यात गुरफटणे, त्यात फसणे, भुलून जाणे, हुरळून जाणे हा मोठाच मुर्खपणा आहे.
आपण आता उठून जागृत झाले पाहिजे. म्हणून *’ उत्तिष्ठित जाग्रत, प्राप्यवरान्निबोधत | ‘* ‘ बाबा, आतां तूं झोपू नकोस, झोप घेऊ नकोस. तुला सांप्रत तो नरदेह प्राप्त झाला आहे तो म्हणजेच सुर्योदय होण्याचा समय होय, आत्मज्ञान होण्याचा समय होय. ही एक सुसंधीच तुला चालून आली आहे. ती अज्ञानरूपी निद्रेत तूं गमावूं नकोस. विषयवासनेने हुरळून जाऊन, त्यांनी वेडा होऊन वाटेल तसे वागत, वाटेल तसे करीत बसूं नकोस. ऊठ, जागा हो ! जागा हो !! जागा होऊन आत्मस्वरूपाचे परिज्ञान करून घे, त्याची जाणीव करून घे ! ‘ असे श्रुति सांगते.
*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*