दुष्टांना शांति, दया दाखवून त्याचा स्वभाव बदलणार नाहीच पण त्यामुळे आत्मघात होण्याची शक्यताच
जास्त. कित्येक सामर्थ्यसंपन्न पण शांततावादी मनुष्यांनी अशाप्रकारे दया दाखवून आत्मनाश करून
घेतल्याची उदाहरणे असून त्याला इतिहास साक्षी आहे. या उलट स्वतः दुर्बल असुनही क्रोधयुक्त आवेशाने
प्रतिकार करून अशा आततायींचे हल्ले परतविले गेल्याचीही उदाहरणे आहेत. *' उष्णमूष्णेन शाम्यति '* हा
जनसामान्यांचा आत्मरक्षण करण्याचा शीघ्र फलदायी असा पहिला उपाय आहे. दुर्जनांबरोबर प्रेमाने वागणे
म्हणजे सापावर प्रेम करण्यासारखेच नव्हे काय ? विषवृक्षाला अत्यंत आपुलकीने जोपासना करून वाढवला
तर तो काय अमृतफळ देईल ? बाभळीसारखे काटेरी झाड सर्वत्र काटेंच पसरविणार !
दुष्टांचा प्रतिकार केल्याने त्यांच्या स्वभावात सुधारणा होणार नसली तरी त्यामुळे सज्जनांचे संरक्षणच
होईल. याउलट आपण त्यांच्याबद्दल शांती व प्रेम दाखवित राहिलो तर त्याची वृत्ती न सुधारता, तसेच
अविवेकीवृत्तीस पायबंद न बसता ती वाढत जाऊन आपले प्रयत्न विफल होऊन हानीही होईल. सर्पाचे विष
दांतांत, माशीचे विष मस्तकांत व विंचवाचे विष त्याच्या नांगीत असते. परंतु दुर्जनांचे विष त्यांच्या सर्वांगात
भरलेले असते असे एक सुभाषित आहे. दुष्ट मुर्ख आततायींना शिक्षा करण्यानेच ते सुधारतील किंवा सन्मार्ग
प्रवृत्त होऊ शकतील.
*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*