आपणांस दुग्गोचर होणारे हे जग, सृष्टी-स्थिती लयांनी युक्त आहे. सृष्टि स्थिती किंवा लय हे काही समजून येत नाहीत. अशा या जगाचे ब्रह्मा, विष्णू, महेश हे सर्वाधिकारी आहेत. त्यांच्याहून वरचढ असा इतर कोणीही नाही. सर्वसाधारणपणे सर्व लोक त्रिमुर्तींची आराधना करतांना आढळतात. त्यांत काही वैष्णव असतील. एकंदरीत त्रिमुर्तीशिवाय इतर कोणत्याही देवतेची उपासना करणारे नाहीत. गणपती इत्यादी देवतांची उपासना रूढीत असली तरी तेथेही हीच दृष्टी आढळते. कारण ‘ त्वं बह्मा त्वं विष्णुः त्वं रूद्रः ‘ इत्यादी मंत्रामधुन त्रिमुर्तीचेच अस्तित्व आढळुन येते. श्रुतिमध्येही ‘ तूच ब्रह्मा, तूंच विष्णु, तूंच रूद्र ‘ असे त्रिमुर्तींचे वर्णन केले आहे. गुरूपरंपरेत या त्रिमुर्ती व नरदेहधारी सद्गुरू यांच्यात भेद मानला जात नाही. कारण गुरूच त्रिमुर्ती होत. ‘ गुरूर्ब्रह्मा गुरूर्विष्णुः ‘ या श्लोकांत हाच भाव आहे. तात्पर्य, कोणी कोणतीही उपासना किंवा गुरूसेवा केली तरी त्या उपास्यदेवता व गुरू त्रिमुर्तीहून भिन्न नाहीत. श्रुति, स्मृति, पुराणे यांमधुनही हीच गोष्ट सांगितली आहे. श्रीदत्तात्रेयानींही हेच तत्त्व आपल्या अवतारामधुन प्रत्यक्षपणे दाखविले आहे. हेच दत्तावताराचे वैशिष्ट्य होय.
*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*