सत्य स्वरूप दाखवतो तो सनातन धर्म. नरदेहाची प्राप्ती झालेल्याने कोणते सुख मिळवावे ? ते सुख मिळविण्यासाठी कसे आचरण करावे ? याचे उत्तर म्हणजेच सनातन धर्म होय. या धर्माने विषयसुखासाठी जगावे असे कधीही सांगितले नसून त्याने वैराग्याचाच उपदेश केला आहे. जीवनामध्ये वैराग्य बाणवून विषयसुखापासून मन निवृत्ती करावे. असेच त्यांचे सांगणे आहे आणि त्याप्रमाणे वागणे हे आपले कर्तव्य आहे. त्या कर्तव्याला अनुरूप अशी साधना दृढनिश्चयी मनाने केली पाहिजे. त्यामुळे सर्व अशाश्वत सुखवासना समूळ नष्ट होऊन मन स्वच्छ होईल आणि मग तो अमृतमय झाला असे म्हणण्यात हरकत नाही, त्यालाच ब्रह्मप्राप्ती होईल. सर्व भोग्य पदार्थापासून प्राप्त होणाऱ्या सुखापेक्षा लाखोपट सुख म्हणजेच ‘ ब्रह्म ‘ होय. त्या महत् सुखासाठी प्रयत्न करावा.हेच श्रुती-स्मृतींनी प्रतिपादिले आहे. या आपल्या सनातन धर्मात शाश्वत सुख प्राप्त करून घेणे व ते समजून घेणे या गोष्टी सांगितल्या असूत जणूं काय मानवी जीवनाच्या उत्कर्षाचे रहस्यच प्रतिपादिले आहे.
सनातन धर्म हा मनुष्यनिर्मित धर्म नसून तो परमेश्वरनिर्मित आहे. ज्यापासून धारण, पोषण होते त्याला धर्म असे म्हणतात.
*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*