कर्मवासनांच्या प्रेरणेनेच मानव बाह्यसुखाचा अनुभव घेत असतो. पण त्याच्यामुळे मनास शांती मिळत नाही. शाश्वत चिरशांति मिळविण्यासाठी हा जन्म किंवा जन्मपरंपरा टिकवणे अयोग्य होय. जन्माला येऊन निरनिराळे अनुभव मिळवले तरीही परमात्मसुख कसे आहे ? असा प्रश्न केल्यास आपण त्याला काय उत्तर देणार ? मनुष्यत्वाला साजेल असेच उत्तर देणे योग्य ठरणार आहे. आतापावेतो विषयसुख, देहसुख याचीच आपणाला ओळख झाली आहे. तरी पण शाश्वत सुख कोणते हे शोधून काढण्याची शक्ती मनुष्याजवळ आहे व योग्य-अयोग्य यांचा विवेकही आहे, सत्य समजून घेण्याचे सामर्थ्यही त्याच्यात आहे. असे असल्यामुळे त्याचे इप्सित असणारे जे परमात्मसुख ते फार दूर नाही.
ज्या पदार्थाच्या उपभोगाने सुखप्राप्ती होत नाही व ती झाल्यास टिकावू असू शकत नाही, अशाच्या मागे लागण्यात काय अर्थ आहे ? त्या पदार्थात चिरसुख असते तर त्याचा निराळाच अनुभव आला असता. परंतु उपभोगातून सुखाऐवजी दुखःच प्राप्त होते असा अनुभव आहे. सर्वांचे इप्सित असलेले शाश्वत सुख निराळेच आहे. बाह्यसुखांतून मिळणारे समाधान अशाश्वत, अपूर्ण असल्याकारणाने भोगातीत सुखच शाश्वत सुख आहे हे स्पष्टपणे उघड होते व निर्विषय म्हणजेच दिव्यसुख प्राप्त करून घेण्यासाठीच हा मानवजन्मच आहे हे सिद्ध होते.
*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*