Literature

कार्तिक शुद्ध द्वादशी

म्हातारपणापर्यंत किंवा शेवटचा श्वास जाईपर्यंत इंद्रिय सुखात मनुष्य गुरफटला तर त्याला शाश्वतसुख, चिरशांति मिळणार नाही. आपणांस पुढे सुख प्राप्त व्हावे यासाठीच मानवाचे प्रयत्न चालु असतात. यावर्षी केलेल्या कष्टांचे फळ, प्रयत्न फळ पुढील वर्षी मिळावे असा त्याचा विचार असतो. यादृष्टीने हिशोब करता संपूर्ण जन्माचे प्रयत्न फलद्रूप होण्याचा काल म्हणजे अंतकाळ, मरणकाळ. परंतु मरणकालिन यातना पाहिल्या तर मानवजन्माचे सार्थक कोणते ? असा प्रश्न उद्भवतो. मानवी जन्माचा मूळ उद्देश बाह्य सुखप्राप्ती हा नाही हे जाणून आपल्या बुध्दीचा योग्य उपयोग करावा.

मानवाला पांच ज्ञानेंद्रिये आहेत. डोळे, नाक, कान, जीभ व त्वचा, या पांच ज्ञानेंद्रियाद्वारेंच मनुष्य विषयसुखाचा अनुभव घेत असतो. जगातील प्राण्यांत पुष्कळ प्रकार असुन त्यांना अनुरूप, अभिरूचिला अनुकुल अशी प्रीती, भोगदृष्टी ही वेगवेगळी दिसत असली तरी इंद्रियसुखाचे स्वरूप एकच. त्यात उच्च निच या कल्पनेला वावच नाही. कारण स्वर्ग किंवा नरक यामध्ये प्राप्त होणारे सुखदुःख एकाच प्रकारचे असते, इंद्रियसुखासाठी संपूर्ण आयुष्य घालविले तर परमेश्वराने दिलेल्या बुद्धी, शक्ती यांना काय किंमत राहिली ?

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img