Literature

गृहस्थाचा धर्म

ज्यांना गृहस्थाश्रमाची इच्छा असते, त्यांचे लग्न लौकर करून टाकावें; आणि कुलाची राष्ट्राची, धर्माची आणि आपल्या नीतिमान् पूर्वजांची अब्रू राखावी. वैराग्याभावी अथवा संयमाभावी अधिक काळ त्यांना अविवाहित ठेवणें म्हणजे डोळसाने मुद्दाम डोळे झाकून वागल्यासारखे आहे. सर्वनाशे समुत्पन्ने अर्धं त्यजति पंडितः ॥ भ्रष्ट होऊन इहपर दोन्ही घालविण्यापेक्षां विध्युक्त लग्न करून ऐहिक प्रथम साधून त्यांना परमार्थ साधणे कोटिपट बरें. किती प्रपंची जन । अखंड वृत्ति उदासीन । सुख दुःखे समाधान । डंडळेना || ‘(दा. १९-८-२) काम्ये मतिस्त्यज्यताम् । पापौघः परिधूयताम। भवसुखे दोषोऽनुसंधीयताम् । आत्मेच्छा व्यवसीयताम् ॥काम्य कर्म टाकावें, निष्काम कर्म करावे, सदनुष्ठानानें व सदाचरणाने पापांचे क्षालन करावें, देह सुखाच्या ठिकाणी असलेल्या दोषांची कल्पना मनाला वारंवार आणून देत असावे, आत्मप्राप्तीची इच्छा वाढवीत जावे, असा श्रीशंकराचार्यांनी गृहस्थाश्रमात राहून परमार्थ साधण्याचा मार्ग साधनपंचकात’ सांगितला आहे. ‘द्वाविमावथ पन्भानौ यत्र वेदाः प्रतिष्ठिताः । प्रवृत्तिलक्षणो धर्मो निवृत्तिश्च विभावितः ॥‘ गृहस्थाश्रमालाहि वेदाची संमति आहे. वेदोक्त असे प्रवृत्ति आणि निवृत्ति असे दोनच मार्ग आहेत. ‘परदारेष्वसंसर्गो धर्मस्त्रीपरिरक्षणम् । अहिंसा सत्यवचनं सर्वभूतानुकम्पनम् । शमो दानं यथाशक्तिर्गार्हस्थो धर्म उच्यते॥ परस्त्रियांच्या ठिकाणी मातृबुद्धि, परधनाच्या ठिकाणी विषबुद्धि, निषिद्ध कर्माच्या ठिकाणीं मृत्युबुद्धि ठेवून वागणे, आपल्या बायकामुलांचे आणि परिवाराचे रक्षण करणे; अहिंसा, सत्य, भूतदया पाळणे क्रमाने मनाचा आणि इंद्रियांचा जय संपादणें, यथाशक्ति दान करणे, कृतज्ञता व नम्रता बाळगणे, कुलधर्म-कुलाचार पाळणे; वर्णाश्रमाचे नियम आचरणांत ठेवणें, देवपितृकार्य करणे; ब्राम्हण असल्यास शिखा, यज्ञोपवीत बाळगणे; स्नान-संध्या, जप-पूजा, ब्रम्हयज्ञ, नैवेद्यं-वैश्वदेव करणे व अतिथि अभ्यागताला अन्न देणे; काहीस्वाध्याय राखणे; वैदिक संस्कार, आर्यसंस्कृति तगविणें; सर्वांशी गोड असणे, मृदु मधुर वोलणें, घरीं आलेल्याचे आदरातिथ्य करणे, सार्वजनिक कार्यात यथाशक्ति भाग घेणे; गुरु आणि देव यांच्या ठिकाणीं सदैव पूज्यभाव राखणे आणि विश्वास बाळगून अनन्यभावानें यांची सेवा सदैव करीत रहाणे; आपण गृहस्था श्रमांत पडलों, परमार्थ साधल्याशिवाय जन्म व्यर्य, म्हणून परमार्थांकरितांहि कसोशीने प्रयत्न करणें; समुद्राप्रमाणे गांभीर्य बाळगणे; आपत्काली धैर्य ठेवणें; हानिलाभाच्या ठिकाणी समत्व बाळगणे; त्या त्या वेळी त्या त्या प्रमाणे ध्येयाच्या पूर्तीकरितां अचूक यत्न करणे; उपाय योजणें; न्यायनीतीनें धन संपादणें ; सद्वस्तूंचा संग्रह करणें; हा थोडक्यांत गृहस्थाचा धर्म आहे.

सत्य वचन अरु लीनता परस्त्री मात समान। इन तीनोंसे हरि ना मिले तो) तुलसीदास जमान || खरे वोलणें, लीनता बाळगणे आणि परस्त्रियांना आईप्रमाणे लेखणें या तीन साधनांनी जर श्रीहरीची प्राप्ति झाली नाही, तर याला श्रीतुलसीदासजी जामीन रहावयाला सिद्ध आहेत.

रात्रंदिस मन राघवीं असावें । चिन्तन नसावें कांचनाचें ॥ कांचनाचें ध्यान परस्त्रीचिन्तन । जन्मासी कारण । हेचि दोन्ही ॥ दोन्ही नको धरूं नको निंदा करूं । तेणें हा संसारूं तरशील ॥ तरशील भवसागरी बुडतां । सत्य या अनंताचेनि नाम ॥ नाम रूपातीत जाणावा अनंत । दास म्हणे संतसंग धरा ॥ ( समर्थ गाथा : ५६२) प्राणाघातान्निवृत्तिः परधनहरणे संयमः सत्य वाक्यम् । काले शक्त्या प्रदानं युवतिजनकथामूकभावः परेषाम् ॥ तृष्णास्त्रोतो विभङ्गो गुरुषु च विनयः सर्वभूतानुकम्पा । सामान्यः सर्वशास्त्रेष्वनुपहृतविधिः श्रेयसामेव पंथाः ॥ (भर्तृ. नी. श. २६) अश्वत्थमेनं सुविरुढमूलमसङ्गशस्त्रेण दृढेन छित्त्वा ॥ (भ.गी.१५-३ ) ‘ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन्गता न निवर्तन्तिभूयः ।‘ (भ.गी. १५-४).

खोल रुजलेला हा अशाश्वत संसारवृक्ष आपण नित्य असंग आहों या ज्ञानशस्त्राने, संसारातल्या कोणत्याहि कर्माचा लेप लावून न घेता, तोडावयाचा असतो. हा क्रमाक्रमाने असा सांसारिक व्यामोह नाहीसा करून, जिथे जाऊन पोहोचल्यानंतर पुनः जन्माची प्राप्ति होत नाही त्या परमात्मपदाच्याच केवळ शोधाकरिता आणि तत्प्राप्तीकरिता आपल्याला वाहून घेऊन मग संसार सोडून बाहेर पहावयाचे. तोपर्यंत संसारात राहून होईल तो आत्माभ्यास करावा. ‘असंङ्ग व्यवहारत्वाद्भावभावनवर्जनात् । शरीरनाशदर्शित्वाद्वासना न प्रवर्तते ।‘ असंग व्यवहाराने जन्म मरणाची भावनाच स्वरूपबोधानें एकदम नष्ट केल्यानें, शरीराला नाश आहे म्हणून सतत मनात बाळगल्याने वासना रहात नाहीं, असली तरी कार्यप्रवृत्त होत नाही, असे मुक्तिकोपनिषदांत सांगितले आहे. (मु. उ. २-२८)

सन्मार्ग तो जीवीं धरणें । अनमार्गान्चा त्याग करणें । संसारिका त्याग येणें । प्रकारें ऐसा ॥‘ (दा. ५-१०-२) प्रवृत्ति अथवा निवृत्ति यापैकी त्याच्या त्याच्या अधिकाराप्रमाणे एक मार्ग निवडून त्यांतून ज्ञानवैराग्याचा अभ्यास करीत आत्मनिष्ठेचा अथवा मोक्षाचा रोख धरून जात असावें. क्रमानें संसारी निःस्पृह होणे ही त्याची उन्नति आणि क्रमानें निःस्पृह संसारी होणे ही त्याची अवनति, हें मात्र लक्षात ठेवावें. भेदांतून अभेदाकडे, अनेकत्वातून एकत्वाकडे क्रमाने जाण्याचा मार्ग प्रवृत्ति आणि अभेदरूप एकत्वांत, अद्वितीय आत्मस्थितांत सदाच रहाण्याचा मार्ग निवृत्ति याची खूणगांठ बांधून असावें. सत्यचिद्घनमखण्ड मद्वयं सर्वदृश्यरहितं निरामयम् । यत्पदं विमलद्वयं शिवं तत्सदाऽहमिति मौनमाश्रय ॥‘ ( वराह उ. ३-६ ) जगाचे सोलीव सत्यस्वरूप मी म्हणून, चिद्घन मी म्हणून, अखंड एकरस असणारा मी म्हणून, अद्वय मी म्हणून, दृश्यरहित सदाचाच दुःखशून्य मी म्हणून, जे विमल अद्वय आनंदरूप तेच मी म्हणून मौन धारण कर. ‘संत्यक्तवासनान्मौनादृते नास्त्युत्तमं पदम् ।‘ अखंड निर्वासन मनाने आनंदरूपांत समरसून जाऊन सदोदित नितान्त तृप्तीने मौन धारण करण्याहून श्रेष्ठपद दुसरे नाही, असे निस्प्रुहाना श्रुति सांगते. तदनुषंगानें सर्वानाच तो बोध क्रमानें लागू पडतो.

home-last-sec-img