Literature

गौरवाचा गाभा श्रीगुरुस्वरूप

तुम्ही या पूर्वीच्या प्रवचनात समर्थ ह्या नावाबद्दल सांगो पांग विवेचन श्रवण केलेत. समर्थ कोण व समर्थच गुरु योग्य होत हेही सिद्ध करण्यात आले. श्रीगुरु हे सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहेत. सर्वां पेक्षा अधिक शक्तिमान, सर्व व्यक्ती पेक्षा महान, सामर्थ्य संपन्नामध्ये सामर्थ्यवान असणारांपेक्षाही परमश्रेष्ठ असे श्रीगुरुच होत. श्रीगुरु हे सर्व देवतापेक्षाही श्रेष्ठ आहेत असेच म्हटले जाते. सर्व सारभूत तत्त्वज्ञान, सत्यवान, विशेष अशा विभूती, विशेष शक्तिशाली व्यक्ती अर्थानाच आपण गुरु म्हणून संबोधित असतो. सर्वापेक्षा श्रेष्ठत्व व सत्व असणे हेच त्यांचे वैशिष्ट्य असते. या दृष्टीने विचार केल्यास गुरु शब्दाचा अर्थ सर्वश्रेष्ठ हाच आहे असे म्हटले तरी चालेल. सर्वांपेक्षा गुरु शब्दाचा अर्थ महत्वाचा आहे असे ठरल्यानंतर गुरु गोरखपर प्रवचन करीत असताना सहजच गौरवत्वात् गुरु: डोळ्यासमोर आपो आपच येते.

देवता गुरुस्वरूपच

सर्व साधारणपणे श्रीगुरु एकमेवच म्हटल्यावर त्यांचीच आराधना मुख्य होय अशी कल्पना करून घेऊन प्रचलित देव देवतांची आराधना सोडून द्यावयाची काय ? असा प्रश्न कोणताही श्रोता विचारील, यासाठी त्याचे निरसन करणे अगत्याचे आहे.

गुरु परंपरा ही आदिनारायणापासून सुरू झाली. * नमो ब्रह्मादिभ्यो ब्रह्मविद्या संप्रदाय कर्तृभ्यो । वंश ऋषिभ्यो नमो महद्भ्यो नमो गुरुभ्य

ब्रह्मादि सर्व देवता ब्रह्मविद्यासंप्रदाय प्रवर्तक होत. ब्रह्म विद्या समजून घेणाऱ्या ऋषि मुनींना नमस्कार असो. कारण ते सर्व गुरुस्वरूपच होत. श्रीशंकराचार्य संप्रदायातही नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्ति च तत् पुत्र पराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्दयोगिन्द्रमथास्य शिष्यं श्रीशंकराचार्यमथास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यं तत्रोटकवार्तिकम् ! असा संप्रदाय क्रम आहे. श्री शंकर संप्र दायातसुद्धा नारायणश्च गुरुः । असे म्हटले आहे. श्रीसमर्थ संप्रदायातही आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठ – कम् ! श्रीराम मारुति वन्दे रामदासं जगद्गुरुम् || असे म्हटले आहे. या दृष्टीने विचार केल्यास आदिनारायणापासून गुरुपरंपरा निर्माण झाली हे सहज लक्षात येते. देव, ऋषि, आचार्य हे सर्व गुरुहून भिन्न नाहीत. गुरुः ब्रह्मा गुरुविष्णुः गुरुः. साक्षात् महेश्वरः । गुरुरेव जगत्सर्वं तस्मै श्री गुरवे नमः ॥ ब्रह्मा, विष्णु, महेश या त्रिमूर्ती गुरुच होत. आदिशक्ती ब्रह्मस्वरूपी असल्याने तिलाही गुरुपद प्राप्त झाले आहे. का त्वं ? अहं ब्रह्मस्वरुपिणीमी ब्रह्मस्वरूपच आहे असे म्हटले आहे. श्रीगणेशही गुरुस्वरूपच होय. त्वं ब्रम्हा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वमिन्द्रस्त्वमग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं ब्रम्ह भुर्भुवः स्वरोम् ।अशी गणेशाची प्रार्थना आहे. यावरून सर्व देवता ब्रह्मस्वरूपी होत व म्हणूनच या सर्व गुरु होत हे उघड होते. देहदृष्टीने विचार केल्यास मानवापूर्वी देवता निर्माण झाल्या बाहेत. गुरूंच्या हाती ज्याप्रमाणे मोक्ष आहे तद्वत देवतांच्या हातात अभय देण्याचे सामर्थ्य आहे. दुष्टांचा संहार करून भक्तांचा मार्ग सुकर करण्यासाठीच सर्व देवतांनी शस्त्रे धारण केली आहेत. आपणास ज्ञात होणारी ब्रह्मविद्या श्रीगुरुपासूनच समजू शकते. असे असल्याकारणाने या जगात सर्वप्रथम ब्रह्मविद्येचा उपदेश करणारा आदिनारायणस्वरूपी गुरुच होय. वैष्णव नारायण यांना श्रेष्ठ मानतात तर शैवस्मार्त शिवतत्व श्रेष्ठ, शाक्त जगदंबाच श्रेष्ठ, सौर सूर्यच श्रेष्ठ व गाणपत्य श्री गणेशच श्रेष्ठ आहे असे म्हणतात. हे ज्याच्या त्याच्या दृष्टीने योग्यच आहे तसेच ते सर्व श्रेष्ठ असल्याने ते गुरुस्वरूपीच होत. पूर्वीपासून देवतांची आराधना गुरु म्हणूनच करीत असल्याचे आढळून येते. आजही त्याच गुरुरूप दृष्टीने देवता आराधनेकडे पाहिले पाहिजे.

श्रीगुरुदेव ज्ञानदातेच

गुरु म्हणजे कोणी लुंग्यासुंग्या नव्हे. ब्रह्मोपदेश म्हणजेच वस्तुस्थिती जगाची यथार्थ कल्पना समजून देऊन आपल्या ब्रह्म स्वरूपाचे दिव्यज्ञान देणारा जो कोणी असतो तोच सद्गुरु होय. गुका रस्त्वंधःकारः स्यात् रुकारस्तद्विनाशकृत् । अन्धःकार विनाशित्वात् गुरुरित्यभिधीयते ॥ गुकार हा अज्ञानरूपी अंध:काररूप असून रुकार त्या अंध:काराचा नाश करणारा अस ल्याने तेजोमय अग्निबीज आहे. अज्ञान नष्ट करून ज्ञानज्योतीचे ज्ञान देणारी महान शक्ती म्हणजेच सद्गुरु होत. ही ज्ञानज्योत जेथे जेथे प्रकाशते ते सर्व सद्गुरुच होत.

मीपणाची जाणीव

विष्णूच्या नाभिकमलापासून ब्रह्मन् व ब्रम्हाच्या ललाटा पासून रुद्र उत्पन्न झाला. ” हिरण्यगर्भः समवर्तताग्रे या क्रमाने ब्रम्हविद्येवा संप्रदाय सुरू झाला. अगदी सुरवातीस हिरण्य गर्भ उत्पन्न झाला व त्यापासून सृष्टी उत्पन्न झाली. त्याचवेळी हिरण्यगर्भामध्ये सर्व प्रथम मीपणाची जाणीव झाली. बहुझाले पाहिजे म्हणूनच सुरवातीस मीपणाची स्फूर्ती झाली. ही स्फूर्ती व स्वसंवेदना यांचे ज्ञात आपणास कोणत्या अवस्थेत दृग्गोचर होते ? जागृत किंवा स्वप्नावस्थेतच की नाही ? ‘ मीहे सर्वांकडून सांगितले जाते व त्यावेळी स्वसंवेदना असतेच. स्वप्नात सुद्धा मी पणाची स्फूर्ती असते. जागृत व स्वप्नावस्था या शिवाय गाढ निद्रेत असताना मात्र मीपणाची जाणीवच उरत नाही. सद्गुरुकृपेने समाधी सुख लाभल्यास त्यावेळीही मीपणाची जाणीव शिल्लक रहात नाही. मीपणाची स्फूर्ती स्वप्नामध्ये भावनारूपाने व जागृता वस्थेत स्पष्टरूपाने दिसून येते. 

सुषुप्ती अवस्थेत मात्र ती व्यक्त असते. आणि समाधी मध्ये तर विरघळूनच जाते. सर्व प्रथम हिरण्यगर्भामध्ये मीपणाचे स्फुरण झाले. त्यानंतर बहुहोण्यासाठी त्याने अनेक रूपे धारण केली. त्याचे बहुत्वरूप म्हणजेच विराट पुरुषाचे रूप होय, असे म्हटले जाते. मीपणाचे स्फुरण झालेले हिरण्यगर्भाचे स्वरूप व्यक्त व अव्यक्त अशा दोन प्रकारचे आहे. म्हणजेच तो व्यक्तही आहे व अव्यक्त तर आहेच आहे. व्यक्ताsव्यक्त वपुःमीपणाच्या जाणीवेस रूप नाही. ती जाणीव अव्यक्त असली तरी स्फुरण रूपानेच व्यक्त होत असते. मीपणाची जाणीवही यामुळेच होते. हीच महत् तत्वाची जाणीव होय. म्हणून या रूपास हिरण्यगर्भ असे संबोधन वेदामध्ये त्या संबंधात जातः पतिरेकऽआसीत् असे म्हटले आहे. भूतस्य जातः पतिरेकऽआसीत् असे म्हटले आहे.

अव्यक्तता

गाढ झोपेत मीपणाची जाणीव असून नसल्यासारखी असते. त्या प्रमाणे ब्रह्मांडास कारण असलेले देहरूपही अव्यक्त स्वरूपात व्यक्त होते. अहं ब्रह्माऽस्मियात सुद्धा व्यक्तरूप आढळून येत नाही. बुद्धी ही अगोचर आणि अनुभवजन्य आहे. तीन स्वसंवेद्यही आहे. अव्यक्त झालेले ज्ञानस्वरूप हिरण्यगर्भामुळेच मोपणाच्या जाणीवेने व्यक्त झाले आहे. त्या मीपणाच्या स्फूर्ति मुळेच सर्व गुरुसंप्रदाय चालत आलेले आहेत. ब्रह्मा, विष्णु, महेश आदि सर्वांच्या मीपणाच्या जाणीवेस हिरण्यगर्भच कारणीभूत होय. म्हणजे आदिनारायणच. हे ज्ञान तीन मुखांवी त्रिमूर्तिरूप झाले

श्रीगुरुरूप ओतप्रोत

अष्ट दिक्पाल हे ज्ञानीच होत. कठोपनिषदात यमधर्माने नचिकेतास ज्ञानोपदेश केला आहे तर छांदोग्योपनिषदात ब्रह्म देवाने इंद्रास ज्ञान सांगितले आहे. यावरून हे सर्व गुरु होत याबद्दल शंका घेण्याचे कारणच राहत नाही. मानवामध्ये असंख्य व्यक्तींनी आजपावेतो गुरुपद प्राप्ती करून घेतली असल्याचे आपणासर्वास माहित आहेच. आजपावेतो ज्या ज्या व्यक्ती गुरु होऊन गेल्या त्याचे मूळ कारण, उपासना मार्गाने ज्ञानप्राप्ती करून घेणे हेच आहे. हे ज्ञान परमात्म कृपेशिवाय प्राप्त होत नाही. गुरु ह्या भावनेस किंवा ह्या पदास हिरण्यगर्भच मूळ कारण आहे. यो ब्रम्हाणं विदधाति पूर्व यो वं वेदाश्च प्राहिणोति तस्मै ॥ तं ह देवात्मबुद्धिप्रकाशं मुमुक्षुर्वे शरणं प्रपद्ये । या श्लोलोकामधून हिरण्यगर्भास नमस्कार केला आहे. हिरण्यगर्भाचे स्वरूप म्हणजेच विष्णू हिरण्यगर्भाचा अवतार म्हणजेच विष्णुरूप ईश्वररूप म्हणजेच रुद्र. सृष्टीच्या उत्पत्तीसाठी ज्याने वेदांचे ज्ञान दिले त्या परमात्म्याची मुमुक्षु असलेला मी, प्रार्थना करतो की, तो माझ्या मध्ये असलेल्या आत्मबुद्धीस प्रकाशित करणारा असल्याने मी त्याचा आश्रय घेत आहे. हाच ह्या वरील श्लोकाचा अर्थ होय.

श्रीगुरुपद परंपरागत

गुरुच्या कृपा कटाक्षाने व दिव्य सान्निध्याने शिष्यही गुरु होऊ शकतात. परीस कधीही लोखंड होत नाही. पण परिसाच्या स्पर्शाने लोखंड मात्र सोने होऊ शकते. पण लोखंड परीस होईल काय ? कदापीही नाही. शिष्यावर गुरुंचा अनुग्रह झाल्यास तो गुरुनाथ होऊ शकतो, म्हणूनच परीसापेक्षाही गुरु श्रेष्ठ आहे. तसेच गुरूने शिष्यास बोध केल्यावर तो शिष्य गुरु होऊन ती परंपरा वाढत वाढत शिष्य, प्रशिष्य हे सर्वही गुरुपदवीस प्राप्त होतात. अशा दृष्टीने आतापर्यंत झालेले सर्वज्ञानी उपासना कृपेमुळेच किंवा उपासनेमुळे प्राप्त झालेल्या ज्ञानामुळे गुरुपद प्राप्त करून घेऊन आपल्या गुरुकडून ज्ञानोपदेश मिळवून मुक्त झाले आहेत हे सर्व गुरुच होत. म्हणूनच या सर्वांची पूजा करावी गुरु, परम गुरु, परमेष्ठि गुरु, परात्पर गुरु अशा अनेक रीतीने आपण गुरुस संबोधू शकतो. अशा प्रकारे विचार केल्यास अदिनारायणापर्यंत सर्व गुरुच होत व म्हणूनच देवतांची आराधना करावयाची असते. श्रुती मध्ये ज्याचे वर्णन केले आहे त्या सर्वांची आराधना करून ज्ञानप्राप्ती करून घेतली पाहिजे.

प्रभू रामचंद्रांच्या प्रेमभवतीचे महत्व

श्रीसमर्थ रामदास ह्या नावावरून श्रीरामप्रभूंच्या प्रेम भक्तीचे रहस्य आपल्या लक्षात येईल या नावात जसा समर्थ हा शब्द आहे तसा रामदासही एक शब्द आहे. म्हणूनच समर्थ रामदास हे नाव सर्वदृष्टीने सार्थ आहे हे सूचित होते. त्यांनी आपल्या दासबोध ग्रंथात रघुनाथ भजने ज्ञान झालें। रघुनाथभजने महत्व वाढले । म्हणोनिया तुवां केले। पहिजे आधी ॥ (६-७-३१) असे म्हटले आहे. म्हणूनच समयकडे अतिमानव्य दृष्टीने पहाणे आवश्यक आहे. याला कारण काय? एवढी मोठी पदवी त्यांना कशी प्राप्त झाली? याचे उत्तर नावाचे भजन हेच देता येईल. प्रभू रामचंद्रावर असलेल्या त्यांच्या विश्वासाचे हे एक फळ आहे व त्यांच्या सेवेचाच तो परिणाम आहे. एकंदरीत त्यांना एवढे महत्व येण्यास श्रीरामचंद्रकृपाच कारण आहे. तुम्हा लाही असे महत्व यावे असे वाटत असल्यास, ज्ञानी होण्याची इच्छा असल्यास, गुरुपरंपरा चालू ठेवावयाची असल्यास तसेच आपला उद्धार करून घेण्याची इच्छा असल्यास तुम्हीही श्रीरामचंद्रांचे स्मरण करून चिंतन करणे आवश्यक आहे व त्यामुळेच तुम्हास इण्ट फलप्राप्ती होईल. प्रभुरामचंद्राचे भजन केल्याने निश्चितपणे सुख शांती मिळेल. ज्याच्यापेक्षा इतर कोणतेही आकर्षक नाही, ज्याच्या पेक्षा श्रेष्ठ व शांतिदायक इतर कोणतीही वस्तु नाही, ज्याच्या योगे संपूर्ण समाधान मिळेल अशा श्रेष्ठ व अत्युच्चपद प्राप्त करून देणाऱ्या परममंगल, परमसुखरूप, आनंदरूप अशा श्रीरामच्या स्वरूपाची प्राप्ती करून घ्यावयाची असल्यास त्यांचे भजन केलेच पाहिजे असे श्री समर्थांनी आपल्या अनुभवावरूनच सांगितले आहे

परमात्माच भक्तरक्षक

मनीं धरावे तें होते। विघ्न अवधेच नासोनि जातें । कृपा केलिया रघुनाथे । प्रचीत येते (६-७-३१) असे श्रीसमर्थांनी सांगितले आहे. मनातील गोष्टी संपूर्णपणे सफ होतात, विघ्ने तात्काळ नाहीशी होतात, हे सर्व रघुनाथाच्या कृपेमुळेच शक्य आहे. साधनेशिवाय कृपा प्राप्त होऊ शकत नाही. मालकसुद्धा आपल्या नोकराकडून संपूर्णपणे काम करून घेतल्या शिवाय त्याचा संपूर्ण पगार देत नाही त्याचप्रमाणे पूर्णपणे भक्ती झाल्याशिवाय देवाची कृपाही होत नाही. रघुनाच्या अनुग्रहानेच सर्वस्व प्राप्त होणे शक्य आहे. नाहीतर संपूर्ण महिना भरण्या पूर्वीच पगाराची मागणी करणाऱ्या नोकराच्या पदरी जशी निराशा येते त्याचप्रमाणे भक्ति पूर्णपणे न करता रघुनायाकडे व मागणाराचीही तीच गत होते.

अनन्य भक्तीची आवश्यकता

देवदर्शनास जाणाऱ्या श्रीमंतान ही देवापुढे १-२ रुपये ठेवण्याची कधीच इच्छा होत नाही पण स्वतःस आवश्यक वाटणारे वरमात्र तो मागत असतो अति श्रीमंताना तुम्ही देवास अर्पण करण्यास काय देऊ शकाल ? असे विचारले तर तो महाराज, मजजवळ देवास देण्यासारखे काहीही नाही. असे म्हणून आपले दारिद्रय दाखवितो. अशा लोकांच्या आशा आकांक्षा कशा पूर्ण होतील ? यः प्रयाति त्यजन्देहं स याति परमां गतिम् । अनन्यचेताः सततं यो मां स्वरति नित्यशः || जो माझे स्मरण नित्य करतो त्याला मी सुलभतेने प्राप्त होतो, असे परमात्म्याने आपल्या मुखारविंदाने सांगितले आहे. अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनः पर्युपाते । तेषां नित्या भियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् || ‘अनन्यपणे पणे भजन करणाऱ्या भक्तांची सर्व जबाबदारी परमात्मा स्वतःवर घेतो. अनन्य म्हणजे ज्यास दुसरे कोणीही नाही असा. अन्याश्रयाणां त्यागो अनन्यता | दुसरा कोणताही आश्रय आहे अशी कल्पना केली तर ती अनम्यता होत नाही. म्हणून अनन्यतेत गर्क होऊन देहाचीसुद्धा विस्मृती झाली पाहिजे.

श्रद्धाभवतीची आवश्यकता

श्री गुरुंकडे किंवा देवदर्शनास जाणारा प्रत्येक मनुष्य आपली अनेकानेक दुःखे सांगून त्यांच्या निवृत्तीचा मार्ग विचारीत असतो. त्याच्या व्यवहारात बालेली बिघ्ने श्रीगुरु किंवा श्रीदेवाच्या कृपेने निवारण करून घेऊन कार्ये ते सिद्धीस नेऊ शकतात. मात्र काम झाल्यावर देव गुरु सान्निध्याचे महत्व विसरून मी यंव केले, मी त्यंव केले अशी प्रोढी मारीत असतात. उत्तम वकील दिला म्हणूनच मी न्यायालयात यशस्वी झालो व निष्णात वैद्याच्या औषधामुळेच माझा रोग बरा झाला अशा तो वल्गना करतो. या कारणाने परमात्म्याचाही त्याच्या वरील विश्वास उडून क्रमानुसार तो दरिद्री बततो.

दयाशील परीक्षक

भक्तांच्या बाबत परमात्मा अतिशय दयार्द्र आहे. कृपाळूपणे अल्प धारिष्ट्य पाहेया समर्थोक्तीप्रमाणे परमेश्वर भक्ताविषयी कृपादृष्टी ठेऊनच अल्पस्वल्प परीक्षा घेत असतो. अशा या लहानशा परीक्षेत भक्त उत्तीर्ण न झाल्यास त्याला जबाबदार कोण ? एखाद्या फळाची परीक्षा करताना ते पिकले आहे किंवा नाही हे पहावे लागतेच की नाही ? परमात्म्याचा अनुग्रह हा सर्वश्रेष्ठ अनुग्रह आहे. परमात्मा म्हणजे पर आत्मा परमात्मा असे असल्यामुळे त्याचा अनुग्रहसुद्धा श्रेष्ठ प्रतीचाच असतो. मोठयाकडून देण्यात येणारे दानही मोठेच असणार ? एखाद्या राजास कोठेही दानधर्म करावयाचा असल्यास तो भोपळा किंवा २-४ पैसे देईल काय ? असे करणे हा राज्यपदाचा अपमानच नव्हे काय ? यासाठी मोठे लोक आपापल्या स्थानास अनुसरून योग्य असे दान देत असतात. सद्गुरु सर्वश्रेष्ठ होत. त्यास त्याच्या पदाचा अभिमान आहे. तसा अभिमान नस स्पास ही सृष्टीच नाथ पावेल. स्त्रियो वैशास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परां गतिम् । किं पुनर्ब्राह्मणः पुण्या भक्ता राजर्षयस्तथा ‘ ( भ.गी. ९ ३२-३३) अनन्यतेने माझा आश्रय घेणाऱ्या स्त्री, शुद्र वैश्यादि सर्वांना श्रेष्ठ पती प्राप्त होते. असे असल्याने आपल्या कर्माप्रमाणे योग्य रीतीने धर्मपालन करणाच्या ब्राह्मण किंवा राजर्षी यांच्याबद्दल काय सांगावयाचे ? असे श्रीकृष्ण परमात्म्यांनी भगवद्गीतेत सांगितले आहे.

समरस श्रीगुरु

मच्चित्तः सर्वदुर्गाणि मत्प्रसादात्तरिष्यसि । (म.गी. १४-५८) माझ्या ठिकाणी चित्त एकरूप करून एकाग्र तेने माझी तू आराधना केलीस तर तुझी सर्व दुःखे नष्ट होतील, असे भगवंताचे सांगणे आहे. याप्रमाणे आराधना करणा-या भक्तास कोणत्याही बंधनाची किंवा विघ्नांची बाधा न होता तो दिव्यपद प्राप्त करून घेऊन आनंदित होतो पण आपण सर्वजण अशी भक्ती करू शकतो काय? भूक लागल्याशिवाय आपल्या तोंडात परमेश्वराचे नाव येते काय ? या आल्यावर परमे इवयाची आठवण होत नाही. असे असल्याने मग परमेश्वराची कृपा कोठून होणार ? कोणत्याही विकाराला बळी न पडता भक्ताच्या ठिकाणी परमात्मभावनाच असेल तर अगदी लवकर त्याचे अभीष्ट सिद्ध होते व ईप्सित प्राप्ती होते. सांगावयाची मुख्य गोष्ट म्हणजे मनुष्याने परमात्म्यासाठीच जगले पाहिजे. काया, वाचा मनाने तदेकचित्त होणे म्हणजेच भक्ती,

बुद्धियोगमुपाश्रित्य मच्चित्तः सततं भव । ( म. गो. १८-५०) अशा दृष्टीने भक्ती विचारशी होऊन पुढे जाणाच्या भक्तासच परमात्म्याचे ज्ञान होते. तो परमात्मा आनंदमय, अद्वितीय, असा असून नित्य तृप्त आहे. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानभूति । द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादि लक्ष्यम् ॥ एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं । भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ॥ सर्वापिक्षा जो श्रेष्ठ आहे, जेथे वेगळेपणा नाही, जे एकरूप होऊन प्रकाशित होते असे दिव्य आनंदस्वरूप गुरुरूप असल्यामुळे ते रूप जेथे जेथे प्रगट होते तेथे तेथे नित्य, परिशुद्ध गुरुरूपच आहे असे मानण्यास काहीच अडचण नाही. हे जे परमपवित्र स्वरूप तेच गुरुस्वरूप होय. एकंदरीत अच्छे अशा अनन्यभक्तीने परमा त्म्याची कृपा संपादन करून तन्मूलक ज्ञान मिळवून कृतकृत्य होणे हेच सर्वांचे ध्येय असले पाहिजे.

स ह यो वै परमं वेदितव्यं ब्रह्मविद् ब्रह्मैव भवति ।

या वचनानुसार जे समजले असता मानव तद्रूपच होतो असे जे ब्रह्मस्वरूप आहे त्याचे ज्ञान करून घेतल्यास तो ब्रह्मस्वरूप होतो, अशी जी सर्वश्रेष्ठ वस्तु ती सर्वांनी प्राप्त करून घेतली पाहिजे.

समर्थांचा शब्द म्हणजे वेदवेदांगदर्पण

रामदास ह्या शब्दात आता पावेतो सांगितलेली सर्व लक्षणे अंतर्भूत आहेत. रामदास असे म्हणताच वेदवेदांगाचा अर्थ आपल्या डोळयासमोर उभा राहतो. त्या नावाने तत्वबोध होतो. त्यामुळे त्यांचे महत्त्व किती वर्णावे ? श्रुतिसुद्धा त्यांचे वर्णन करण्यास कुंठित होऊनअवचनेन प्रोवाच । अशा मौनाने स्तब्ध होते.

अंजनेयाचा अवतार

समर्थ कोण होते ? हे त्यांनी आपल्या नावातच दर्शविल्याचे आपल्या लक्षात येईल. दास्यभक्तीचे अग्रगण्य आचार्य कोण ? असा विचार केल्यास ते अंजनेयच नव्हेत काय ? अंजनेयानीच रामदास या नावाने अवतार धारण केला होता, असे सूक्ष्मदृष्टीने विचार किल्यास सहज लक्षात येईल. कलौयुगे जनिष्यमाण मंदबुद्धि मानवान् । गुरोर्नमाभि रामदास पादपकजं तव । कलियुगात जन्मलेले मंदबुद्धीचे मानव व भवसागरात बुडणारे पामर याच्यावर कृपा करण्यासाठी अंजनेयाने जो देह धारण केला यालाच ह्या युगात रामदासहे नाव प्राप्त झाले आहे. रामदासः कलौयुगेमारूतीनेच कलियुगात रामदास या नावाने अवतार घेतला हे मी भविष्य पुराणाच्या आधारे सांगत आहे. ह्याशिवाय आणखी अनेक घटनानीही ते स्पष्ट जाहे. रामावतारात मारूती हे रामाचे दासच होते. कलियुगात मी अवतार घेणार आहे असे त्याचवेळी त्यांनी आश्वासन दिले होते.

कल्याण हा भरताचा अवतार

भरत मारुतीचा सेवक होण्यासाठी कोणता प्रसंग घडला व त्याने कोणास अभय दिले होते ? याचा विचार करूया या गोष्टी समर्थांनी आपल्या मूळ चरित्रात सविस्तरपणे लिहून ठेवल्या आहेत. समर्थांचे पट्टशिष्य तीन. त्यातील पहिला कल्याण. ह्या कल्याणस्वामींच्या चरित्रावरूनसुद्धा समर्थ मारुतीचे अवतार होते हे लक्षात येते. कल्याणस्वामी हे भरताचा अवतार होते हे प्रसिद्धच आहे. भरताला मारुतीचे सेवक होण्यास काय कारण घडले असावे याचा आपण शोध घेऊ या. राम-रावण युद्धामध्ये लक्ष्मण मूच्छित झाल्यामुळे संजिवनीवनस्पती आणण्यासाठी मारुतीरायास पाठविले होते हे सर्वश्रुतच आहे. लवकर काम होण्यासाठी मारुतीरायावी द्रोणागिरी पर्वतच उचलून घेतला. तो पर्वत घेऊन नंदिग्रामावरून येत असता मारुतीरायाचा प्रकाश पाहून हे काही तरी विघ्न आहेअसे समजून भरताने त्यावर वाण सोडला. त्यामुळे रामनामाचा घोष करीत वेगाने चाललेल्या मारुतीस खाली उतरावे लागले. त्यावेळी भारताने मारुतीस रामनाम घेणारा तू कोण ? तू रामनाम का घेतोस ? तू कोण आहेस व कोठून आलास ? तुझे नाव काय ?’ असे निरनिराळे प्रश्न केले. त्यावेळी मारुतीरायाने मी रामभक्त आहे. युद्धात लक्ष्मण मूच्छित होऊन पडले आहेत. त्यांना शुद्धीवर आणण्यासाठी काही वनस्पती शोधित होतो. पण त्या लवकर न सापडल्याने हा पर्वतच घेऊन चाललो आहे, अशावेळी मला थांबवून तू भाऊबंदकी साधलीसअसे सांगितले. आधीच दुःखित असलेला भरत मारुतीरायाचे भाषण ऐकून फारच दुःखी झाला. भरतास पश्चात्ताप होऊन अहो, तुम्ही म्हणता त्या भावनेने मी कधीही असे काम करणारा नाही. या गावावरून येणारा आवाज ऐकून हे निश्चितपणे काही तरी संकट आहे असे समजून, अयोध्या नगरीच्या संरक्षणासाठीच मी बाण सोडला होता. हा माझ्याकडून मोठाच अपराध घडला आहे. तुझ्यासारख्या रामसेवकास मी फारच दुःखी केले आहे. याचे निवारण करण्यासाठी तुझी सेवाच केली पाहिजे. असे माझे मत असून तशी मी तुझी प्रार्थना करतो. मला तू तशी संधी द्यावीअसे म्हणाला. त्यावर मारुतीरायाने यावेळी मी सेवक असल्याने ते शक्य नाही. कलियुगात मी रामदासया नावाने अवतार घेईन त्यावेळी तुला माझ्या सेवेची संधी मिळेल.असे उत्तर देऊन निघून गेले. श्रीसमर्थ रामदास व कल्याणस्वामी यांचे संबंध पाहता ते म्हणणे खरे वाटते.

वेणुताई म्हणजेच स्वयंप्रभा

मारुतीराव सीताशोधार्य निघाल्यावेळी मध्येच एका गुहेत त्यांची प्रवेश केला. त्यावेळी त्यांना तेथे स्वयंप्रभा दिसली. मारुतीरायाचे रामनाम संकीर्तन ऐकल्यावरोबर स्वयंप्रभेने श्रीरामप्रभूंचा समाचार मारुतीरायांच्या मुखाने ऐकला व त्यामुळे ती संतोषित झाली. हा संतोष प्राप्त करून दिल्यामुळे आपली काही सेवा घडावीअशी तिने मारुतीरावास प्रार्थना केली व ती प्रार्थना कलियुगात वेणुताईच्या रूपाने फलद्रूप झाली.

अतिगहन सेवाधर्म

गुरु-शुश्रुषया विद्या गुरुच्या सेवेमुळे गुरुकृपा व ब्रह्मविद्या प्राप्त होते. या कलियुगात गुरुकृपा प्राप्त करण्यासाठी व आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आग्रह केला जातो. ते अयोग्य आहे. सद्गुरुच्या तोंडून निःस्वार्थ संतृप्त मनाने सहजगत्या स्फुरण पावलेले शब्द म्हणजेच आशीर्वाद, शक्ती, भक्ती व श्रद्धा यांनी संतुष्ट झालेल्या गुरूंचा एक आशीर्वाद असला की पुरे. एकंदरीत तात्पर्य काय ? स्वयंप्रभाही या भावनेनेच आशीर्वाद मागती झाली. सेवेशिवाय प्रसाद घेणे हे विद्वानांना योग्य वाटत नाही. परंतु आमचे पुष्कळ शिष्य पैसे मिळविण्यासाठीच आग्रह करतात. भिक्षुकांचे तर विचारूच नका. तात्पर्य निष्कपटपणाने मनापासून सेवा केल्यास तीच तुमचे संरक्षण करते. परंतु त्या काळात जास्तीत जास्त एक नारळ व दोन फुले समोर ठेवताक्षणीच आपल्या सर्व अपेक्षा पूर्ण झाल्या पाहिजेत अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. असे असताहीसाधको दोनवत्सलाः ।या म्हणीप्रमाणे महात्मेकृपा करीत असतातच. परंतु काम झाल्यानंतर केलेला नवस, ही मंडळी सोयिस्करपणे विसरून जातात. गुरुकृपा विसरून जाऊन निराळयाच कारणाने, ह्या मंत्राने नाही तर त्या मंत्राने कार्यसिद्धी झाली असे म्हणणे म्हणजे काही खऱ्या सेवेचे लक्षण नव्हे

 सेवाधर्मः परम गहनो योगिनामप्यगम्यः । सेवाधर्म अत्यंत श्रेष्ठ आहे. म्हणूनच मारुतीरायांनी स्वयंप्रभेला  तू कलियुगात वेणूताईच्या रूपाने माझी सेवा करू शकतेसअसे. सांगितले होते.

त्रिजटा ही सुद्धा परमभक्तच होती. तिनेही असेच विचारले होते व त्याप्रमाणे अवकाया नावाने जन्म घेऊन तिने समर्थ सेवा पूर्ण केली. या सर्व उदाहरणावरून श्रीसमर्थ हे श्री मारुतीरायांचेच अवतार होते हे सहज लक्षात येते.

“श्रीसद्गुरु समर्थ रामदासस्वामी महाराजांचा जयजयकार असो!

home-last-sec-img