आपल्या वैदिक धर्माप्रमाणे मागील जन्मांतील कर्मेच ह्या जन्मास कारणीभूत आहेत. कर्मांचे कारण वासनाच.
मागील जन्मांतील अतृप्त वासनांच्या तृप्तीसाठीं पुन्हा जन्म घ्यावा लागतो. हा जन्म होय. ह्या जन्मी तोच क्रम
चालू ठेवल्यास पुढील जन्मी काहीं बदल होणार नाहीं. शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध या विषयांचा अनुभव मागील
जन्मांत घेतलेला असतो.आतांहि तोच अनुभव घेऊन पुढील जन्मीही त्याचाच संग्रह केल्यास तृप्ती होणार नाही.
आपण जें सुख मानतों तें खरे सुख नव्हे. आपण करीत असलेले प्रयत्न हे निव्वळ आभास असून त्यानें ख-या
सुखाची प्राप्ती होणार नाही. अशा प्रयत्नांतच जीवन संपल्यास पुढें काय ?
ह्या जगांत विषयसुख आहे तसें देवलोकांतहि आहे. मानवाप्रमाणें इतर प्राणीमात्रांतहि सुखलोलुपता
असतेच असते. श्रीमंत लोक पक्वान्नांनी तृप्त होत असले तरी गरीब चटणी भाकर खाऊन किंवा अन्न पाण्यांनी
तृप्त होतात.जनावरें हिरवे गवत खाऊन तृप्त होतात. तात्पर्य, आहार, निद्रा, भय, मैथुनांदींचा अनुभव देव, मानव,
पशु, कृमि कीटकांदीमध्ये आहेच आहे.
ह्या लोकातील कामनादीनी प्राप्त होणारें सुख स्वर्गामध्ये
अप्सरादिकडून मिळणारे व अमृतपानानें मिळणारे सुख आणि ऐहिक व दिव्य सुख या सर्वांची बेरीज
तृष्णाक्षयाच्या योगें मिळणा-या सुखाच्या एक षोडशांश इतकीही नाही.
श्री प.प. सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी