परस्त्रीगमनानें पुरूषाचे पौरूष्य कमी होते व कर्मभ्रष्टतेमुळे तो पतीत होतो. परपुरूषाच्या संपर्कामुळे स्त्री सुध्दा अपवित्र होते व अशी स्त्री अपकिर्तीस पात्र होते. दृष्कृत्य झाकणे किंवा आपले दृष्कृत्य कोणीही पहात नाही अशी कल्पना करून घेणे सर्वस्वी चुकीचे आहे. कारण परमात्मा हा सर्वसाक्षी आहे. काही वेळी दृष्कृत्य किंवा अधर्माचरण झाकले गेले आहे असे वाटत असलें तरी तें केव्हातरी उघडकीस आल्याशिवाय रहात नाही.
काम हा लगाम व खोगीर नसलेल्या घोड्यासारखा आहे. त्याच्यावर स्वार होणारा अत्यंत हुशार असेल तरच त्याचा निभाव लागेल. नाहीतर तो केव्हा भूमितलावर पडेल याचा नेम नाही. कामहि मनाधीन असणे आवश्यक आहे. त्यामुळे तो लगाम घातलेल्या घोड्याप्रमाणे आपल्या स्वाधीन राहील. काममोहित झालेली व्यक्ती स्त्री असो वा पुरुष असो त्याचा अधःपात ठरलेलाच आहे. वाईट मार्गाने वागून तें वर्तन झाकण्यांचा प्रयत्न करणें हे आपल्या पदरांत निखारे बांधण्यासारखेच होय. निखा-यामुळे प्रथम कपड्याचा वास येऊ लागतो व थोड्याच वेळात त्याचा जाळ होतो. तद्वत सर्व समाजाची दृष्टी आपणावर ओढून घेऊन तो दुर्वर्तनी आपला सर्वनाश ओढवून घेतो.
श्री प.प. सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी