Literature

ज्येष्ठ वद्य सप्तमी

भगवद्-आराधना’ हा शब्द अत्यंत व्यापक अर्थाने भरलेला आहे. भगवंत कोण? तो कोठे आहे? त्याची आराधना म्हणजे काय? इत्यादी प्रश्न संसारीक लोकांच्या दृष्टीने अत्यंत बिकट आहेत व ते सोडवण्याचा प्रयत्न केल्यास जास्तीत जास्त गुंतागुंत निर्माण होईल. पण आपल्या पूर्वजानी मात्र हे प्रश्न अत्यंत सहजरित्या सुलभतेने सोडविले आहेत.

भगवंत जगाच्या अणुरेणुंत , तृण-काष्टात भरलेला आहे. ‘भगवंत माझा पालक असुन त्याच्याशिवाय माझे रक्षण करणारा इतर कोणीही नाही, ‘ अशा भावनेने शरण आलेल्या भक्तांच्याच तो उद्धार करतो. तसेच नामस्मरणाच्या सुलभ मार्गानेही भगवंत तृप्त होतो आणि त्याच्याच कृपेने भक्तांचे इष्टार्थ सिद्धीस जातात.

भगवंत निर्गुण, निराकार, निरूपम, निर्मल, नाम-रूप-गुणरहीत, सच्चिदानंदस्वरूपी आहे असे वेद व उपनिषदांनी वर्णन केले आहे. अशा अखिल जगदव्यापी शक्तीस नारायण, शिव, श्रीराम इत्यादी भिन्न भिन्न नावांनी ओळखले जाते व त्याची भक्ती, पूजा केली जाते आणि ज्याच्या त्याच्या भक्ती-शक्तीप्रमाणे त्यांना फलाची प्राप्ती होत असते.

परमात्म्याचे कथाश्रवण, गुणगान, भजन ही सर्व अमृतसदृश आहेत. त्यांच्या सेवनाने भक्त अमर होतात असे म्हटले जाते. आमच्या मतें हें सर्व अमृतपेक्षाही श्रेष्ठ आहे. परमात्म्यास यथार्थपणे जाणून घेतल्यास मानव मृत्यूवर मात करून अमर होतो. असें अमरत्व देणारे अमृतच खरें मृत होय. या अमृतसेवनांनेच मानव अमर होतो.

श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी

home-last-sec-img