परमात्म्याच्या प्रेमासाठी सर्व काही प्रियकर आहे अशी भावना ठेवणेंच योग्य असून त्याखेरीज असणाऱ्या इतर पदार्थासाठी किंवा व्यक्तिसाठी प्रियकर स्वभाव अशक्य आहे. कोणतीहि व्यक्ती किंवा वस्तु आपणांत प्रीती उत्पन्न करणारे गुणयुक्त असूं शकत नाही. कारण तो तिचा स्वभावधर्मच नसतो. प्रीती आणि अप्रीती या आपल्या मनाच्या भावना होत.
आपणांत असणारा आत्मा तीन प्रकारचा आहे. गौणात्मा, मिथ्यात्मा, व मुख्यात्मा हेच ते तीन प्रकार. गौणात्मा व मिथ्यात्मा हे काही मुख्य नव्हेत. पुत्रास गौणात्मा म्हटले जाते. आत्माच पुत्ररूपाने उत्पन्न होतो असे श्रुति सांगते. म्हणूनच आपापल्या मुलाबाळावर आपली ममता असते. परंतु पुत्ररूपी आत्म्यावर असलेली प्रीती ही उत्तम प्रीती नव्हे. ती गौण आहे. तसे नसते तर श्रुतींनी असे म्हणण्याचे कारणच पडले नसते. मनुष्य सन्मार्गप्रवृत्त व्हावा, तसेच प्रवृत्तीमार्गावलंबी लोकांना केवळ ब्रम्हचर्यपालन करणें शक्य नाही म्हणून त्यानें गृहस्थाश्रमी होऊन आपल्या स्त्रीच्याठायी रममाण होऊन त्यांना सत्पुत्र व्हावेत हीच एक हितोक्ती त्यामध्ये आहे. परस्त्रीगमनादिनी अपवित्र होऊन अधोगतीस जाण्यापेक्षा स्वस्त्रीमध्ये अनुरक्त होऊन, तेहि केवळ सत् प्रजोत्पत्तीसाठीच जगावे एवढेच त्यांचे तात्पर्य आहे. यामध्ये केवळ लोकाचारच असून परमात्मदृष्टी मुळीच नाही.
श्री प.प. सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी