Literature

ज्येष्ठ शुद्ध पंचमी

दृश्य असणारे ‘ विनाशी ‘ व अदृश्य असून चेतनस्वरूपी असणारे ‘ अविनाशी ‘ होय. विनाशकारी वस्तु केंव्हाहि सुखदायी असत नाहीं म्हणून चेतनस्वरूप प्राप्त करून घेणें हेंच सुखाचे साध्य व तोच दु:खनिवारणाचा उपाय होय.

आपलें शरीर आणि बाह्यदृश्यवस्तु हे सर्व आपल्याहून वेगळे असून त्यातील कोणतीहि गोष्ट सुखरूप नाही. त्यांत सुख आहे ही निव्वळ कल्पनाच होय तरीहि काल्पनिक सुखासाठी आपण शरीरावर प्रेम करतोच. शरीर दुःखमूल आहे, आरोग्यानें दृढ शरीर केलेल्या मनुष्यास शरीर सुखकर आहे असें वाटणें साहजिक आहे. पण यदा कदाचित त्या शरीरावर एखादी पुटकळी उठली तरीसुध्दां ताबडतोब दु:खासच सुरवात होते. मरण म्हणजे देहाचे शेवटचें असहनीय दुःख होय. हे कोणालाहि चुकत नाहीं. असें असल्यानें या मिथ्यात्मा देहास काय किंमत आहे ? त्यापासून कोणती सुखप्राप्ती आहे ?

जीवनामध्ये त्यागांतच सुख आहे. भोगांत कोणतेंच सुख नाही. त्याग मानवाच्या उन्नतस्थितीला प्रेरक आहे तर भोग मात्र त्याच्या अवनतीस कारणीभूत होय. त्यागी म्हणजे त्यागीची किंमत कळणारा ज्ञानी. त्याला देहत्यागसुध्दां सुखपर्यवसाची असतो. शास्त्रोक्तरितीनें प्रंपचयात्रा करीत विचारवंत संसारिक मनुष्य ‘ ह्या लोकीं काहीं करण्याची आशा मला शिल्लक राहिली नाही. एक दिवस हरि हरि रित डोळे मिटावे ‘ असें म्हणतो व असे म्हणणाराच ‘ कर्मयोगी ‘ होय.

श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी

home-last-sec-img