Literature

परमात्म्याचे प्रेम

परमात्मा ! परम म्हणजे श्रेष्ठ किंवा महान असा अर्थ. श्रेष्ठ आत्मा किंवा परम आत्मा कोणाला म्हणावयाचे ? अशी शंका येते तेव्हा हा विचार नीट समजावून दिल्याशिवाय निरसन, समाधान होणार नाही.

इतर कोणालाहि परमात्मा म्हटले जात नाही. सर्व जीवजात ज्याची अंशभूत बनली आहेत तोच परमात्मा. प्रदीप्त अग्नीपासून ज्याप्रमाणें ठिणग्या बनतात त्याचप्रमाणें परमात्मा नांवाच्या अग्नीपासून जीवरूपी ठिणग्या उत्पन्न होऊन सर्वत्र पसरल्या आहेत. अग्नीच्या ठिणग्या अग्नीचे अंशच असल्यामुळे त्यांना महत्त्व असते; त्याप्रमाणे परमात्म्याच अंश बनलेल्या जीवांनाहि महत्त्व. ठिणग्या अग्नीचा अंशच असल्याने जसा अग्नी आणि ठिणग्यांत फरक नसतो, त्याप्रमाणेच खऱ्या जाणिवेने परमात्मा व जीवात्मा ह्यामध्ये भेद नाही. असे असले तरीहि ‘तूं मात्र माझा, मी तुझा अंश नव्हे’ असे म्हणणेच व्यवहारांत प्रचलित आहे. तरंग, समुद्र हे एकच. तरंग समुद्राचा एक अंशच, त्याप्रमाणे परमात्म्यापासून जीवांची उत्पत्ति झाली आह, ही जरायुज, अंडज, स्वेदज व उद्भिज अशा चार रूपानी झाली असे विष्णुपुराण व भगवद्गीतेत म्हटले आहे.

अग्नि हा अपार स्वरूपी, ठिणगी ही पार म्हणजेच लहान स्वरूपी. तत्त्व एकच, पण उपाधी भेदामुळे भेद दाखविला जातो. ज्याच्यापासून ज्याची उत्पत्ति झाली ती उत्पन्न झालेली गोष्ट लहान असते. मूळ वस्तु श्रेष्ठ, पूर्ण. ह्या दृष्टीनेंही परमात्मा सर्वांच्या पूर्वीच आहे. त्याने स्वतःच्या संकल्पानुरूप अनेक रूपे निर्माण करून, ती चैतन्यभरत होण्यासाठी तो स्वतःच त्यांच्यांत प्रविष्ट झाला आहे असे भगवद्गीता सांगते.

देहाची निर्मिती करून त्याच्यात प्रवेश केल्यावरच तो जीव ‘जीव’ म्हणवून घेतो. आत्मस्वरूपात प्रविष्ट झाल्यानंतर देह धारणेच्या पूर्वसंकल्पानुसार अनेक देहांमधून तो वावरतो. प्रत्येक देहातून ‘मी वेगळा आहे, मी भिन्न भिन्न आहे’ असे ओळखून तो वागतो. त्यावेळी पूर्व संकल्प पूर्ण होतो असे जर झाले नसते तर अनेक रूपे धरून जगाचे कार्य कसे साधले असते ? सर्व शरीर ‘मीच’ असे समजल्यानंतर आता असणारा भिन्न भिन्न व्यवहार निरनिराळ्या पद्धतीनुसार करणे असाध्यच. अनेक प्रकारच्या कार्यासाठी अनेक देह धारण करावे लागतात. त्या त्या देहाचा अभिमान धरून ते सर्व ‘माझा देह’ ‘माझा देह’ असे समजून घ्यावे लागेल. तसे न केल्यास भिन्न भिन्न कर्मे साधणार नाहीत. अशा प्रकारे अनेकानेक पात्रे त्याने घेतली तेव्हांच पूर्व संकल्प पूर्ण झाला. ‘आजायमानो बहुधा विजायते।’ वस्तुतः तो जन्म घेत नसला तरी आपल्या संकल्पाने हा जो खेळ रचिला आहे ती स्वप्नातील भावनाच होय. आचारांत दिसत नाही ते स्वप्नात दिसते. पण डोळे उघडून पाहिल्यावर मनातील कल्पनाच, मनातील भावनाव ते रूप धारण करते असे आढळून येते.तात्पर्य मी बहु व्हावयास पाहिजे असा संकल्प केला गेला त्यावेळी हे सर्व लोक, लोकपालक वगैरे कांहीही नव्हते. त्यामुळे आपल्या मूळ-मायेने आपणच अनेक रूपांचा संकल्प करून तो परमात्मा त्याप्रमाणे झाला. स्वप्नदृष्टांताप्रमाणे हे सर्व कांही मनोमय. मनोधर्म, संकल्पमात्राचा विचार, अशाप्रमाणे कामना निर्माण होणे, विचार, अलोचना करणें हे सर्व मनाचेच धर्म, मन व बुद्धि ही कांही ठिकाणी एकच तर कांही ठिकाणी वेगवेगळी असे म्हटले जाते. महत् तत्त्वानें समष्टि, बुद्धि निर्माण झाली म्हणजे परमात्मा तेथे त्या रूपाने राहून त्याने संतति निर्माण केली. जगांत हेच दिसून येते.

आपल्या संकल्पापेक्षा आपला आत्मा श्रेष्ठ होय. मन, कल्पना ह्याहूनहि श्रेष्ठ असणान्या जीवाच्या ह्या आत्म्यापेक्षाहि श्रेष्ठ असणारा असा जो कोणी आहे तोच परमात्मा अथवा श्रेष्ठ आत्मा. आणखी इतर दुसरे कांहीहि न पाहता आपल्याशीच ‘आपण कोण ?” असा विचार केल्यास आढळणारे नामरूपरहित असलेलेच आत्मस्वरूप. ‘तोच मी’ असे प्रथम त्याच्या तोंडून ‘सोऽहं’ असे बाहेर पडले तेच सर्वामध्येहि आहे. श्वास घेताना ‘सो’ व सोडताना ‘हं’ असा आवाज येतो. परमात्म्याचे स्वरूप अशाप्रकारे ‘सोऽहं’ असे असतानाच त्याच्यापासून निर्मित प्रतिकार्यहि होत असते.

सर्व कार्ये बुद्धीने होतात असे म्हटल्यावर कोणत्या योगशक्तीने परमात्म्याने सृष्टिकार्य केले ? अनेक देहरूप धारण केले. त्याच्या अभिमानाने ‘जीव’ म्हणवून घेतले ! त्याच्या संकल्पापेक्षा महान, श्रेष्ठ असणारी, शब्दांनी दाखविली जाणारी दुसरी शक्ति म्हणजे बुद्धीच. परमात्मा हा सर्वापिक्षा श्रेष्ठ. त्याचे स्वरूप व विशालता अनंत असल्यामुळे त्याचे जे कांही बुद्धिस्वरूप आहे तीच त्याची शक्ति.

सकल विश्व अनेक वैचित्र्याने निर्माण करणारी शक्तीच बुद्धि. त्याची ही बुद्धीशक्तीच महत् तत्त्व. संकल्परूप बीजाने उत्पत्ती पावलेल्या अनेकतेवर शासन करावयाचे असल्यास त्याच्या शक्तीची आवश्यकता आहे, त्याच्या मनाचीहि आवश्यकता आहे. त्याच्यापासून होणारे असे म्हटल्यानंतर त्याच्याच पूर्णत्वाने परिपूर्ण होणान्या जीवांना त्यानेच स्वतः दिल्याशिवाय पूर्णत्व नाही.

न जन्मलेल्यांना स्त्री-पुरुष अशी दोन रूपे आहेत असे कसे म्हणता येईल ? तो स्त्री नाही व पुरुषहि नाही अशी लिंगभेदरहित ‘मी’ अशी स्फूर्ती असल्याने दोन्ही भिन्न देहाहून वरचढ असाच तो लिंगदेह झाला. अन्नापासून रेत-रज, रेतापासून पुरुष व रजापासून स्त्री. परमात्म्यानेच आपणास दोन प्रकारांत विभागिले आहे. आपला डावा भाग ‘स्त्री’ व उजवा भाग ‘पुरुष’. देहाला जननमरण आहे पण ‘मी’ ह्या परमात्मस्वरूपाला ते नाही. व्यवहारामध्ये ‘मी’ असे जे बोलले जाते ते वेगळे. मायेच्या आश्रूयात ‘मी’ ही गोष्ट निराळी. व्यवहारामध्ये ह्या देहाला ‘मी’ असे म्हणतात तर मूळमायाश्रमामध्ये ईशाला ‘मी’ असे म्हणतात. पण ह्या दोघांहूनहि श्रेष्ठ असणारा, ‘मी’ असे म्हटला जाणारा परमात्मा वेगळाच. तोच श्रेष्ठ आत्मा.

‘मी’ ह्या जाणिवेत भोगणाऱ्या, भोगसाधन असणाऱ्या ह्या देहापासून ‘मानव’ अशा भावनेनें स्त्री, पुरुष एकत्र येऊन परमात्म्याच्या इच्छेनुसार शास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्यांनी व्यवहार करणे हा प्रवृत्तिमार्ग. परमात्म्यास प्राप्त करण्यासाठी दोन मार्ग आहेत. सगुण व निर्गुण प्रवृत्ति. सृष्टिपूर्वीच्या सघन अशा सत्यस्वरूपाला निर्गुण असे नाव तर हे सर्व दृश्य आकारयुक्त असणारे तेच सगुण ब्रह्म म्हणजे म्हणजे अमूर्त, निर्गुणाकार. ते साधावयाचे म्हणजे शास्त्रामध्ये त्याला संन्यास असे नांव आहे आणि ह्या मार्गाचे श्रमिकच संन्यासी.

एकंदरीत पाहातां परमात्म्याचे स्वरूप शोधणें हाच योग्य मार्ग होय. आपले स्वरूपच असलेल्या, एकजिनसी असलेल्या सत्यस्वरूपावर प्रेम करणे हे ‘मनुष्य’ असणाराला व ‘मनुष्य’ होणान्याला अगदी सहजसुलभ आहे. विषयसुख दूर करून परमात्म्याला मिळविण्यासाठी हेच साधावयाचे आहे. आपले स्वरूप हे शुद्ध स्वरूप आहे. तेच आपले मूळ, अशी भावना बाळगून त्या अनंततेत तळपणारा परमात्माच, निराकारात्मक, सर्व सुखस्वरूप ‘मी’ अशी भावना धरून त्याला प्राप्त करून घेतले पाहिजे. कल्पनासृष्टीमध्ये आपणाला सुख कोटचे ? तो सुखाचा निव्वळ आभासच. ते मिळवावयास गेलो तर प्राप्त होणारे ते केवळ दुःखच होय. अद्वैत म्हणजे परमात्म्याला प्राप्त करून घेणे, परमात्माच सुखस्वरूप असे जाणून घेऊन त्याच्यांत एकत्व पावणे हाच खराखरा उद्देश होय. त्याच्या प्राप्तीसाठी करावयाची भक्तीच खरीखरी निजभक्ति, परमात्म्याचे प्रेम, परमात्म्याचे दर्शन करून देणारा मुख्य मार्ग; हे जे समजवून देतो तोच गुरु | गुरुकृपेनें सत्यस्वरूपाचा निश्चय होतो; खात्री पटते; म्हणूनच गुरुकृपा ही अत्यंत महत्त्वाची आहे, असे श्रुति, स्मृति व साधुसंत सांगत आले आहेत. सर्व दृष्टिजातामध्ये परमात्म्याच्या एकाच दृष्टीने पाहिले पाहिजे. आपल्या सर्व कर्माचे ध्येय परमात्मप्राप्तीसाठीच असले पाहिजे. अशा प्रकारे परमात्म्याच्या अनुसंधानाने केलेल्या कर्माच्या फलरूपानें परमात्माच प्राप्त होतो हे जाणून घेऊन आपण सर्वजण सुखाने जगा !!

इति शम्!

home-last-sec-img