*’ लोके गुरूत्वं विपरीततां वा स्वचेष्टितान्येव नरं नयन्ति | ‘*
या जगामध्ये मानवदेह धारण करून आलेलो आपण सर्व निरनिराळ्या कारणांनी व प्रकारांनी भोगीत असलेल्या अनुभवीत असलेल्या सुख-दुःखांना आपण केलेली उच्च नीच कर्मेच कारणीभुत असतात.
हे विशाल जग कर्मसुत्राने बध्द आहे. मनुष्याची श्रेष्ठता, कनिष्ठता, उन्नति-अवनति हे सर्व त्याच्याच कर्माची फळे होत. दुसरे कोणतेही कारण असत नाही. सत्कर्माने उन्नती होते तर असत्कर्माने अवनति होते. मनोवासनारूपी प्रवाह आपल्या कर्मसाधनेसाठी शुभ वा अशुभ यांचा विचार न करता उताराकडे वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहाप्रमाणे अधोगतीकडे जात असतो. ते मनोवासनारूपी प्रवाह प्रयत्नपूर्वक परिश्रमाने सन्मार्गाकडे नेणे हेच विचारवंताचे कर्तव्य होय. सर्व प्रकारच्या सत् किंवा असत् कर्मांना मनच कारणीभूत असते. माकडाप्रमाणेच इकडून तिकडे उड्या मारणाऱ्या मनास कह्यात आणून, अंकित ठेवून सन्मार्गाकडे नेणे हे अत्यावश्यक कर्तव्य होय. जसे वहात असणाऱ्या प्रवाहास माणसे बांध घालून त्याचा योग्य तो उपयोग करून घेतात, त्याप्रमाणेच दुष्टकार्यप्रवृत्त मनास अंकित करून थोपवून सन्मार्गाकडे वळविणे हे मनुष्याचे कर्तव्य आहे. असे न केल्यास अधोगती ठरलेलीच !!
*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*