बाह्यवेषभुषेमुळे शरीरामधील आत्म्याची कल्पना होत नाही. तसेच आत्म्यावर संस्कारही होत नाहीत.
मनुष्यदेहाला सुखप्राप्ती करविण्यासाठी इंद्रिये जितके प्रयत्न करतात तितका तो देह निकृष्ठावस्थेत पोहोचतो. रोग्याला औषधोपचार न करता तसेच पथ्यापथ्याचा विचार न करता वाटेल तसे खाण्यापिण्यास मनमुराद दिले तर तो बरा होईल काय ? त्याचप्रमाणे प्रापंचिक सुखासाठी मनमानेल तसे वागणाऱ्या मनुष्यास दिन प्रतिदिन, क्षणगणिक अधोगतीच प्राप्त होत असते.
म्हणूनच जग मिथ्या, जगातील व्यवहारही मिथ्या असून ते नाटकामधील भावेशाप्रमाणेच होत अशी जाणीव करून घेऊन आत्मनिष्ठ होऊन सुक्ष्मरितीने आत्मस्वरूप जाणून आत्मज्ञानी होण्याची धडपड केली पाहिजे. असत्य, अरूचि, विकृती, दुर्गंध यांनी युक्त असलेल्या या जगात सत्य, सुरूचि, सौंदर्य, सुगंध कोठुन असणार ? म्हणुन मीपणाच्या जगद़्व्यापी जाणीवेने परम मंगल आनंदरूप, परिशुध्द अशा परमात्म्याचे स्मरण करा ! बाह्यशरीर म्हणजेच ‘ मी ‘ ही भावना विसरून जा ! या तुच्छ शरीरात सुखसौंदर्याच्या भावनेस मुळीच वाव देऊ नका ! परमात्मरूपी दिव्यसुख म्हणजेच माझे सुख व परब्रह्म म्हणजेच ‘ मी ‘ अशा विशालदृष्टीने विचार करा !!
*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*