Literature

पौष शुद्ध तृतीया

 ज्ञान हे प्रकाशरूप आहे असे म्हटले जाते. अंतर्बाह्य जगतात लाट-स्वरूपी  पाण्याप्रमाणे सर्वत्र ज्ञान भरले आहे. या ज्ञानामुळे बाह्य जगतातील सूर्य- चंद्रादिकांचा प्रकाश पाहू शकतो. ज्ञानरूपी प्रकाशाने जगतातील सर्व वस्तूंचे आपणास ज्ञान होते.  मन, इंद्रिये व त्यांचे कार्य या सर्वांना सर्वव्यापी आत्मप्रकाशच कारणीभूत आहे.  या सर्वांचे अस्तित्व व नाश ही ज्ञानरूप प्रकाशनेच समजू शकतात.उत्पत्तीनाशरहित अविनाशी आत्मप्रकाश उत्पत्तीलय असलेल्या बाह्यजगाशी असंबंधित व नेहेमी निर्विकार असतो हे उघड आहे.  मृगजलाभासात सूर्यप्रकाश मुख्य असतो.त्याप्रमाणे मिथ्य जगदाभासांत आत्मप्रकाश सर्वठिकाणी भरलेला आहे. मृगजलाभासांत सूर्यप्रकाश मुख्यत्वे कारणीभूत असतो तर जगाच्या मिथ्याभासांत आत्मप्रकाशच मुख्यत्वे कारणीभूत आहे. या व्यावहारिक जगात अनुभवास येणाऱ्या सर्व वस्तूंना कारणीभूत असा हा आत्मप्रकाशच होय हे त्रिकालाबाधित सत्य आहे. अज्ञानाने दोरीचे खरे स्वरूपे न जाणता तो सर्पच आहे असा निश्चित आभास होतो, त्याप्रमाणे ब्रम्हरूपाचे ज्ञान करून न घेतल्याने अज्ञानामुळे जगच सत्य आहे असा अज्ञान्यास भास होतो. दोरीचे खरे स्वरूप समजल्यावर सर्पाचा आभास नष्ट होतो तद्वत ब्रम्हरूपज्ञानाने जगाच्या सत्यत्वाचा आभास नाहीसा होतो. 

*श्री.प.प.सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी* 

home-last-sec-img