Literature

फाल्गुन वद्य प्रतिपदा

साधकांने लोकोद्धाराचा संकल्प केला नसला तरी तो आपल्या अभ्यासाच्या दृढतेसाठी ज्ञानविचार करीत असतो. ब्रह्माभ्यासाचे लक्षण सांगताना पंचदशीकारांनी ब्रह्मतत्वाचे चिंतन, प्रतिपादन व चर्चा अशा कोणत्याही रितीने अखंडपणे अद्वितीय भावाने ब्रह्मतत्वाचा अभ्यास करणे यालाच ‘ब्रह्माभ्यास’ म्हटले आहे.

जोपर्यंत अद्वितीय अशा ब्रह्मतत्वांचे ज्ञान होत नाही तोपर्यंत सर्व लोक भ्रमिष्ठच होत. अशांना मुक्ती कशी मिळणार? व त्यांना सुख कसे प्राप्त होणार? यासाठी आपले स्वतःचे स्वरूप व श्रीगुरूपरमात्मा ही सर्व एकाच अद्वैत ब्रह्मस्वरूप आहेत अशी भावना आपण निरंतर बाळगली पाहिजे. अद्वैतब्रह्मनिष्ठा प्रवाहाचा आश्रय करूनच भवसमुद्र पार करून जीवनमुक्ती प्राप्त केली पाहिजे. याशिवाय इतर कोणताही उपाय नाही.

भिन्न भावनाच भय उत्पन्न करते. मायेचे स्वरूप थोडक्यात सांगावयाचे झाल्यास ” अज्ञान ” हे ते स्वरूप होय. ते अज्ञान जोपावेतो आहे तोपावेतो भिन्न भावना असणारच फक्त ज्ञानानेच परमार्थत्व रूजून अद्वैतब्रह्माची जाणीव होते. जग हे विविध भिन्नत्वयुक्तआहे व अद्वैतब्रह्मस्वरूपाचे अज्ञानच त्यांचे मुळ कारण आहे असे रामगीतेत श्रीरामप्रभूनी म्हटले आहे.

*श्री.प.प.सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img