सुखाची इच्छा सर्वांनाच असते. सुख हा दोन अक्षरी शब्द. पण हे सर्व जग त्या सुखाकरताच धडपडत असते. सुख कसे प्राप्त होईल ? हा प्रश्न सर्वांच्या पुढे आहे. विराट, हिरण्यगर्भ, ईश्वर, महामाया हे ज्यांच्यापाशी नाहीत अशा अशा श्रीगुरूंच्या कृपेनेच सुख प्राप्त होते. श्रीगुरू मोक्षाधिकारी आहेत, त्यांच्या हातात मोक्ष आहे, म्हणून त्यांचे नांव ‘ मोक्षपाणि ‘. निरतिशयानंदाची प्राप्ती म्हणजे मोक्ष. सर्वप्रकारच्या आनंदाहून श्रेष्ठ असा ब्रह्मानंद गुरूंच्या हातात आहे. आनंदरूप म्हणजेच परमसुख रूप असा मोक्षच गुरूंच्या हाती आहे. मग अशा या गुरूमूर्तीचे वर्णन कसे व किती करावे ? ज्याच्या कृपाप्रसादाने जन्म मरण नाहीसे होऊन जन्ममरणास कारणीभूत असलेल्या वासना पूर्णतया नष्ट होतात, असा गुरू सर्वतोपरी श्रेष्ठ होय.
मोक्षरूपी महासुखाची प्राप्ती करून देणाऱ्या गुरूनाथांना इतर अल्पसुख मिळवुन देणे असाध्य नाही. कोट्याधीश श्रीमंतास पाच दहा रूपयांची काय किंमत,वाटणार ? अर्थात काहीच नाही. आत्मज्ञान्याने श्रीगुरूंची आराधना केल्यास त्यास सर्व ऐश्वर्य प्राप्त होतात असे श्रुतींनी म्हटले आहे. अशा गुरूश्रेष्ठास शरण जाऊन मोक्षप्राप्त करून आनंदरूपाने रहाणे हे सर्वांचे कर्तव्य होय.
*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*