Literature

ब्रह्मप्राप्ती

यदा सर्वे प्रमुच्यन्ते कामा येऽस्य हृदि धिताः। अथ मोऽमृतो भवत्यत्र ब्रह्म समश्रुते ॥ (कठ. २-३/१४)

‘नष्ट होणाऱ्या, मृत्यु पावणाऱ्या देहास ‘मी’ असे म्हणून, अभिमान धरून आपणहि मर्त्याप्रमाणे बनलेल्या हया जीवाच्या अंतःकरणात खोलवर रुतलेल्या विषयवासना ज्यावेळी समूळ नष्ट होतील त्यावेळीच हा जीव आनंदरूपाने उरून अविनाशी होईल आणि तेव्हांच त्यास ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती होईल’. असे कठोपनिषदात यमधर्माने नचिकेतास सांगितले आहे.

यत्तदद्रेश्यमग्राह्यमगोत्रमवर्णम् । अचक्षुः श्रोत्रं तदपाणिपादम् ॥

नित्यं विभुं सर्वगतं सुसूक्ष्मं तदव्ययं । यद्भूतयोनि परिपश्यन्ति धीराः ॥’ (मुंड. १-१/६) -70

अदृश्य, ग्रहण करण्यास शक्य नसणाऱ्या सर्व लक्षणशून्य, ज्यास गोत्रसूत्र नाही अशा सर्व वर्णाश्रमशून्य असणान्या, हस्तपादशून्य, नेत्र श्रोत्रशून्य, नित्य, सर्वरुपी, सर्वव्यापी, आकाशाहून सूक्ष्म असणाऱ्या, अविनाशी सर्वकारण अशा त्या आनंदरूप असणाऱ्या ब्रह्मास बुद्धिवान सर्वत्र पहात असतो.’ असे मुंडकोपनिषदात सांगितले आहे.

ज्याप्रकारे दुर्योधनाने बलवान असणाऱ्या यादव सैन्याची मागणी केली तर अर्जुनाने बलवान अशा श्रीकृष्णासच निवडले, त्याचप्रकारे अज्ञानी जन सुख म्हणून सृष्टीतील पदार्थाची निवड करतात तर विवेकीजन सुख म्हणून परमात्म्यास निवडतात. श्रीकृष्ण परमात्म्यास आपणाकरिता निवडल्यामुळे अर्जुनास यशाची प्राप्ती होऊन साम्राज्यहि मिळाले त्याचप्रमाणे सुखाकरता परमात्म्यास निवडल्यामुळे विवेकी जनांना शांतिसमाधानाचा लाभ होऊन ब्रह्मसुखसाम्राज्य अनुभवास येते, अविवेकी अज्ञानी हे, कार्यच सुखरुप समजतात व विषयसुखासाठी धडपड करीत दु:खरुपी बनतात तर विवेकीजन परमात्मसुखासाठी धडपड करून शेवटी सुखरूप बनतात.

ह्या जगाला परमात्मा हाच मूळ कारण नाही का? परमात्म्याहून जास्त सुख ह्या सृष्टीतील पदार्थापासून कधी तरी लाभेल काय ? खरे सुख, खरा आनंद म्हणजे ते परमात्मस्वरुप होय. आनंदप्राप्तीसाठी आपण परमात्मस्वरुपच प्राप्त केले पाहिजे नाही का? विचार करून पहा. खऱ्या आनंदाचा यथार्थ विचार करून, त्याची प्राप्ती करून घेण्यासाठीच, होण्यासाठीच हा नरदेह आपणाला लाभला आहे. इतर सर्व योनीमध्ये भोगच प्रधान असल्याने त्यांना ‘भोगयोनी’ असे नांव आहे. ह्या मनुष्य योनीत ‘त्याग’ च मुख्य आहे. सत्यसुखाचा निश्चय करून त्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्नशील होऊन तें प्राप्त करून घेणे हे मानवी जीवनाचे एकमेव प्रमुख ध्येय आहे. वैषयिक इच्छापूर्तीसाठी धडपड केली तर- ‘इदं च नास्ति परं न लभ्यते’ असे होईल. नष्ट होणारे विषयसुख केव्हांहि नष्ट होतेच व त्या कालापव्ययांत मोक्षहि हातचा परत जातो. जागतिक जीवनांत द्वेष, कंटाळा, तिरस्कार निर्माण न करणारे कोणते सुख आहे ह्याचा शोध घेऊन, शाश्वत सुख कोणते ते ओळखून त्याच्या प्राप्तीसाठी आपले जीवन पणास लावा. देहानें तिरस्कारणीय दुर्गंधीत भोग अनुभवून नरकास पात्र होऊ नका! मी ‘स्त्री’मी ‘पुरुष’ असा ह्या घाणेरड्या देहाचा अभिमान बाळगून दैन्ययुक्त जीवन व्यतीत करण्यापेक्षां परमात्मस्वरूपाच्या स्मृतीने आनंदरूप होऊन जीवन जगणे कितीतरी श्रेष्ठ आहे तें तुम्हीच पहा.

‘अहं ब्रह्मास्मि’ रूपी स्वरूपाची स्मृतीहि आभास निर्माण करते. त्यामुळे ते केवळ एक आनंद म्हणून न मानतां निर्विकल्प असणाऱ्या श्रुतीने जरी बोध करावयाचा असल्यास ‘अहं ब्रह्मास्मि’ भावना होण्याइतके पुढे गेलों तरी खऱ्या आत्मस्थितीत असल्यासारखे होत नाही, असे म्हटल्यावर रजोरेताच्यामुळे उत्पन्न झालेल्या ह्या देहाच्या ठिकाणी ‘मी’ म्हणून भावना ठेवणे किती खालच्या पातळीचें ? व किती पराकाष्ठेची मूर्खता आहे ? याचा तुम्हीच विचार करा! खरें पाहिले तर भोगाच्या दृष्टीने असलेला देह अत्यंत अपवित्र असतो हे सांगावयास पाहिजे काय ? कोणतें योग्य व चांगले आहे हे दुसऱ्याना देहदृष्टीने न पाहतां आनंदरूप अशा ब्रह्मदृष्टीने पहाण्याने स्वरूपाचा उद्धार अनंत अशा सुखाचा लाभ होतो.

आनंद हे जगत्कारणरूप अशा ब्रह्मतत्त्वाचे स्वरूपलक्षण बनलेलें आहे. नाम रूप हे जगाचे लक्षण होय. जगाच्या पूर्वीच असलेल्या आनंदास जगांत संबंधित असणारी नाम-रूपे नाहीत. तो आनंद नामरूपरहितच असून अद्वितीय असल्यामुळे तोच एकमेव ह्या चराचर विश्वाचे, तुमचें, आमचे स्वरूप आहे असे तुम्ही को गृहित धरीत नाही? त्या आनंदातच देहभान हरपून आनंदमात्र कां रहात नाही?

स्त्री-पुरूष, पशु-पक्षी इत्यादि स्थिर-चर प्राण्यांना त्या आनंदरूपाने पाहून त्या अविनाशी अनंतरूपी, नित्य निर्विकारी असणाऱ्या आनंदाला का अनुभवित नाही ? तेच स्वरूप असून इतर दुसरे नसल्यामुळे कशाचीहि कल्पना न करता आपणच आपण होवन एका आनंदस्वरूपानेच तुम्ही कां रहात नाही?

कोणती तरी एक वृत्ति किंवा कल्पना निर्माण झाल्यानंतर अथवा तुम्हास कोणती तरी भावना उद्भवून सुख-दुःख शोक, मोह राग-द्वेष इत्यादि सर्व विकार होतात. ह्या वृत्तीची, कल्पनेची अपेक्षा असणारे दुःखरूपी जीवन जगण्याचे सोडून द्या! कोणतीहि वृत्ति, कोणतीहि कल्पना, कोणतीहि भावना नसणारे निर्विकल्प आनंद किंवा आनंदरूपी तुमचे स्वरूप गृहीत धरा! हेच मुक्ति साम्राज्याचें महाद्वार होय.

गाढ सुषुप्तीने सर्व काही लपले जावून इतर दुसरे काहीहि दिसत नसल्याने अस्तित्वात असणारे केवळ एक आनंदरूपच तुमचे रूप आहे. ही गोष्ट मनांत दृढ करावी. नाम-रूप कल्पना, वृत्ति, वासना ह्यांनी लागलेले वेड पूर्णतया घालवावे. एक कल्पना अथवा वृत्ति नाहीशी होऊन दुसरी येण्यापूर्वी असणान्या सर्व कल्पनाशून्य अशा एका आनंदातच तुम्ही दृढ होवून रहा ! विवेकाच्या सोसाटयाच्या वाऱ्याने उद्भवलेल्या अनंत अशा आत्मानंदाच्या वणव्यांत तुमचे कामादिविकार वाळलेल्या गवताप्रमाणे जळून नष्ट होवून त्याचा नामनिर्देशहि रहात नाही. मला देहकाराने पाहूं नका! तुमचें आनंदस्वरूपच मी असे ओळखून मला पाहत असतां, तुमच्या देहाची भावना विसरून जा, तरंग समुद्रात मिसळून अनंत असा समद्रच होण्याप्रमाणे ‘मी’ ही जाणीवहि नाहीशी होऊन एक अपार आनंदच होऊन रहा. हीच त्रिकालाबाधित सत्य स्थिती होय.

‘ इति शम्’

home-last-sec-img