आनंदो ब्रम्हेति व्यजानात्
आनंदाध्येव खल्विमानि
भूतानि जायन्ते
आनंदेन जातानि जीवन्ति
आनंदं प्रयन्त्यभिसंविशन्ति
या जगाचे कारण ब्रह्म आनंदरूपच आहे. त्या आनंदापासूनच खरोखर या अखिल स्थिरचर विश्वाची उत्पत्ति झाली. अशी ही उत्पन्न झालेली सर्व सृष्टि त्या एका आनंदानेंच जगून आहे. आपल्या मूलकारण आनंदाकडेच या अखिल सृष्टिची धांव आहे. शेवटीं सर्वहि ही सृष्टि त्या आनंदरुपांत प्रविष्ट होऊन त्यांतच एकरूप होऊन जाते, अर्से श्रुतीचें सांगणें आहे. हा शोध खरोखरीं मूलग्राही आहे. अंतिम शोध हाच. यापेक्षा मोठा शोध न भूतो न भविष्यति. इथें सर्व शोधांची परिसमाप्ति आहे. पूर्णता आहे. उद्दिष्टांची पूर्ति आहे. याच ठिकाणीं जगाच्या प्राप्तव्याची हाव शांत होते. अहर्निश, प्रयत्नशील असणाऱ्या मनाच्या सुखाची तहान पूर्णपणे इथेंच भागते. या एका सुखाच्या अचूक शोधानें जगाच्या अहम हमिकेचा अंत होतो. जळफळ नष्ट होते, विकार निर्विकार होतात. जग जे समरांगण झालेले असतें तें आनंदांत विरून रहाण्याचे एक पवित्र ध्यान क्षेत्र होतें. या शोधानें जगांतलें दुःख मावळतें, शोक नाहींसा होतो, उणीव कशी ती भासत नाहीं. श्रीमंतापासून अठरा विश्वे दरिद्री मनुष्यापर्यन्त सर्वांचेंच जीवन नितांत शांतीर्चे, नित्य तृप्तीचें, अचल समाधानाचें, सर्व समानतेच्या अनंत सुखार्चे, अगदी त्या सत्यसुखाचें होतें यांत कसलीहि शंका नाहीं.
“यः कश्चित्सौख्यहेतोस्त्रिजगति यतते नैव दुःखस्य हेतोः । ” तिन्हीं लोकांत सुखाकरितांच कोणीहि प्रयत्न करतांना आढळेल असें आचार्यांनीं ‘सुखं लब्ध्वा करोति नासुखं लब्ध्वा करोति‘ (छां. उप.) या वैदिक सिध्दांताचाच आपल्या शब्दांत आविष्कार करून जगापुढे ठेवला. श्रुतीचें “यो वै भूमा तत्सुखं नाल्पे सुखमस्ति, भूमैव सुखं भूमात्वेव विजिज्ञासितव्य इति” अनंत अपार सुखच एक खरें सुख. काजव्याच्या प्रकाशाप्रमाणे मिणमिणणारे अल्प वैषयिक सुख सुखच नव्हे. अपार अनंत तेंच खरें सुख म्हणून खऱ्या सुखाचा परिचय श्रुति करून देत आहे. “यत्र नान्यत्पश्यति नान्यच्छृणोति नान्य द्विजानाति स भूमा । भूमैव सुखम् ।।‘ पाहण्यास, ऐकण्यास आणि जाणण्यास जेथें एका सुखाव्यतिरिक्त अन्य म्हणून कांहींच असत नाहीं असे अद्वितीय सुखच खरें सुख आहे. असा अखिल मानवाकरितां श्रुतीनें दिलेला सुखाचा संदेश आहे. “धर्मे पृष्ठे मनुर्ब्रह्म जगतः कारणं वदन् । आत्मज्ञानं परं धर्मं वित्तेति व्यक्तमुक्तवान् ।” एकत्र मिळालेल्या महर्षीनीं धर्म म्हणजे काय म्हणून विचारलें असतां ‘ब्रह्मजगाचें मूळस्वरुप आहे म्हणून सांगून तें ब्रह्मात्मज्ञान करून घेणे हा मनुष्याचा श्रेष्ठ धर्म होय,’ अर्से मनूनें स्पष्ट कळविले आहे. भगवन् “सर्व वर्णानां यथावदनुपूर्वशः । अंतरप्रभवानां च धर्मान्नौ वक्तुमर्हसि ॥” ही मनूजवळ इतर महर्षीची पृच्छा आहे. यांत त्यांनीं मुख्य वर्ण (जाति) व पोटजातीं यांचे जन्म, धर्म आणि कर्म आम्हांला तूं सांग म्हणून मनूजवळ प्रार्थना केली आहे. आधीं ब्रह्मात्मज्ञानाचे निरुपण करून मग वर्णाश्रमधर्म, पोटजातीं व त्यांचें धर्मकर्म सांगितलें असल्यामुळे प्रथम सर्वांनीं आत्मज्ञान करून घेऊन मग आपआपल्या वर्णाश्रमाप्रमाणें, जातिधर्माप्रमाणे वागावें असा यांतून निष्कर्ष निघतो. ‘ज्ञानरहित तळमळ जाणार नाहीं ।‘ असें श्रीसमर्थांप्रमाणेंच मनूलाहि वाटते. चातुर्वर्ण्य ‘वेदप्राप्त‘ नाहींत अर्से म्हणणें निराधार आहे. ‘चातुर्वर्ण्यं त्रयो लोकाश्चत्वारश्चाश्रमाःपृथक् । भूतं भव्यं भविष्यं च सर्वं वेदात्प्रसिध्यति ||” (मनु) ब्राह्मणादि क्रमानें चार वर्ण, ब्रह्मचर्यादि क्रमानें चार आश्रम, स्वर्ग, मृत्यु, पाताळ हे तीन लोक, वर्तमान, भूत, भविष्य, सर्वच देवांनीं वेदांपासून निर्माण केले. ‘आत्मज्ञानं तितिक्षा च धर्मः साधारणो नृप ।‘ (महाभारत) ‘इज्याचारदमाहिंसादानें स्वाध्याय कर्म च । अयं तु परमो धर्मो यद्योगेनात्मदर्शनम् ॥‘ (याज्ञवल्क्य) इत्यादि वाक्यें आत्मज्ञानच मनुष्याचा मुख्य धर्म होय हें सुचवितील. श्रीसमर्थांनीहि सकळ धर्मामाजीं धर्म । स्वरुप राहणे हा स्वधर्म ॥ असेंच सांगितलें आहे. ‘जन्माद्यस्य यतः ‘ हैं चराचर विश्व ज्या आनंदरूप ब्रह्मापासून निर्माण झालें तें याचें मूळ स्वरूप होय. तेव्हां त्या आपल्या स्वरुपाच्या परिज्ञानानें असणें हा प्रत्येकाचा स्वधर्म होतो हैं कोण नाकबूल करील? ‘ज्ञेयं यत्तत्प्रवक्ष्यामि यज्ज्ञात्वामृतमश्नुते। अनादि मत्परं ब्रह्म न सत्तन्नासदुच्यते ।।‘ इथें जाणण्यासारखें एक परब्रह्मच आहे. ‘देहो देवालयः प्रोक्तः स जीवः केवलः शिवः । त्यजेदज्ञाननिर्माल्यं सोऽहं भावेन पूजयेत् ।।‘ देवपूजनाचा विधीहि पण असाच ज्ञानप्रधान आहे. देह देवालय आहे व जीव हा सदाशिव आहे. तेव्हां अज्ञाननिर्माल्य काढून टाकून आनंदरूप परमात्माच माझें यथार्थरूप आहे या ऐक्यानुभवानें देवपूजा करावी अशीं ज्ञानोत्तर उपासना सांगितली. ‘ज्ञानोदयादूध्वं भवतु शास्त्ररक्षणम् ।‘ ज्ञानोदयानंतर शास्त्राचे पालन म्हणजे कर्म उपासनेचें आचरण करणें हें वैदिक धर्माचें रहस्य आहे.
‘यतो वा इमानि भूतानि जायन्ते । येन जातानि जीवन्ति । यत्प्रयन्त्यभिसंविशन्ति तद्विजिज्ञासस्व तद् ब्रह्मेति । ‘ असें श्रुतीचें सांगणें आहे. या मंत्रानें ब्रह्मस्वरुपाचा परिचय श्रुतीनें करून दिला आहे. हे सर्व कार्यजात जिथून निर्माण होते, झालेला सर्व प्राणिवर्ग ज्याच्यामुळे जगतो, सर्व दृश्य ओसरून गेल्यानंतर सर्व जीव विश्रांतीकरितां सुषुप्ति अवस्थेत ज्या एक स्वरुपाकडे धांव घेतात आणि आत्मज्ञानानें सर्व प्राणी शेवटीं ज्या सर्वतोव्याप्त अद्वितीय स्वरूपांत एक होऊन जातात, तेंच ब्रह्म म्हणून तू जाण, अर्से श्रुतिमाऊलीनें कळविलें आहे. ‘यल्लाभान्नापरोलाभः यत्सुखान्नापरं सुखम् । यज्ज्ञानानपरं ज्ञेयं तद्ब्रह्मेत्यवधारयेत् ।‘ ज्याच्या समान व अधिक लाभ नाहीं, ज्याच्या समान व अधिक सुख नाहीं, ज्याच्या समान व अधिक ज्ञेयहि नाही आणि ध्येयहि नाहीं तें ब्रह्म जाणावें. ‘स यो ह वै तत्परमं ब्रह्म वेद ब्रह्मैव भवति । तद्ब्रह्माहमिति ज्ञात्वा ब्रह्मैव भवति स्वयं ॥‘ श्रवण, मनन निजध्यासानें जो कोणी
‘तें आनंदरूप ब्रह्म मी‘ म्हणून निश्चयानें जाणतो तो तद्रुप होतो, असें श्रुतीचें सांगणे आहे. जें अन्यसाधननिरपेक्ष, अन्यशून्य असतें, ज्याहून श्रेष्ठ अर्से दुसरें कांहींहि नसून जें सर्वांहून निरवधिश्रेष्ठ असतें तें सुखच आनंद म्हणवून घेतें. ‘सच्चिदानन्दस्वरूपं ज्ञात्वा आनन्दरूपा या स्थितिः सैव सुखम् ।।‘ सच्चिदानंद स्वरुपाचा साक्षात्कार झाल्यानंतर, जी एक निरंकुश तृप्तीची, नितांत शांतीची, निरवधि आनंदाची स्थिति बाणते त्या जीवन्मुक्त स्थितीर्चेच सत्यसुख अर्से नांव आहे. ‘नात्मलाभात्परो लाभः । ‘ या निजरुपाचा लाभ होणें हाच खरा लाभ होय. याहून जास्त असा लाभ दुसरा कोणताहि नाहीं. आनंदाची प्राप्ति हेंच सर्वसामान्य मानवध्येय झाल्यानंतर त्याच्या प्राप्तीच्या त्यागमय साधनांतून आपल्या उन्नतीचा मार्ग आक्रमणें मनुष्याचें कर्तव्य ठरतें. ‘प्रपंचाप्रवर्तकं लयोन्मुखीकरणं साधनम् । ‘ जागतिक सुखाची ओढ न लावणारे, मनाचा लय साधणारे एक आत्मज्ञानच खऱ्या सुखाच्या प्राप्तीचें अचूक साधन आहे. खरा आनंद हा एक स्वसत्ताक चिन्मात्ररूप आहे. त्याची प्राप्ति म्हणजे तद्रूपता. तद्रूपर्तेतच खऱ्या आनंदाची प्राप्ति आहे. केवळ आनंदच एक परमात्मरूप होय. तेंच या चराचराचे मूळ. तद्रूपतेनें रहाणे हाच प्रतिप्राणिपदार्थांचा मूळ स्वभावधर्म होतो. या निःस्फूर्तिक निश्चल आनंदावर जें कांहीं स्फूर्तियुक्त, काल्पनिक अथवा आकार दृश्य भासत असेल तें सर्व मूळरूपानें एक आनंदमात्र आहे असा निश्चय राखून प्रत्येक वृत्तींतून आणि दिसून येणाऱ्या प्रतिप्राणिपदार्थातून आनंदघन स्वरूपाचा अविच्छिन्न अनुभव ठरून तो अखंड प्रकाशू लागला कीं स्वरूपसाक्षात्कार झाला म्हणून समजावें. ‘ब्रह्मवेदं विश्वमिदं वरिष्ठम् ।‘ हें सर्वहि विश्व बह्मरूप आहे. दृष्टिं ज्ञानमयीं कृत्वा पश्येत्ब्रह्ममयं जगत् । ‘ दृष्टि ज्ञानरूप करून अखिल विश्व ब्रह्ममय बघावें. ‘दृश्यं ह्यदृश्यतां नीत्वा ब्रह्माकारेण चिंतयेत् ।‘ मूळ स्वरुपार्ने आनंदमात्र जगत् उरवून त्याचें नामरूप न आठवितां त्याच्या ब्रह्माकारतेचें चिंतन करावें. जाणीव आनंदरूप झाली आणि इतर कांहीं स्मरलें नाहीं म्हणजे जें उरतें तोच एक आनंद. हा आपल्या अस्तित्वानें एकच असतो. आणि वृत्यात्मक ज्ञान नाहींसें झालें म्हणजे तो स्वतःच जाणीवरूप होतो. तात्पर्य ‘ईशावास्यमिदं सर्वम् ।‘ यावरील श्रीमत् शंकराचार्यांच्या भाष्याप्रमाणें अखिल दृश्य आणि चिंतनात्मक बाह्यांतर प्रपंच केवळ आनंदरुपानें करविर्णे हा असा सत्यस्थितीनें राहण्याचा अभ्यास आहे. ‘तज्जलानीति शांत उपासीत ।‘ हा मंत्रहि याच आशयाचा आहे. जग हें आनंदापासून झालें आहे म्हणून आनंदरूपच आहे. त्यांत ऐक्य पावणारें म्हणूनहि आनंदरूपच आहे. आणि त्यामुळे चालणारें म्हणूनहि आनंदरूपच आहे, या निश्चयानें या शांत, निर्विकल्प, चिन्मात्र, निश्चल, अद्वितीय आनंदरूप परब्रह्माची स्वस्थपणे उपासना करावी. स्वतःसिद्ध आनंदांत विरून तद्रूप अनुभवानें उरावें अर्से खऱ्या सुखाच्या प्राप्त्यर्थ साधन श्रुतीनें सांगितले आहे. ‘तस्य नेतीति आदेश: ‘ त्या आनंदाचा अनुभव येण्याकरितां ‘हैं नव्हे हैं नव्हें‘ म्हणून अद्वितीय आनंदाव्यतिरिक्त भासणाऱ्या आणि दिसणाऱ्या सर्व कार्यकारणाचे निराकरण करून शेवटीं जो स्वमात्र आनंद उरतो त्यालाच स्वपररुपानें उरविणे, त्या एका आनंदरूप जाणीवेव्यतिरिक्त कांहीं नच स्फूरूं देणे आणि शेवटी त्या आनंदरुपानें असर्णे हा परमेश्वर प्राप्तीचा अंतिम उपाय आहे. आनंदाचा अखंड अनुभव टिकून राहून जाणीवेंत आनंदमात्रताच अखंड अनुभूत होऊं लागली म्हणजे स्वरूपस्थिति बाणली असे समजावें. ‘निर्विकल्पा च चिन्मात्रा वृत्तिः प्रज्ञेति कथ्यते । सा सर्वदा भवेद्यस्य स जीवन्मुक्त उच्यते ।।‘ या श्लोकांत जीवन्मुक्तांची स्थिति वर्णिली आहे. : निर्विकल्प अशी ज्ञेयशून्य ज्ञानमात्र स्थिति प्रज्ञा म्हणविते आणि अशी ऋतंभरा प्रज्ञा ज्याची सदाच असते तो स्थितप्रज्ञ अथवा जीवन्मुक्त असतो. ‘निमिषार्धं न तिष्ठन्ति वृत्तिं ब्रह्ममयीं विना।‘ एक क्षणसुद्धां ब्राह्मी वृत्ति विरहित तत्त्वज्ञानी रहात नाहीं. ‘पुंखानु पुंखविषय क्षण तत्परोऽपि ब्रह्मावलोकनं धियं न जहाति योगी ।‘ अनेकानेक विषय पाहत असतांना देखील ब्रह्मस्वरूपाची आठवण तो विसरत नाहीं. ‘यथापकृष्टं शैवालं क्षणमेकं न तिष्ठति । आवृण्येति तथा माया प्राज्ञं वाऽपि बहिर्मुखम् ।‘ बाजूला सारलेले शेवाळे एका क्षणांत पुनः पाण्याला झांकल्याप्रमाणे बहिर्मुख झालेल्या ज्ञान्याला देखील आवरणरूप माया झांकून टाकते. म्हणून ‘प्रमादो ब्रह्मनिष्ठायां न कर्तव्यः कदाचन ।‘ एक क्षणभरसुद्धां तें आनंदस्वरूप विसरून राहू नये, ‘सुप्तेरुत्थाय सुप्त्यन्तं ब्रह्मैकं प्रविचिंत्यताम् । दधान्नावसरः क्वापि कामादीनामनागपि ।‘ झोपेंतून उठल्यापासून तो पुनः झोपेपर्यंत अद्वितीय आनंदस्वरूपार्चेच चिंतन करावें. कामादि वृत्तींना प्रवेश करण्यास थोडासुद्धां अवकाश उरवूं नये असे उपनिषदांचे सांगणे आहे.