Literature

भाद्रपद वद्य प्रतिपदा

ज्याच्या ठायी पहाण्यास, ऐकण्यास व समजण्यास इतर काहीच शिल्लक नसते. फक्त एकमेव अखंड
सुखरूपच शिल्लक असते. तेच परमात्मरूप होय. जेथे दृश्य व द्रष्टा, श्रवणीय व श्रोता, ज्ञात व ज्ञानी हे

निरनिराळे असतात असे हे विश्व अल्प आहे. जे निरवधि सुख व अद्वितीय परमात्मरूप आहे तेच एकमेव
नित्य, निर्विकार अविनाशी तत्त्व होय. याच्या विरूध्द लक्षणांनी जे असते तेंच अल्प होय.

हे परमात्मस्वरूपसुख कोठे व कोणाच्या आश्रयाने रहाते ? असा प्रश्न केल्यास त्याला ते सर्वोपाधी
विनिर्मुक्त सत्ता-मात्र स्वरूप आहे असेंच उत्तर आहे. परमात्मरूप आपल्याच प्रभावाने व वैभवाने प्रभावशाली
व वैभवशाली आहे ते आपल्याच महिम्यामुळे सुप्रतिष्ठित आहे तेच सर्वांचा आधार होय. त्याला कोणाचाही
आधार नाही. केवळ आनंद व सुख हेच त्याचे रूप. ज्याप्रमाणे रज्जूवर सर्पाचा आरोप केला जातो तद्वत
अद्वितीय आनंदरूप परमात्म्यामध्ये या जगताच आरोप मात्र केला जातो.

गाई-म्हशी, हत्ती-घोडे, सोने-चांदी, दास-दासी, आयुष्य-आरोग्य, व्यवहार-बुध्दी, स्वरूपवान भार्या-पुत्र,
जमीन-जुमला, इष्टमित्र इतकेच नव्हे तर गजांत लक्ष्मी असणे हे या संसारातील सुभाग्य व महान वैभव
समजले जाते. पण उपनिषदे मात्र तसे मानीत नाहीत, कारण अनंतकोटी ब्रह्मांडातील संपूर्ण वैभवहि या
आत्मीय अपार वैभवापुढे, या सत्य व सर्वकारण सुखाच्या व आनंदाच्यापुढे अति अल्प अविनाशी, विकारी व
असत्य आहे. मग या जगातील दृश्यमान अशा संसारिक वैभवाची काय कथा ?

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img