Literature

भाद्रपद वद्य षष्ठी

मृगजळातील सुर्यप्रकाशासारखे, अलंकारातील सोन्यासारखे तरंगातील समुद्रासारखे अथवा दोन्हीच्या
ठिकाणी भासणाऱ्या सर्पातील दोरीसारखे अखिल दृश्यभासातून भरगच्चपणे भरलेले त्याहून विलक्षण
असे एक आनंदघन ब्रह्मतत्त्व आहे. त्याचा साक्षात्कार म्हणजे सत्याचा साक्षात्कार, जगत्कारण वस्तूचा
साक्षात्कार, आपल्या यथार्थ रूपाचा साक्षात्कार होय. दोरीच्या ठिकाणी दिसून येणाऱ्या सर्पाचा भास
नाहीसा होऊन त्याहून विलक्षण अशी एकमेव दोरी जशी दिसावी त्याप्रमाणे नामरूपात्मक अखिल
दृश्यभास नाहीसा होऊन एक आनंदघनरूप प्रगटले, सर्व संवेदनातून अचल आनंदघनस्वरूपाचा अनुभवच
एकमेव स्थिरावला म्हणजे सर्व साधनांचे फळ पदरी पडले. जीवन सफल झाले, कर्तव्य संपले म्हणून
समजावे. *' झाले साधनांचे फळ | संसार झाला सफळ | निर्गुण ब्रह्म तें निश्चळ | अंतरी बिंबले || '* तो
पावेतो साध्यचि होऊन साधन करावे.

*' देहास लागली उपासना | आपण देह तो असेना | ऐसी स्थिती सज्जना | अंतरीची || '* हे ओळखून
उपासना करावी. उपासना म्हणजे ज्ञान ' *' अहं ब्रह्मास्मि '* मी ते आनंदघन ब्रह्मच आहे हे ज्ञान म्हणजेच
उपासना. केल्या जाणाऱ्या सर्व उपासनेमधून हेच एक अंतस्थ तत्त्व आहे. ' सोsहं भावेन पुजयेत ' *' तो
आनंदघन परमात्माच मी '* हे अनुसंधानच पूजेतील तत्त्व आहे.' *' सोsहं भावो नमस्कार:|'* तोच मी म्हणून
आनंदघन परमात्मस्वरूपात झालेले आत्मसमर्पणच नमस्कार.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img