श्रीसमर्थ संप्रदाय हा सगुण-निर्गुण सद्गुरूउपासनेचा आहे. व त्यांचे सगुण व निर्गुण हे साध्य आहे हे स्पष्ट
आहे. साधनाशिवाय साध्याची प्राप्ती होणे शक्य नसते. तरीही साध्यच मुख्य सत्य ठरते. साध्याच्याच प्राप्तीने
कृतकृत्यता व निरंकुशतृप्ती बाणते. ब्रह्मस्वरूपाचा लाभ करून देणारे म्हणजेच ब्रह्मविद्या शिकविणारे सद्गुरू
हे शिक्षक आहेत. त्यांच्या सेवा सुश्रृषादिकांनी होणारी त्यांची कृपा आदि सर्व ब्रह्मस्वरूपाप्रापक साधनात
मोडून ब्रह्मैक्य म्हणजे केवळ आनंदस्वरूप होऊन रहाणे हे प्राप्य अथवा साध्य होय. ब्रह्मविद्येकडून इतर सर्व
विद्या शिकविणारे त्या विद्येहुन भिन्न असतात. विद्या शिकलेलेही त्या विद्येशी एकरूप होत नाहीत. पण
ब्रह्मविद्येची गंमत वेगळी आहे.
अलंकार व सुवर्ण यांच्यामधील संबंधासारखाच सगुण-निर्गुण, साकार-निराकार यातील संबंध मानुन
साधनक्रम चालत असला तरी सोन्यालाच किंमत असल्याप्रमाणे निर्गुणालाच जास्त महत्त्व आहे. सोन्याची
दृष्टी ठेवून दागिन्याला बघितल्याप्रमाणे निर्गुणाची दृष्टी ठेवूनच सद्गुरूंच्या सगुणरूपाकडे बघितले पाहिजे.
सद्गुरू अजातवादाचे स्वानुभवी म्हणजेच ज्ञानयोगी असल्यामुळे कर्म, हट, भक्ति आदीच्या योगामध्ये
सर्वश्रेष्ठ असतात. अशापासूनच बह्मैक्य स्वरूपाचा जीवांना लाभ होत असल्यामुळे जो खरोखरच स्तुत्य
असतो अशा भवरोगवैद्यरूपी श्रीसद्गुरूस नित्य नमन करावे.
*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*