Literature

भाद्रपद शुद्ध पौर्णिमा

मानवी जीवनांचे मुख्य ध्येय दैनंदिन भौतिक जीवन नसून आत्मोध्दार हेच होय. जोपर्यंत देह, इंद्रिय, मन व
बुद्धी यांची शक्ती क्षीण झाली नाही तोपर्यंतच आत्मोध्दाराचा प्रयत्न करणे योग्य होय. आयुष्याचा अपव्यय
करण्यात काय अर्थ आहे ? वैषयिक सुखाचा नेहमी ध्यास धरण्याने त्रिविध तापांच्या ज्वाला जास्तच
उफाळतात व त्यामुळे अंतःकरण दुर्बल बनते. याउलट बालपणापासून आत्मोध्दारासाठी तत्पर रहाण्याने
आत्मज्ञानप्रद सुक्ष्मबुध्दीची शक्ती जास्तच वाढते. यासाठीच बाल्यावस्थेत जो शांत असतो तोच ' शांत ' होय
असे म्हटले जाते.

परंतु आज सर्वसाधारण मनुष्याच्या जीवनात विविध वस्तुंचा उपभोग घेण्याकडे अत्यंत प्रवृत्ती असल्याचे
दिसून येते. त्यांची अंतःप्रवृती सुखप्राप्तीचीच असते व त्यानुसार ते प्रयत्नशील असतात. पण
संसारिकपदार्थापासून खरे सुख कधी तरी मिळणार आहे काय ? बाह्य पदार्थांतच खरे सुख आहे असे मानून
त्यांच्या प्राप्तीसाठी आपल्या डोक्यावर निरनिराळी प्रापंचिक ओझी घ्यावयास लावणार जीवन हे सर्वतोपरी
सुखी जीवन म्हणू शकता येईल काय ? अशा प्रकारची संसारिक प्रवृत्ती पशु-पक्षी आणि स्वर्ग नरक यांतही
आढळून येते.

वास्तविकरित्या विषयसुखाहूनही श्रेष्ठ असे एक सुख आहे व ते निर्विषय, निरंकुश, निरवलंबित व
निस्सीमित सुख होय. त्यात विषयांची कल्पनाच उद्भवु शकत नाही. फक्त सूक्ष्मबुध्दीकडूनच या सुखाची
प्राप्ती होते. हे सुख अखंड आहे.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img