Literature

भारतभूमीचे श्रेष्ठत्व

तत्रापि भारतं श्रेष्ठं जंबूद्वीपे महामुने। यतो हि कर्मभूरेषा ततोऽन्या भोगभूमयः ||

जंबूद्वीपांत भारतवर्ष हा फार श्रेष्ठ देश होय. भारतवर्ष ही एकमात्र कर्मभूमि आहे. येथे सक्रियावान् पुरुषाला वाटेल तें साधून घेता येते. आपल्या सत्साधनांच्या जोरावर इथल्यांना कसलीहि पदवी मिळविता येते, इतकेच नव्हे तर परमात्मकृपेने आपली योग्यता कितीहि वाढविता येते. परमात्मस्वरूपहिं होतां येते. इतर देश मात्र केवळ भोगभूमि आहेत. मागच्या जन्मीं केलेल्या कर्माचे फळच केवळ तेथे भोगले जाते. भोगसाधनांचेच त्या ठिकाणी प्राबल्य असतें असा या श्लोकाचा अर्थ.

पुण्यवान् अशा भारतवर्षांत किंवा हिन्दुस्थानांत जन्म पावलेले फार पुण्यवंत, परम भाग्यशाली ! भगवत्सेवेला अनुकूल असलेली ही भूमि आहे. या ठिकाणच्या लोकांना स्वर्गमोक्षाची प्राप्ति होते, हें अनेक पुराणादि वाक्यांवरून स्पष्ट होते. उदाहरणार्थ एक दोन श्लोकांचा आपण येथे विचार करूं 

गायन्ति देवाः किल गतिकानि | धन्यास्तु ते भारतभूमिभागे ॥ स्वर्गापवर्गास्पदमार्ग भूते । भवन्ति भूयः पुरुषाः सुरत्वात् ॥ (विष्णु पुराण २-३-२४) स्वर्गमोक्षांना कारणीभूत होणाऱ्या भारतभूमीत जन्म घेऊन आलेली माणसें खरोखरच धन्य धन्य म्हणून भारतीयांचे यशोगान साऱ्या देवदेवताहि मुक्त कंठाने करतात व आपलाहि जन्म त्या ठिकाणी व्हावा म्हणून मनापासून इच्छितात. अहो अमीषां किमकारि शोभनम् । प्रसन्न एषां स्विद्रुत स्वयं हरिः॥ यैर्जन्म लब्धं नृषु भारताजिरे । मुकुंदसेवौपायकं स्पृहा हि नः ॥ (श्रीमद्भागवत ५-१९ २१ ) स्वतः परमात्माच ज्यांच्यावर बहु प्रसन्न होऊन कृपा करतो अशा भारतीयांचे आम्ही आणखी जास्ती काय हित करूं शकणार ? कसलें कल्याण करणार ? भरतभूमीत – हिन्दुस्थानांत जन्म प्राप्त होणे म्हणजे मोठे भाग्य ! परमात्म्याच्या सेवेला अनुकूल असणारा हा देश ! या देशावर आमची फार ममता आहे म्हणून स्वतः देवच या भारताचे व भारतवासियांचे गोडवे गातात.

एक युरोपियन स्त्री आपल्या वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत भारतांतच होती. भारतांत जन्म घेण्याच्या उद्देशाने येथेच देह सोडण्याचा तिचा कृत निश्चय होता. या जन्मी मी युरोपियन होऊन जन्माला आलें; पण पुढे मात्र येथेंच उत्तम कुळांत जन्म घेऊन मोक्षाधिकारी होईन व साधन करून मोक्ष मिळवीन म्हणून तीच स्वतः सांगत असे. किती युरोपियन युवक संन्यस्त वृत्तीनें भगवीं वर्षे धारण करून हिमालयाकडे साधन करीत असलेले दिसून येतात. पाश्चात्यांना भारताविषयींचा असणारा आदर भारताची खरीखुरी योग्यता व्यक्त करतो, देवांच्या विधानाचे सत्य कैमुनिक न्यायानें पटवितो.

home-last-sec-img