Literature

मंत्री कसे असावेत ?

राजाला जितका आपला विश्वास असतो तितका अधिक विश्वासार्ह असा मंत्री असला पाहिजे. मंत्री म्हटले म्हणजे ते धीर, वीर, शूर असे असले पाहिजेत, विद्वान असले पाहिजेत. अर्थशास्त्रज्ञ, नीति शास्त्रज्ञ, जितेंद्रिय, मातापित्याप्रमाणे सर्वांचे हित साधणारे, मृदुमधुरभाषी, निरहंकारी, बहुश्रुत, कुलीन, प्रामाणिक, धर्मनिष्ट, आत्मतत्त्वज्ञ, वर्णाश्रमधर्मा प्रमाणे लोकांना त्यांच्या त्यांच्या कमत नियुक्त करणारे, सदाचारसंपन्न, प्रीति पात्र होऊन सर्वांच्या उत्कर्षाकरितां कायावाचामने करून प्रयत्न करणारे, धर्मा धर्मरहस्य जाणणारे, दयाशील, व्यवहार-परमार्य कुशल, दूरदृष्टीचे, समाजांत ऐहिक व तशाच पारलौकिक सुखसाधनांची वाढ करणारे, विश्वबंधु, इंगितज्ञ, समयसूचक उपाय योजणारे, प्रसंगावधानी इत्यादि लक्षणांनी युक्त असेच मंत्री असावेत. प्रजेचे इहपर सुख अधिकांशानें मंत्र्यांवरच अवलंबून असते. प्रसंगोपात्त या ठिकाणी श्रीसमर्थांच्या याविषयींच्या ओल्या आठवतात. श्रीराम, श्रीरामदास या दोघांचेंहि मिळते जुळते मत आपल्याला एकदम पाहावयाला सांपडेल.

धीर उदार सुंदर दक्ष व्युत्पन्न चतुर । सकळ प्रयत्न तत्पर । अत्यादरें ॥ १ ॥ दूरदृष्टी दीर्घ प्रयत्नी | समय प्रसंग जाणे चिन्हीं । नासला फड नेटका बचनी । बोलोन करिती ॥ २ ॥ जाणती दुसऱ्याचे अंतर सावधानता निरंतर । नेमस्त न्यायाचे उत्तर | बाष्कळ नाही ॥३॥ पवित्र वासनेचे उदास । केवळ भगवंताचे दास सारासार विचारें वास । हृदयीं केला ॥ ४ ॥ अगाध अव्यग्र धारणा मिळोनि जाती राजकारणा | कार्यभागाची विचारणा । यथायोग्य योजिती ॥ ५ ॥ न्याय नीति मर्यादेचा । स्नान संध्या पवित्रतेचा। सत्यवादी बहुतांचा अन्याय क्षमित ॥ ६ ॥ चुकणें विसरणें असेना मत्सर पैशून्य दिसेना कोप क्षणिक असेना । विवेकी पुरुष ॥ ७ ॥ हरिकवानिरूपण । तेथें प्रेमळ अंतःकरण पाहों जातां उत्तम लक्षण | सकळ असे ॥ ८॥ ऐशा प्रकारचे पारिपत्य । करूं जाणती सकळ कृत्य । धन्य धन्य कृतकृत्य निष्कामतेनें ॥ ९॥ ऐसे भले परमार्थी । श्रवण मनन अर्या अर्थी जे परलोकांचे स्वार्थी । परोपकारी ॥ १० ॥

home-last-sec-img