श्रीमंताने याचकांना थोडे का होईना दान करीत राहिल्यास त्यांच्या श्रीमंतीचे सार्थक होईल अशा दात्याने, आपल्याला स्वतःस भीक मागण्यास लावणारी परिस्थिती आली तर आपली काय अवस्था होईल याचा विचार करावयास हवा. दुसऱ्याचे दुःख ते आपलेच दुःख असे समजले पाहिजे. यामुळे आपले अंतर्मन शक्य होईल तितकी मदत कर असे सांगेल व हाच ‘ विवेक ‘ होय.
मनुष्याची योग्यता त्याच्या आचरणाने सिध्द होत असते. नुसती बडबड काही उपयोगाची नाही. दिलदारपणाच त्याला मोठेपण मिळवून देत असतो. परहितासाठी झटणाराच खऱ्या अर्थाने मनुष्य होय. आपण दुसऱ्याची जसे वागतो त्याप्रमाणेच दुसरेही आपल्याशी वागतात. जगांतील सर्व व्यवहार प्रतिध्वनीप्रमाणे किंवा आरशातील प्रतिबिंबाप्रमाणे आहेत. परमात्माही भक्ताप्रमाणेच वागत असतो. भक्त ज्या प्रमाणात त्याची सेवाभक्ती करील त्याच प्रमाणात परमात्म्याकडून त्यास फलप्राप्ती होईल.
आपले जीवन कष्टमय आहे हे सर्वांना माहित आहे. पण विस्मृतीमुळे मनुष्य मोहात गुरफटतो त्यामुळे तो प्रापंचिक सुखासाठी सारखा प्रयत्नशील असतो. विषयसुखसाध्यतेसाठी आपण जितके कष्ट घेतो तितकेच कष्ट परमात्मप्राप्तीसाठी केल्यास ते निश्चितच कल्याणप्रद ठरेल.
*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*