Literature

माघ शुद्ध पंचमी

प्रवृत्तिमार्ग सोडून निवृत्तिमार्गाने पुढे पुढे जाणारे, ज्याचे मन निष्किल्मिष झाले आहे असे योगी नानाप्रकारच्या विषयसुख समुहाने युक्त अशा परिस्थितीत रहात असले तरी आणि विषयाभिलाषेने युक्त अशा जनसमुहात वावरत असले तरी आश्रमोचित अशी आपली कर्मे न सोडता अंतर्मनास मात्र सत्य, नित्य अशा आत्मस्वरूपातच विलीन करीत असतात ते ब्रह्मसुखातच मग्न असतात. पाण्याने भरलेली घागर डोक्यावर घेऊन, गायनवादनांच्या तानलयांना अनुसरून नृत्य करणारी नटी जसे आपल्या डोक्यावरील घागरीकडे असलेले मन केंद्रित करून निरनिराळ्या भावांचे भिन्न भिन्न अविर्भाव करीत असते त्याप्रमाणे हे महात्मे आपले मन आपल्या स्वरूपामध्ये स्थिर करून घेऊन या जगतातील बाह्यकर्मे करीत असतात. त्याचे चर्मचक्षु बाह्यजगास पहात असले तरी मनश्चक्षु मात्र ब्रह्मानंदातच विलीन झालेले आढळतात. ते आत्मनंदात मग्न असतात. मन ताब्यात ठेवल्यामुळे निवृत्तिमार्गात पुढे जाऊन चिरसुखी होतात.

अशारितीने मनोनिग्रह करून तो पंचेद्रियावर अधिकार गाजवू शकतो. निवृत्तिमार्गावलंबी योगी आपल्या देहावरच अधिकार गाजवतो असे नसून तो अखिल ब्रह्मांडावर अधिकार गाजवण्याची शक्ती धारण करू शकतो.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img