हे सर्व विश्व इतके कष्ट सहन करून ज्या इष्टप्राप्तीकरितां अविरत प्रयत्न रात्रंदिवस चालवीत आहे तें एकच एक सुख असें शेवटी आढळून येतें. सुखं लब्ध्वा करोति नासुखं लब्ध्वा करोति । या छांदोग्य उपनिषदाच्या वाक्यानेंहि हेंच स्पष्ट होतें. ‘ कोणी कांहींहि सुख मिळाल्यानेंच करतो, कशामुळे कां होईना एकदां दुःखप्राप्ति झाली की कोणीहि पुन्हां तें करूं इच्छित नाहीं’, हा या उपनिषद्वचनाचा अर्थ. यः कश्चित्सौख्यहेतोस्त्रिजगति यतते नैव दुःखस्य हेतोः | असें श्रीशंकराचार्यांचेंहि पण एक वचन शत श्लोकींत आढळतें. या सुखाचा एकदां छडा लावून साधनांनी त्याची प्राप्ति करून घेणे व त्या निरवधि सुखांत अखिल भिन्नभाव विसरून, निरंकुश तृतीने या जगांत नांदणें, त्या आनंदांत एकरूप होऊन वागणे म्हणजेच मनुष्य जन्माचें एकध्येय व खरेखुरे सार्थक.