मानवी जीवन हे मृत्यूच्या अधीन आहे. मृत्यूचे आमंत्रण केव्हा येईल हे काही सांगता येणार नाही. अत्यंतिक विस्मृती होणे हे मृत्यूचे एक लक्षण आहे. परमात्म्याची सृष्टीच मुळांत विस्मृतीच्या आधीन आहे. अतएव ही सृष्टी अस्थिर, चंचल, नाश होणारी आणि अनेक लोपदोषांनी युक्त आहे.
जग अज्ञानमय असून विस्मृतीयुक्त आहे यांचे सम्यग् ज्ञान होत नसल्यामुळे जग व परमात्मा यांचे यथार्थज्ञान होत नाही. या जगात सार आहे अशा दृष्टीने आपण वागतो हेच मुळांत अज्ञानमुलक आहे. परमात्म्याचे खरे स्वरूप न जाणणे हेच परमात्म्याबाबतचे अज्ञान होय, हाच मृत्यू. ही विस्मृती व हें अज्ञान जीवाला वैषयिक असलेल्या ऐहिक व्यवहारात गुंतविण्यास मुळ कारणीभूत असते. अज्ञानाने केली जाणारी कर्मे ही अज्ञान वाढविण्यासाठीच होत.
परमात्म्याबाबतचे अज्ञानच जन्मास कारणीभूत असते. जीवनातील घडामोडीसही हेच अज्ञान कारणीभूत आहे. ज्ञानी मनुष्यांना जन्म मृत्यू ही दोन्ही नसतात. विषयजन्य व्यवहारही नसतात. अज्ञानी मनुष्य परमात्म्यास न जाणल्याने संसारमोहात पडून दुःखी होतो. हे दुःख मृत्यू दुःखास उत्पन्न करीत असते. अशा या विस्मृतीरूपी रोगास विवेक म्हणजेच आत्मज्ञान हे औषध आहे.
*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*