Literature

मार्गशीर्ष वद्य षष्ठी

जनन हे मृत्यूच्या आधीन आहे. जननापासूनच मृत्यूच्या छायेसच सुरूवात होते. जन्मामुळे दुःख सुरू होते. मूल जन्माला येताच ताबडतोब रडू लागते. रडणे हे दुःखाचे मूळ आहे. ‘ आपण आता दुःख सागरामध्ये गुरफटलो ‘ यासाठीच जणूं काही ते रडत असते. तेथूनच दुःखाला सुरूवात होऊन जीवनांत पदोपदी, क्षणोक्षणी दुःखाचा प्रसंग उद्भवतो. खऱ्या सुखाचे अज्ञानच दुःखाचे कारण असते. आत्मसुखाची जाणीव नसणे हे महत् दुःख होय. सर्व प्राणिमात्र सुखासाठीच धडपडत असतात. परंतु त्यांना दुःखच प्राप्त होते. दुःखासाठी कोणीही प्रयत्नशील नसतो. दुःखासाठी प्रयत्न करणारा तिन्ही लोकांत सापडणार नाही. पण खरी परिस्थिती याहून वेगळी आहे, सर्व जग दुःखानेच भरलेले आहे.

जगातील सर्व लोक विषयसुख हेच शाश्वत सुख समजून याच्या पाठीमागे लागतात. त्यांना शाश्वत सुख न मिळतां विषयसुखच प्राप्त होते. त्याची इच्छा खऱ्या सुखाची नसून खऱ्या सुखाच्या आभासाच असते व तेच दुःख होय. यामुळे त्यांना दुःखे चुकविता येणार नाहीत. खऱ्या सुखाची जाणीव करून घेऊन त्याचीच इच्छा केल्यास दुःखातून पार होणे शक्य आहे आणि ही जाणीव म्हणजेच विवेक होय. विस्मृतीला जन्म कारणीभूत आहे. जीवनामध्ये विस्मृती पुरेपूर भरली आहे. मरणकालीही विस्मृती असतेच. ही विस्मृती नाहीशी होणे हे परमात्म्याचे दर्शन झाल्यासच शक्य आहे. विस्मृती जाणे म्हणजेच विवेक.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img