Literature

मार्गशीर्ष शुद्ध दशमी

सूर्य सर्वांना प्रकाश देत असला तरी सूर्यकांत मात्र त्याचा परिणाम दाखवतो. ‘ शिष्यप्रज्ञैव केवला ‘ गुरूकृपा प्राप्त करून घेण्याचे सामर्थ्य शिष्यातच असू शकते. शिष्याच्या अंतकरणातील तळमळ त्याच्या वागण्यावरून ओळखून मुमुक्षुंची तृषा शांत करण्यास अमृतवाणीचा एकच शब्द पुरेसा असतो. परंतु त्यासाठी शिष्याजवळ पुष्कळ तपश्चर्या असावी लागते. शांति असावी लागते. चांचल्य व विषयलालसा असू नये. तत्त्वजिज्ञासा हवी. मन निश्चळ असावे. ममत्त्वबुध्दी सोडून तत्त्वरूपाकडेच ज्यांची बुध्दी असते अशांनाच ‘ शांत ‘ म्हणता येईल.

जो विषयराशीकडे आकर्षिक होत नाही. त्रिभुवनाचे राज्य पायाशी लोळण घालीत आले तरी त्यामुळे ज्यांचे मन थोडेही विकारी होत नाही ; जागतिक वैभवाचे शिखर गाठले तरी ज्याच्या वागण्यात काहीच फरक होत नाही असा जो कोणी असतो त्यालाच ‘ ब्रह्मनिष्ठ ‘ म्हणता येईल. जो स्व-स्वरूपात दंग असतो तो ब्रह्मच होय. सुख-दुःख, राग-द्वेष यांत भेद न मानणारा तोच गुरू होय. गुरूस्वरूपाची आराधनाही अशा दृष्टीनेच केली पाहिजे. सद्गुरू म्हणजे निर्दिष्ट अभेद वस्तु. माशांना पाण्याचा आश्रय असतो तद्वत राजा-रंक, ज्ञानी-अज्ञानी, स्री-पुरूष यांना सद्गुरूच आश्रयदाता असतो. त्याच्या प्रीतीसंपादनास निमित्ताची आवश्यकता नाही. पतितांच्या उध्दारासाठीच सद्गुरूचा अवतार आहे.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज*

home-last-sec-img