ज्याच्या ठिकाणी उदात्तता असते तो गुरूत्वाप्रत पोहोचतो. श्रुति मात्र ‘ तूच परतत्व आहेस. पण भ्रमाच्या भोवऱ्यात सापडला आहेस ‘ असे म्हणते. मूलतः जीव हा अमूढ असतो. पण मायेमुळे तो मूढ बनतो. मात्र त्याचे यथार्थस्वरूप ब्रह्मच होय. ते अद्वितीय व आनंदमय असून या जगतातील दुःखाशी त्याचा संबंध नाही. हे जग, माया, अज्ञान यांच्या आधारावर अवलंबून दिसते व ते अज्ञान गुरू नाहीसे करू शकतो. अशा गुरूंच्या ठिकाणी जडभावना, मलीन भावना चिटकवू नका ! त्यास त्रैगुण्याचा स्पर्शही नसतो.
*’तत्त्वमसि’* म्हणजे ते ब्रह्मच अविनाशी आनंदस्वरूप असे स्वस्वरूप आहे असे श्रुतिमाता ज्यांचे वर्णन करते तेच ‘ गुरू स्वरूप ‘ होय.
ब्रह्मा, विष्णु, महेश आदींची आराधना आपण सोडावी काय ? अशी शंका निर्माण झाल्यास त्यांच्याठायी गुरूरूप समजून आराधना केल्यास तुम्हास तुमच्या जीवनाचे लक्ष्य असलेला मोक्ष प्राप्त होईल. त्याची ईश्वरभावनेने आराधना केल्यास कर्मफल मिळेल. परंतु ईश्वराच्या हातात तराजू आहे. तो न्यायी आहे. त्याची गुरूरूपामध्ये सेवा केल्यास आपणास खचितच अभ्युदय नि:श्रेयस ही प्राप्त होतील. गुरूच्या ठिकाणी शारिरीक दृष्टीने न पाहता जो शरणागतांना अभय देतो त्यास आपण शरण गेले पाहिजे.
तुम्हा सर्वांना सद्गुरू दत्तात्रेयांचे आशिर्वाद लाभोत !
*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*