Literature

विरक्ताचा आदर्श दिनक्रम

एकान्ते सुखमास्यतां परतरे चेतः समाधीयताम् । पूर्णात्मा सुसमीक्षतां जगदिदं तद्बाधितं दृश्यताम् ॥ सुखानें एकान्तांत रहा. लौकिक, ऐहिक सुखाहून विलक्षण असणाऱ्या पवित्र शांति कारक आत्मीय अनंत आनदांत चित्त एकाग्र करा. आपल्याच पूर्णतेनें रहा तुमच्याच या पूर्ण स्वरूपाने जग उजळतें म्हणून माना,’ असें श्रीशंकराचार्यानींहि सांगितले आहे. सदा ध्यानस्थ असावे आणि देहनिर्वाहाकरितां भिक्षा ठेवावी; याहून इतर काहीच करू नये. वाटल्यास ज्ञानग्रंथ अवलोकावेत. निःस्पृहांनी भिक्षा सोडू नये. भिक्षाहारी निराहारी।भिक्षा हें भवरोगाचे औषध आहे. भिक्षौषधं भुज्यताम् म्हणून आचार्यांचेहि सांगणे आहे, भिक्षेत येईल तें अमृत. स्वाद्वन्नं न तु याच्यतां विधिवशात्प्राप्तेन संतुष्यताम् । गोडग्रासी आळकेपणठेवू नका. मागायला जाऊ नका. यदृच्छेनें भिक्षेत मिळालेल्या पानांनी संतुष्ट रहा. ब्रह्मस्वरूपाचा आनंद हेच खरें तृप्तीचे अन्न आहे. अन्नमय हि सोम्य मनः (छां. उ. अ. ६ खं. ५-४) अन्ना सारखे मन होते म्हणून सात्त्विक पवित्र अन्न सेवन करावे. ‘आहारशुद्ध्याः चित्तशुद्धिः।‘ (छां. उ. सं. २६-२). जसे अन्न शुद्ध असेल तसें मन अथवा चित्त शुद्ध होते. एखाद्या दिवसाची गोष्ट निराळी, पण होता होईल तो तळलेले, मसालेदार पदार्थ

खाण्यात नसावेत ते कामोत्तेजक आणि उष्ण असतात. त्यांनी शोष पडतो, अभ्यासांत विघ्न येते. म्हणून ते खाऊ नयेत. उडीदहि, तसेंच बाकी मुळा, वांगीं वगैरे कांदा भाज्याहि निषिद्ध आहेत, मधुकरीत आल्यास चालतील. पण काहीं, लसूण मात्र फारच उत्तेजक असल्यामुळे अगदीच त्याज्य ‘जिव्हेंवर ज्याचा ताबा आहे तो इतर सर्वहि इंद्रियें जिंकतो. सर्वं जितं जिते रसे।‘ जिव्हा ज्याच्या ताब्यांत नसते त्याचें ब्रह्मचर्य अस्खलित राहीलच असे खात्रीने सांगता येत नाहीं. बरीच अशी उदाहरणें डोळ्या खालून गेली आहेत तिखट, आंबट, खारट, तेल, तूप, दही यांचे सेवन प्रमाणांत असावें. ताक वाटेल तितके घ्यावयास हरकत नाही. ‘विरक्तें धारिष्ट धरावें । दमनविषयीं।थोडक्यात मधुकरीत आलेलें उपासनेला अर्पण करून (नैवेद्य दाखवून) पवित्र प्रसाद म्हणून मधुकरीचें अन्न सेवीत जावें. कांहीं न मागतां मधुकरीवर राहिलें तरी तो एक सौम्य संयमच होतो.

विरक्त चढला तर ब्रह्म होईल, पडला तर नरकाला जाईल, असे त्याचे भवितव्य असतें. म्हणून विरक्तें उत्तम शिक्षण घ्यावें । विरक्तें अवगुण त्यागावे । नाना अपाय भंगावे। विवेक बळें ||(दा. २-९-३९). कशालाहि न हरता, स्वरूपाच्या निश्चयाने सर्वांना मागे टाकून पुढे जाण्याचा तेजस्वी मोक्षमार्ग हा प्रवृत्तीच्या देव-मनुष्यादिकांकडून विरक्ताला खाली आणण्याचा प्रयत्न सतत होतच असतो. पण त्या कशाला दाद न देतां मोठ्या धैर्यानें, गांभीर्याने कोणत्याहि विकाराला थोडेंसुद्धा बळी न पडतां शांततेनें अखिल विश्वाचा खरा आनंद होऊन परमोच्च पदी विराजमान होण्याचा परम मंगलरूप दिव्य निवृत्तिमार्ग हा. ‘विरक्तें असावें जगमित्र । विश्व असावें स्वतंत्र ।‘ कोणाच्या कच्छपी लागलेले असू नये. सर्वांमधे उत्तम गुण । त्याचा भोक्ता ।‘ असावें. कोणाचेहि वाईट गुण विरक्तानें आपल्या अंगी जडवून घेऊ नयेत. बोलणे चालणे मुदुमधुर, पवित्र असावे. विरक्तांनी विरक्तांच्या समाजांतच असावें. विरक्तानें विरक्त गुरु करावा. नियमाला अपवाद असतोच, पण बहुतेक विरक्तांनी गृहस्थ गुरु केला म्हणजे गृहस्थाचा आदर्श पुढे असल्यामुळे त्याचा परिणाम होऊन, गृहस्थाश्रमाची इच्छा होणें बव्हंशी संभवनीय आहे. विरक्तांनी गृहस्थांच्या घरींहि राहू नये, त्यांच्याशी फार सलगी ठेवू नये. त्यामुळे वैराग्य ढीलें पडते. कोणाच्याहि आहारी न जाता आपला मार्ग आक्रमीत असावें.

या वैराग्यधनाचे गाठोडे आपल्याला नाही मिळाले तरी याच्यापासून सोडवावे म्हणून काही देव-देवता, मनुष्य अगदी टपलेली असतात. शत्रुपक्षाच्या सैन्याची फळी फोडून दोन्ही हातांनी तलवारी फिरवीत छातीठोकपणे आपल्याला कसलीहि इजा न होऊ देता जाण्याचा शूरवीरांचा हा मार्ग आहे. प्रति पक्षाचेंहि काही सामान्य नसतात. सत्वबळानेच केवळ त्यांना जिंकावयाचे असते. स्वरूपाच्या जाणिवेची एक ढाल शत्रुपक्षाचे सर्व वार चुकविण्याकरिता मात्र फार मोठी याच्याजवळ असते. चांगला चोखाळून गुरु करावा. तसा दुसऱ्याच्या सांगण्यावरुन गुरु करूं नये. कोणावर विश्वास नच बसला, तर आपल्या शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचें अशा श्रीसमर्थावर विश्वास ठेवावा आणि तसा दृष्टान्त झाल्यावर त्या गुरुला शरण जावे.. श्रीसमर्थांसारखे इतर कोणीहि गुरु करावयास हरकत नाही.

श्रीदासबोधासारखे ज्ञानप्रधान ग्रंथ वाचावेत. उपनिषदें, गीता, ब्रह्मसूत्र इत्यादिकांचे श्रवण शक्य झाल्यास अवश्य करावें. श्रीशंकराचार्याचे प्रकरणग्रंथ अमोलिक आहेत, ते पहावेत; हे नामरूपात्मक जग प्रकाश्य आणि याचे प्रकाशक आपण स्वयंप्रकाश स्वतःसिद्ध अद्वितीय चिदानंदरूप आहो, हे कधीहि विसरूं नये. प्रकाश्य आणि प्रकाशक यांचे पृथक्करण करीत असावें; हे कधीहि एक करू नयेत. स्वरूपाव्यतिरिक्त कोणत्याहि प्राणि-पदार्थाच्या ठिकाणी सुखाची भावना न करणे आणि त्या दृष्टीने कशावरहि प्रेम न ठेवणे हा सुखाचा मूलमंत्र आहे. हे निवृत्तिमार्गाचे असिधाराव्रत आहे.

भवसागरांत कामाचे तुफान वारे डोळयापुढे अंधारी आणून कोणत्या तरी एका स्त्रीरूपी सुसरी मगरीच्या आहारी पाडण्याचा संभव फार असतो. या वादळांत सांपडू नये. केव्हांहि वृत्तिक्षोभ होऊ देऊ नये. साधनमार्गात असूनहि मार्ग आपण चुकलों का काय म्हणून संशय येणें, एकदम मनाचें अस्वास्थ्य होणे, भीति वाटू लागणे, विषयांच्या कल्पना येणें, निषिद्ध प्रवृत्तीचे वारे वाहू लागणे कामज्वाला भडकणे इत्यादि झाले तरी या कशालाहि दाद न देता कोणत्याहि आणि कुणाच्याहि जाळयात न सांपडता, ‘मी ज्ञेयशून्य ज्ञानरूप असा केवळ आनंदघन परमात्मस्वरूपच आहेहा निश्चय सदैव प्रकाशत ठेवावा. कसलाहि ढग येऊ देऊ नये. कोणीकडून आलाच तर सूर्याचे उदाहरण पुढे ठेवून मो कधीच यामुळे आच्छादला जात नाही, हा निश्चय निश्चळ ठेवावा. एकतत्त्वदृढभ्यासात्प्राणस्पंदो निरुध्यते मनोऽपि विलीयते । एकतत्त्वाच्या अखंड धारणेनें, अनुसंधानाने प्राणजय व मनोजय होतो. तत्प्रतिबंधार्थमेकत्वाभ्यासः । सर्व विघ्नांच्या नाशाकरितां एकतत्त्वाचा अभ्यासच उपयोगी पडतो, असे पातंजलयोगसूत्र आहे. (स. पा. सू. ३२). तावन्निशीव वेताला वल्गन्ति हृदि वासनाः । एकतत्वदृढाभ्यासासाद्यावन्न विजितं मनः ॥ (मुक्ति उप २-४०) मुक्तिकोपनिषदांत आलेला (दुसऱ्या अध्यायांतील) हा ४० वा श्लोक आहे. जोपर्यंत एक तत्त्वाच्या दृढाभ्यासानें मन जिंकले जात नाही, तोपर्यन्तच आत्मविस्मृतिरूप रात्रीच्या अज्ञानांधकारामुळे हृदयरूपी स्मशानांत माजलेल्या वासनांची भुताटकी त्रास देते, पुढे नाही, असा याचा अर्थ.

home-last-sec-img