Literature

वैदिक धर्माचे महत्त्व

विनाशमव्ययस्यास्य न कश्चित्कर्तुमर्हति ( भ.गी. २-१७) स्वभावतःच अविनाशी असणाऱ्या या सुखाचा नाश कोणीहि करूं शक्त नाहीं. अद्वितीय अशा या शाश्वत सुखांत समरसून टाकण्यांतच वैदिक धर्माचे महत्त्व आहे. त्रिकालाबाधित वस्तूला मात्र नाश नसतो. त्रिकालाबाधित सुखच एक आपलें इष्ट होऊं शकतें, त्रिकालाबाधित वस्तूचा लाभ व्हावा म्हणणे किंवा खऱ्या सुखाचा लाभ व्हावा म्हणणे दोन्ही एकच. शाश्वत सुखाची ओळख पटवून देऊन त्याची सर्वश्रेष्ठता विश्र्वविदित करणे हेच सनातन वैदिक धर्माचे वैशिष्टय. असे झालें तर हा धर्मच आपल्या सर्वातिशय महत्त्वानें अखिल मानवाजातीचाच एक सर्वसामान्य धर्म होतो. शाश्वत सुख नको कोणास ? सुख या शब्दाचा केव्हांहि शाश्वत सुख असाच एक अर्थ होतो. सुखाकरितांच प्रयत्न करणारा कोणता मनुष्य, खऱ्या शाश्वत सुखाच्या मार्गदर्शनार्थ अवतरलेल्या या सनातन धर्माचा आश्रय करणार नाहीं ? कोण याला डावलून जाईल ? ‘ सनातन’ या याच्या नांवानेंच वैदिक धर्माचे प्राचीनत्व व महत्त्व व्यक्त होतें; हाच एक विश्वधर्म म्हणून विश्वलोकांच्या मनांत बिंबतें. च्युति नसलेलेंच नित्य म्हणून तत्व म्हणवून घेते. या सत्यवस्तुचें अथवा सत्यसुखाचे ज्ञान म्हणजेच तत्त्वज्ञान. हे तत्त्वज्ञानच श्रेष्ठ अशा सनातन धर्माचे सर्वोत्कृष्ट असे एक मुख्य लक्षण होय. मानवी जीवन सर्वतोपरी सर्वतो मुखानें अत्युन्नत करून, ‘याचि जन्मीं येणेंचि काळे’ त्रिकालाबाधित सुखाचा साक्षात्कार करून देण्याचा विडाच यानें उचललेला आहे. हीच दीक्षा परमात्म्याकडूनहि याला मिळाली आहे. याला श्रुति, स्मृति, पुराण, इतिहासादि अवश्य अशा ग्रंथांचे संपूर्ण साहाय्यहि पण आहे. सत्यमुखाच्या प्राप्तीला अवश्य असणाऱ्या सकल साधनांनीहि हा अत्यंत परिशोभित आहे. त्यासाठी लागणाऱ्या अखिल सामुग्रीनें हा परिपूर्ण आहे. तशा आदर्श तेजस्वी विभूतींनी हा सर्वांग- अलंकृत आहे. या भारतवर्षांतच या तात्त्विक धर्माचा अवतार झाला व यामुळेच ‘India is the motherland of philosophy • या भारताला तत्त्वज्ञानाची मातृभूमि असे म्हटले जाते. विद्वद्वण्य मॅक्समुलर नांवाच्या पाश्चात्य पंडितानें १८५८ साली व्हिक्टोरिया राणीस लिहिलेलें खालील पत्रच याला साक्ष आहे :

If I were to look over the whole world to find out the country most richly endowed with all the wealth, power and beauty, that Nature can betsow, I should point to India’

— सर्व नैसर्गिक संपत्तीनें, शक्तीनें व सौंदर्यानें-ईश्वरदत्त अशा अखिल उत्कृष्ट देणगीनें अतिशय संपन्न असणारा देश कोणता म्हणून सर्व सृष्टीचे पर्यालोचन करून सांगण्याचा प्रसंग जर मला प्राप्त झाला तर मी एक भारता कडेच केवळ बोट दाखवीन.

‘If I were asked under what sky the human mind has most fully developed some of it’s choicest gifts, has most deeply pondered over the greatest problems of life, and has found solutions of some of them which well deserve the attention even of those who have studied Plato and Kant, I should point to India.’

– दिव्य सुखाच्या प्राप्तीकरितां आवश्यक असणाऱ्या सर्व देणग्यांनी, सर्व गुणांनी पराकाष्ठेचा विकास पावलेलें मानवी मन, ज्या देशांत आपल्या पूर्ण कलेनें शोभायमान आहे, मानवी जीवनाच्या निगूढ व अति महत्त्वपूर्ण विषयांवर खोल विचार करून ही सर्व कोडी ज्या देशांत अत्यंत समाधानकारक रीतीनें पूर्ण उलगडून दाखविली आहेत, प्लेटो व कँट यांसारख्यांच्या तत्त्वज्ञानाचा संपूर्ण अभ्यास करून समाधान मिळविलेल्या पाश्चात्य पंडितांचीं मनेंहि ज्याच्याकडे आकर्षिली जातात अशा दिव्य तत्त्वज्ञानाचा जन्म ज्या देशांत झाला आहे त्या देशाचे नांव काय म्हणून मला कोणी विचारल्यास मी सरळ आर्यावर्त अथवा भारतवर्ष याकडेच बोट दाखवीन.

“And if I were asked myself from what literature, we here in Europe, who are nurtured almost exclusively on the thoughts of the Greeks and Romans, and of the Semitic Race, the Jewish, may draw the corrective which is most wanted in order to make our inner life more perfect, more universal, in fact, more truly human, a life not for this life only, but a transfigured and Eternal life, again I should point to India.

– ग्रीक, रोमन, युनानी, ज्यू इत्यादिकांच्या विचारधारेनेंच परिपोषित असे आम्ही युरोपियन ज्या एका वाङ्मयाचा आश्रय करून ठाम सिद्धांताला येऊन पोहोंचूं, आमचें पारमार्थिक जीवन पूर्ण होण्यास ज्याची म्हणून आम्हांस अधिक आवश्यकता आहे, ज्याच्यामुळे आमचे जीवन अधिक विश्वव्यापी होईल, ज्याच्यामुळे आमचे जीवन खरोखरीच मानवी जीवनाला सर्वतोपरी अधिक अनुरूप ठरेल, आमच्या विद्यमान जीवनांत अधिक सुधारणा घडून येईल, केवळ ऐहिकच नव्हे तर अनादिसिद्ध दिव्य जीवनालाहि जें कारणीभूत होईल, निरतिशय सुखाच्या प्राप्तीचे साधन म्हणून जें, तें वाङ्मय कोणत्या एका देशांत आपल्या पूर्णरूपानें अवस्थित आहे म्हणून जर मला कोणी विचारलें तर आपोआपच माझे बोट पुन्हा एकदां भारतवर्षाकडे अथवा त्या हिन्दुस्थानाकडेच फिरेल.

home-last-sec-img