Literature

वैशाख वद्य षष्ठी

या जगतामधील कार्यासाठी काहीतरी नियम असलेच पाहिजेत. कारण स्वयंप्रेरणेने काहीही होऊ शकत नाही. म्हणून केवळ शून्याने जग निर्माण झाले, निर्मिले या म्हणण्यात किती तथ्यांश आहे. शून्याने नियम कल्पिले व सृष्टी निर्माण केली असे म्हटले तर शून्यास शून्य म्हणता येणार नाही. कारण शून्य म्हणजे काहीही नाही, हाच त्याचा अर्थ. जग-कार्यासाठी काहीतरी नियम आहेत असे मानले तर सत्यसंकल्पी परमात्म्याचेच ते नियम असले पाहिजेत. हे कबूल करावे लागेल. शून्यापासून नियमबध्द सृष्टी निर्माण होणे हे असंभवनीयच.

जिच्यांत कांहीच नसते अशा सुषुप्तावस्थेत जागृति झाली हे म्हणणेही अनुभवाच्या विरूध्द होय. सुषुप्तावस्थेत प्रत्यक्षात काहीही नसते असा अनुभव सांगण्यासाठी कोणीतरी कारणीभूत असणे आवश्यक आहे की नाही ? कोणताही पदार्थ पाहिल्याशिवाय त्याचा अनुभव कसा मिळणार ? सुषुप्तीत काहीही नाही असे यथार्थरित्या पाहणारा कोणीतरी असणारच. म्हणून सुषुप्तीत तद्रुप असणाऱ्या आत्म्याच्या संकल्पाने जागृतावस्था उत्पन्न होते हे सिध्द होते. या सर्व विवेचनावरून सत् रूप असलेल्या परमात्म्याच्या संकल्पमात्रेनेच हे जग उत्पन्न झाले असे मानणे आपणास क्रमप्राप्त आहे. अशारितीने संकल्प करणारा परमात्मा चेतनस्वरूप असून ज्ञानमय आहे.

श्री प.प. सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी

home-last-sec-img